चंडीगड – देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कारागृहात वाचण्यासाठी रामायण आणि भगवद्गीता या धर्मग्रंथांची मागणी केली आहे. यावर हरियाणाचे माजी गृह आणि आरोग्य मंत्री अनिल विज यांनी समाचार घेत म्हटले की, केजरीवाल यांनी रामायण आणि भगवद्गीता हे पवित्र ग्रंथ आधीच वाचले असते, तर कदाचित् ही (कारागृहात जाण्याची) परिस्थिती उद्भवली नसती.
सौजन्य : Jantatv News
यापूर्वीही विज यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावूनही ते उपस्थित राहिले नव्हते. त्या वेळी विज म्हणाले होते, ‘ज्या राजकारण्यांना ईडीने समन्स बजावूनही ते ईडीसमोर उपस्थित राहिले नाहीत, त्यांच्यावर केजरीवाल यांनी टीका केली होती. आता हेच केजरीवाल ईडीसमोर उपस्थित राहिले नाहीत. केजरीवाल यांनी जितक्या वेळा रंग पालटला आहे, तितक्या वेळा सरडाही कधी रंग पालटत नाही.’