प्रगल्भ विचारांचे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण आचरणात आणणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) !

‘काही दिवसांपूर्वी आमच्यात (मी (सौ.) मानसी राजंदेकर आणि पू. वामन यांच्यात) परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या संदर्भात बोलणे झाले. ते संभाषण येथे दिले आहे. त्यातून ‘संतांची प्रगल्भता, त्यांचे ईश्वराशी असलेले अनुसंधान आणि साधनेच्या तत्त्वाला धरून ते करत असलेले आचरण’, यांविषयीची सूत्रे लक्षात आली. या लहानशा प्रसंगातून मला सर्वसाधारण व्यक्ती, साधक आणि संत यांच्या विचारप्रक्रियेतील भेद लक्षात आला.

पू. वामन राजंदेकर

१. पू. वामन राजंदेकर यांनी त्यांच्या आईला ‘सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी नीट बोलता येण्यासाठी सराव करण्याच्या ऐवजी सतत नारायणांचे नामस्मरण केले, तर चालेल का ?’, असे विचारणे

मी : पू. वामन, आपल्याला प.पू. गुरुदेवांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाल्यास तुम्ही काय कराल आणि त्यांच्याशी काय बोलाल ?

पू. वामन : म्हणजे आपले नारायण प्रत्यक्ष भेटले तर ना ? (पू. वामन काही क्षण विचार करत होते.) त्यांच्या जवळ जाणार, त्यांच्याशी बोलणार, त्यांना पापी देणार आणि ते सांगतील तशी साधना करणार.

मी : हो. बरोबर आहे. आपल्या नारायणांचे लगेच ऐकायचे. त्यांच्या समोर लाजायचे नाही. (पू. वामन प.पू. डॉक्टर समोर असतांना अत्यल्प बोलतात.) त्यांना खाली वाकायला त्रास होतो ना; म्हणून ‘त्यांना तुमची पापी घेण्यासाठी वाकावे लागणार नाही’, याची काळजी घ्यायची. ते विचारतील, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायची. आपल्या गुरूंना आपल्यासाठी थांबायला लागायला नको.

पू. वामन : आई, आपण त्यांना कधी भेटणार आहोत ?

मी : ते ठाऊक नाही. तोपर्यंत तुम्ही मधून मधून नीट बोलण्याचा सराव करू शकता.

पू. वामन : आई, मला एक प्रश्न आहे. विचारू का तुला ?

मी : हो. विचारा ना.

पू. वामन : आई, तू सांगितल्याप्रमाणे मी नारायणांशी बोलण्याचा सराव करण्यापेक्षा मी सतत नारायणांचे नामस्मरण केले, तर चालेल का ग ?

पू. वामन यांचे बोलणे ऐकून मी निःशब्दच झाले. ‘मी त्यांना त्यावर काय सांगणार ?’, असे मला वाटले.

सौ. मानसी राजंदेकर

२. पू. वामन यांचे बोलणे ऐकून सामान्य व्यक्ती, साधक आणि संत यांनी गुरूंना भेटायला जाणे, यांत लक्षात आलेला भेद !

त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘सामान्य व्यक्तींनी (धार्मिक व्यक्तींनी) संतांना (गुरूंना) भेटायला जाणे, साधकांनी संतांना (गुरूंना) भेटायला जाणे आणि संतांनी त्यांच्या गुरूंच्या भेटीला जाणे, यांत पुष्कळ भेद असतो.

२ अ. सामान्य व्यक्तीने गुरूंना (संतांना) भेटायला जाणे : सामान्य व्यक्ती गुरूंच्या बाह्य रूपाकडे बघून मायेतील काही अडचणी सुटण्याच्या विचाराने किंवा इच्छा पूर्ण होण्याच्या हेतूने जातात. ते हार, फुले आणि पेढे घेऊन जातात.

२ आ. साधकाने गुरूंना भेटायला जाणे : साधक साधना चांगली होण्याच्या विचाराने तळमळ, भाव आणि भक्ती मनात बाळगून श्री गुरूंच्या दर्शनाला जातात. साधक काही प्रमाणात तरी स्वेच्छा ठेवून, म्हणजेच ‘आपल्याला गुरूंना काय सांगायचे आहे, मनात साधनेविषयी असलेल्या प्रश्नांचे निरसन करून घेणे, गुरु आपल्याला काय विचारतील ?’, यांचा विचार करून गुरूंच्या भेटीला जातात.

२ इ. संतांनी गुरूंना भेटायला जाणे : संत त्यांच्या गुरूंच्या अंतररूपाशी एकरूप असल्याने गुरूंना निर्गुणातून अधिक अनुभवत असतात. संत ईश्वरेच्छेने वागत असल्याने ते अखंड नामस्मरण करण्यावरच भर देतात. हेच पू. वामन यांनी दिलेल्या उत्तरावरून स्पष्ट होते.

३. शिकायला मिळालेली सूत्रे

३ अ. ‘गुरूंची भेट होणार’, हा भविष्यकाळातील विचार असल्याने त्या विचारात रहाण्यापेक्षा सतत श्री गुरूंच्या स्मरणात रहाणे आणि अखंड नामस्मरण करणे सर्वश्रेष्ठ आहे’, हे या प्रसंगातून मला शिकायला मिळाले. ‘संत वर्तमानकाळात कसे रहातात, तसेच ते ईश्वरेच्छेने कसे वागतात !’, हे लक्षात येते.

३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण आचरणात आणणारे पू. वामन राजंदेकर ! : परात्पर गुरुदेवांनी मार्गदर्शनात सांगितले आहे, ‘‘गुरूंच्या सत्संगात शब्दांपेक्षा अनुभूतीला अधिक महत्त्व आहे. अध्यात्म हे अनुभूतीचे शास्त्र आहे. ‘शब्दांतून जे व्यक्त होते, त्यापेक्षा गुरूंच्या सान्निध्यात नामजप कोणत्या टप्प्याचा होतो’, हे अधिक महत्त्वाचे आहे. पू. वामन यांनी त्यांच्या कृतीतून मला सहजतेने जे शिकवले, ते अद्वितीय तत्त्व आहे.’’

‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेने पू. वामन यांनी मला साधनेचे जे मूळ तत्त्व शिकवले आणि या संपूर्ण प्रसंगात जे अनुभवायला दिले’, त्याबद्दल प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (पू. वामन यांची आई, आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४० वर्षे) फोंडा, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक