SANATAN PRABHAT EXCLUSIVE : श्री विठ्ठलाच्या अलंकारांत छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर आणि बाजीराव पेशवे यांनी अर्पण केलेल्या दागिन्यांचा समावेश होता !

  • वंशपरंपरागत पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचे दागिने सांभाळणारे ह.भ.प. बाळासाहेब बडवे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ला दिली महत्त्वपूर्ण माहिती !

  • सरकारीकरणापूर्वी न्यायालयाकडे दागिन्यांचा नियमित हिशेब सादर होत असल्याचीही माहिती !  

पंढरपूर, २ जानेवारी (वार्ता.) – श्री विठ्ठलाच्या अलंकारांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर आणि थोरले बाजीराव पेशवे यांनी अर्पण केलेल्या दागिन्यांचा समावेश आहे. मंदिराचे सरकारीकरण होण्यापूवी प्रतीवर्षी या सर्व दागिन्यांचे मूल्यांकन करून त्याचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला जात होता, अशी महत्त्वपूर्ण माहिती श्री विठ्ठलाच्या दागिन्यांची वंशपरंपरागत निगा राखणारे ह.भ.प. बाळासाहेब बडवे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.

मंदिराचे सरकारीकरण झाल्यानंतर या दागिन्यांची नोंद ताळेबंदामध्ये केलीच गेली नसल्याचा धक्कादायक प्रकार लेखापरीक्षण अहवालातून उघड झाला आहे. तथापि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून ‘हे सर्व दागिने सुरक्षित आहेत’, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या सर्व दागिन्यांची ताळेबंदात नोंद नसल्यामुळे हे सर्व दागिने सुरक्षित आहेत कि नाहीत ? याविषयी शंका उपस्थित करण्यात येत आहे.

ह.भ.प. बाळासाहेब बडवे पुढे म्हणाले, ‘‘मंदिराचे सरकारीकरण होण्यापूर्वी ६० ते ७० वर्षांपासून माझे वडील भगवान पंढरीनाथ बडवे यांच्याकडे पांडुरंगाच्या अमूल्य खजिन्याचा ठेवा आणि त्यांच्या किल्ल्या होत्या. माझे शिक्षण संपल्यानंतर अनुमाने ४५ वर्षांपूर्वी श्री पांडुरंगाचे अलंकार सांभाळण्यासाठी मी वडिलांना अनेकदा साहाय्य करत असे. प्रत्येक दिवाळीच्या सणाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या सर्व दागिन्यांचे आम्ही पूजन करत होतो. तसा प्रघातच होता. मंदिराच्या कारभारातून बडवे, उत्पात आणि सेवेकरी यांना बहिष्कृत केल्यापासून या दागिन्यांशी आमचा तीळमात्र संबंध राहिला नाही. वंशपरंपरागत चालत आलेल्या पांडुरंगाच्या दागिन्यांची व्यवस्था जोपर्यंत आमच्याकडे होती, तोपर्यंत त्यामध्ये कुठेही दोष आणि त्रुटी आढळत नव्हत्या. त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वतीने दागिन्यांची पडताळणी करण्यासाठी पंढरपूर देवस्थान समितीने जे मंडळ नेमले होते, त्यामध्ये विद्वान लोक आणि काही सराफ यांचा समावेश होता. ते प्रतीवर्षी उन्हाळ्याच्या काळात प्रत्येक दागिन्यांची पडताळणी करून त्याचे मूल्य ठरवत होते. त्यानंतर याविषयीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला पाठवला जात होता. मी असतांना दागिन्यांविषयी न्यूनतम २५ अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला सादर केल्याचे माझ्या स्मरणात आहे. ‘ते दागिने अनुमाने २०० ते २५० कोटी रुपये किमतीचे दागिने असावेत’, असा कयास व्यक्त केला जात होता. या समितीने कधीही दागिन्यांविषयी आक्षेप घेतलेला नाही. तज्ञ सोनारांकडून मोजमाप करून घेतांना दागिन्यांच्या वजनामध्ये वर्षानुवर्षे कधीही तीळमात्र फरक पडला नाही. इतक्या प्रामाणिकपणे, आत्मनिष्ठेने आणि पांडुरंगावरील श्रद्धेने आम्ही त्या अलंकारांची व्यवस्था पारदर्शकपणे ठेवली होती.’’

असे आहेत श्री विठ्ठलाचे मौल्यवान दागिने !

ह.भ.प. बाळासाहेब बडवे म्हणाले, ‘‘७० ते ८० अत्यंत उच्च कोटीचे, पारदर्शक असलेल्या हिर्‍यांचा लफ्फा हा साधारणपणे ६० ते ७० लाख रुपये किमतीचा असावा. त्याच्या खाली जो पाचू होता त्याचे मूल्य त्या वेळेस तज्ञांनी १० ते ११ लाख रुपये सांगितलेले होते. सोन्याची एक तुळशीची माळ, तसेच थोरले बाजीराव पेशवे यांनी दिलेली कंठीही अत्यंत मौल्यवान होती. त्या वेळी काही भाविकांनी एकत्र येऊन अनुमाने अडीच किलो सोन्याची पगडी अर्पण केली होती. एक टोप दिला होता. भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्यातून पांडुरंगासाठी एक सोवळे सिद्ध करण्यात आले होते. यासह १ तुरा आणि ५ कंठ्या होत्या. सोन्याचे पैंजण, सोन्याचे तोडे आणि सोन्याचा करदोडा आहे. बारीक हिरे गुंफून सिद्ध केलेले मत्स्यजोड, किरीट, कुंडले आणि जिरेटोप यांचाही दागिन्यांमध्ये समावेश होता.’’

संपादकीय भूमिका 

आता सरकारने हे सर्व दागिने तसेच आहेत ना, याची निश्‍चिती करून भाविकांना त्याची माहिती द्यायला हवी !