SANATAN PRABHAT EXCLUSIVE : श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या प्राचीन दागिन्यांच्या मूल्यांकनासाठी लेखापरीक्षक मिळेना !

मुंबई, ३० एप्रिल (वार्ता.) – महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या प्राचीन दागिन्यांच्या मूल्यांकनासाठी लेखापरीक्षक मिळत नसल्याचे समोर आले आहे. याविषयी देवस्थानकडून विधी आणि न्यायविभाग, तसेच धर्मादाय आयुक्त यांना पत्र पाठवून लेखापरीक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे; परंतु या विभानांनी प्राचीन दागिन्यांचे मूल्यांकन करून देणारा लेखापरीक्षक उपलब्ध होत नसल्याचे देवस्थानला कळवले आहे. त्यामुळे देवतांच्या प्राचीन दागिन्यांच्या मूल्यांकनाचा मागील ३८ वर्षांपासून रखडलेला प्रश्‍न अद्यापही कायम आहे.दागिन्यांच्या मूल्यांकनाचा ३८ वर्षांपासून रखडलेला प्रश्‍न !!!

डिसेंबर २०२३ मध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या प्राचीन दागिन्यांचे मूल्यांकन करण्यासाठी लेखापरीक्षक उपलब्ध करून द्यावा, यासाठी ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’ने धर्मादाय आयुक्तांना पत्र पाठवले होते. वर्ष १९८५ मध्ये मंदिरांचे सरकारीकरण झाल्यापासून या प्राचीन दागिन्यांचे मूल्यांकन करण्याकडे देवस्थानच्या विश्‍वस्तांनी दुर्लक्ष केले.

दागिन्यांच्या मूल्यांकनासाठी शिर्डी देवस्थानाकडे पत्रव्यवहार ! – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या प्राचीन दागिन्यांचे मूल्यांकन करण्यासाठी लेखापरीक्षक उपलब्ध व्हावा, यासाठी आम्ही शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिराच्या विश्‍वस्तांशी नुकताच पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्याकडेही प्राचीन दागिन्यांचे लेखापरीक्षक उपलब्ध नसल्याचे त्यांनी कळवले आहे. त्यामुळे प्राचीन दागिन्यांचे मूल्यांकन कसे करावे ? हा आमच्यापुढे प्रश्‍न आहे, असे ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’कडून सांगण्यात आले.

मूल्यांकनापूर्वीच मंदिरातील चांदी हटवली !

सध्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन यांचे काम चालू आहे. मंदिरातील ज्या चांदीचे अद्यापही मूल्यांकन करण्यात आलेले नव्हते, ती चांदी काढण्यात आली आहे. यामध्ये श्री विठ्ठल मंदिरातील सभामंडपाच्या पुढील दरवाजा, गरूड खांब, श्री विठ्ठलाच्या शेजघराचा दरवाजा, श्री विठ्ठलाचा मुख्य गाभारा आणि त्याची चौकट, श्री रुक्मिणीदेवीचा मुख्य गाभारा अन् त्याची चौकट, श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणीदेवी यांचा शेज दरवाजा, श्री रुक्मिणीदेवीच्या दर्शन रांगेचा दरवाजा, कवळेकर यांच्या स्मरणार्थ असलेली कमान, नगरकर यांच्या स्मरणार्थ दरवाजा आदींना लावलेली चांदी काढण्यात आली आहे. यांचे मूल्याकन करण्यापूर्वीच चांदी काढण्यात आल्याने पंढरपूर येथील सर्व जाणकारांनी विश्‍वस्तांच्या कारभाराविषयी शंका उपस्थित केली आहे.

एकूणच प्राचीन दागिन्यांच्या मूल्यांकनाविषयी देवस्थानने शासनाशी चर्चा करून आणि भाविकांना विश्‍वासात घेऊन धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे; मात्र याविषयी देवस्थानची अनास्था दिसून येत आहे.

दागिन्यांचे मूल्यांकन झाले नसल्याचे ‘सनातन प्रभात’ने सर्वप्रथम केले होते उघड !

श्री विठ्ठलाच्या दागिन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव आणि पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांनी श्री विठ्ठलाला अर्पण केलेल्या दागिन्यांचा समावेश आहे. श्री विठ्ठलाच्या २०३ आणि श्री रुक्मिणीदेवीच्या १११ प्राचीन अन् मौल्यवान दागिन्यांचे अद्यापही मूल्यांकन झालेले नाही. वर्ष २०२१ मधील मंदिराच्या लेखापरीक्षण अहवालामधील हे सूत्र दैनिक ‘सनातन प्रभात’मधून उघड करण्यात आले. त्यानंतर ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने याविषयी पत्रकार परिषद घेऊन दागिन्यांच्या मूल्यांकनाची मागणी केली. त्या वेळी ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’ने प्राचीन दागिन्यांच्या लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली; मात्र याविषयी अद्यापही कार्यवाही झालेली नाही.

या प्रकरणाची संपूर्ण पार्श्‍वभूमी जाणून घेण्यासाठी पुढील लिंक्सवर क्लिक करा –

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : श्री विठ्ठलाच्या अलंकारांत छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर आणि बाजीराव पेशवे यांनी अर्पण केलेल्या दागिन्यांचा समावेश होता !

Sanatan Prabhat Exclusive : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दागिन्यांचे मूल्यांकन केल्याची नोंद ताळेबंदामध्ये यायला हवी ! – लेखापरीक्षक संजय सूर्यवंशी

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अनागोंदी कारभाराची कार्यकारी अधिकार्‍यांकडून स्वीकृती !

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड !


संपादकीय भूमिका

मंदिरांचा सर्व कारभार पहाणारे भक्त का हवेत ? हे यावरून लक्षात येते ! भक्तांना देवाची सेवा अचूक होण्याची जशी तळमळ असते, तशी तळमळ सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील ‘पगारी कामगारां’मध्ये दिसून येत नाही, ही वस्तूस्थिती आहे ! त्यामुळे मंदिरे निस्वार्थी असलेल्या भक्तांच्याच स्वाधीन असली पाहिजेत !