SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रातील बहुतांश  जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांमध्ये एकूण ९ सहस्र ६१० कोटी रुपयांचा अपहार !

६१ वर्षांत अनेक प्रकरणांत अपहार !

श्री. प्रीतम नाचणकर

मुंबई, २३ एप्रिल (वार्ता.) – वर्ष १९६२ ते २०२० या ६१ वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील बर्‍याच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांमध्ये एकूण ९ सहस्र ६१० कोटी ३२ लाख रुपयांचा अपहार झाला आहे. राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांच्या वर्ष २०१९-२० च्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालातून हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा अहवाल पटलावर ठेवण्यात आला. वर्षानुवर्षे कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे उघड होऊनही अपहारातील वसुली मात्र त्या प्रमाणात झालेली नाही. निकृष्ट दर्जाच्या साहित्याची खरेदी, खर्चाची देयके न दाखवणे, देयकांमध्ये खाडाखोड, बोगस व्यक्ती दाखवून निधीचे वाटप अशा विविध प्रकारांचे अपहार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

लेखापरीक्षण सर्वसाधारण निष्पत्ती

दोषींवर कारवाई नाही !

शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागांतील सर्वसामान्यांपर्यंत पोचाव्यात, यासाठी  जिल्हास्तरावर जिल्हा परिषदा, तर तालुका पातळीवर पंचायत समित्या असतात. शासनाच्या विविध योजनांचे पैसे थेट जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राप्त होतात; मात्र यांतील अधिकतम योजनांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे सरकारच्याच या अहवालातून दिसून येत आहे. यांमधील अनेक प्रकरणांत लेखापरीक्षण अहवालाद्वारे अपहार उघड झाल्यावर पैशांची वसुली करण्यात आली आहे; मात्र दोषींवर कारवाई करण्यात आलेली नाही.

श्री. प्रीतम नाचणकर

निधीच्या अपहाराची १ सहस्र ७५१ प्रकरणे !

वर्ष १९६२ ते २०२० या कालावधीत राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांमध्ये विविध योजनांमध्ये १ सहस्र ७५१ प्रकरणांमध्ये अफरातफर झाल्याच्या नोंदी आहेत. यामध्ये वर्ष १९६२ ते २०१२ या कालावधीत सर्वाधिक १ सहस्र ६४० अफरातफर झाल्याची प्रकरणे आहेत. यामध्ये निधीचा बेकायदेशीरपणे वापर, निधीच्या वापरामध्ये हलगर्जीपणा, अपहार आदी प्रकरणांचा समावेश असल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

अपहाराची कांही आकडेवारी !

१. ठाणे जिल्हा परिषदेमधील सामान्य प्रशासन विभागामध्ये जवाहर रोजगार योजनेच्या अंतर्गत १८०, तर ग्रामनिधीच्या अंतर्गत १४६ अशी एकूण ३२६ अपहाराची प्रकरणे मार्च २०२० पर्यंत प्रलंबित होती. यांमध्ये ४ कोटी ८१ लाख १० सहस्र ७७४ रुपये गुंतलेले होते. मार्च २०२० पर्यंत या अपहाराच्या रकमेपैकी केवळ १ कोटी ६३ लाख ३९ सहस्र ३५९ कोटी रुपये वसूल झाले होते.

२. नाशिक जिल्ह्यात ग्रामनिधी आणि जवाहर रोजगार योजनेच्या निधीमध्ये तब्बल ७३७ कामांमध्ये अपहार झाला असून त्यामध्ये १४ कोटी ७७ लाख २२ सहस्र ९०१ इतकी मोठी रक्कम गुंतलेली होती. मार्च २०२० पर्यंत त्यामधील केवळ ३ कोटी ६४ लाख ३१ सहस्र ७०० रुपये वसूल झाले होते.

३. पुणे जिल्हा परिषदेमध्ये जवाहर रोजगार योजना आणि ग्रामनिधी योजनेत २१० कामांमध्ये अपहार झाला असून त्यांत ९ कोटी ७६ लाख १३ सहस्र ९८७ रुपये गुंतलेले आहेत.

४. वर्धा जिल्ह्यामध्ये तर ग्रामपंचायतीमध्ये सरकारी निधीचा अपव्यय करण्यात आल्याची ८११ प्रकरणे मार्च २०२० पर्यंत प्रलंबित होती. त्यामध्ये तब्बल ३१ कोटी ९६ लाख १० सहस्र २८० रुपये थकित होते.

संपादकीय भूमिका

या प्रकरणी राज्य सरकारने चौकशी करून संबंधितांना कठोर शिक्षा होण्यासाठी आणि अपहार झालेली रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यासाठी प्रयत्न करावेत !