विशेष संपादकीय : सामर्थ्य… सनातनचे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले संस्थापित ‘सनातन संस्था’ यंदा रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण करत असतांना तिच्या अद्वितीय कार्यवैशिष्ट्यांचे अवलोकन करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाल्याविषयी अपार कृतज्ञता वाटत आहे !  आध्यात्मिक क्षेत्रात उत्तुंग कार्य करत असलेल्या सनातन संस्थेने धर्म आणि राष्ट्र कार्यातही तेवढाच मोलाचा वाटा उचलला आहे, हे सनातनचे वैशिष्ट्य आहे. ‘केवळ साधना करायची’ असे नव्हे, तर ‘आध्यात्मिक प्रगती करून आनंदप्राप्ती करायची असते’, हे समाजाला सांगणारी सनातन संस्था आध्यात्मिक संस्थांमधील एक ‘आदर्श’ संस्था ठरली आहे. गुरुकुलासम संत घडवणारी शाळा झाली आहे…! सध्याच्या ‘अर्थ’ आणि ‘काम’ यांनी भारीत झालेल्या वातावरणात भक्ती, कर्म आणि ज्ञान या योगांच्या एकत्रीकरणातून ‘गुरुकृपा’ कशी प्राप्त करून घ्यावी ? आणि ‘धर्म’ अन् ‘मोक्ष’ या २ विस्मरणात गेलेल्या पुरुषार्थांच्या दिशेने कशी वाटचाल करावी ?, हे अत्यंत सुलभतेने सांगणारी सनातन संस्था कलियुगासाठी एक वरदानच ठरली आहे !’, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. दुर्लभ अशा मानवजन्माचे सार्थक करण्यासाठी साधना सांगणार्‍या सनातन संस्था येत्या आपत्काळाविषयी जागृती निर्माण करून त्यात तरून जाण्यासाठी उपाययोजनाही सांगत आहे. सनातनच्या स्थूल, तसेच सूक्ष्मातील कार्याची महती जाणून घेतली, तर हे सहज लक्षात येईल. सध्याच्या ‘डिजिटल’ आणि गतीमानतेच्या युगात ‘वैज्ञानिक परिभाषा आणि नेमकेपणाने सार सांगणे’ ही सनातन संस्थेची वैशिष्ट्ये काळाला खरी उतरली आहेत !

राष्ट्र-धर्म कार्यासाठी समर्पित !

वेदज्ञानानुसार ‘धर्म’ हेच मानवाच्या संपूर्ण जीवनाचे मूळ असते. राष्ट्र हा धर्माच्या अतीव्यापक अंगाचा एक भाग आहे. राष्ट्राला धर्मापासून वेगळे काढू शकत नाही. राष्ट्रनिर्मितीचे प्रत्येक सूत्र आणि राष्ट्राच्या प्रत्येक समस्येचे उत्तर हे धर्मात आहे. सनातन परंपरेत राष्ट्र धर्माधिष्ठितच असल्याने ही परंपरा समृद्ध मानवी जीवनाची पाईक आहे. साधनारत आणि धर्माचरणी राजा अन् प्रजा हे आदर्श राष्ट्राचे मूळ आहे. अशी प्रजा घडवण्याचे काम सनातन संस्था निरपेक्षपणे करत आहे. सनातन संस्थेने समष्टी साधनेला ६५ टक्के महत्त्व दिले आहे. या अंतर्गत धर्मप्रसार करून नीतीमान समाज घडवण्यासाठी प्रयत्न करणे आणि समाज अन् राष्ट्र यांच्या समस्यांच्या मुळावर घाव घालणे, हे कार्य सनातन संस्था करत आहे. देवता आणि मंदिरे हे संपूर्ण राष्ट्र अन् समाज यांच्या चेतनेचे ऊर्जास्रोत झाकोळले गेले आहेत, हे लक्षात घेऊन सर्वप्रथम सनातनने ‘देवतांचे विडंबन रोखणे’ आणि ‘मंदिररक्षण’ या मोहिमा हाती घेऊन या चैतन्यस्रोतांना मोकळे करण्याचे काम चालू केले. देवतांचे विडंबन रोखण्याविषयीच्या सनातनच्या जनजागृती मोहिमेला यश मिळत आहे. अनेक हिंदुत्वनिष्ठांनी हे तत्त्व मोठ्या प्रमाणात अंगीकारून ते आता तत्परतेने अनेक स्तरांवर त्याविरोधात कृती करत आहेत. हिंदुद्वेषी पत्रकार म.फि. हुसेनविरोधात तक्रारी देण्यापासून मद्याच्या दुकानांवरील देवता, महापुरुष यांची नावे न देण्यासाठी प्रबोधन करणे, आरंभीच्या काळात काश्मिरींवरील अत्याचाराच्या विरोधातील प्रदर्शन लावून त्यांच्यावरील अत्याचार जगासमोर आणणे, वजनात फसवणार्‍यांपासून भेसळ करणार्‍यांपर्यंत भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणे, रस्त्यावर दिवसा चालू रहाणार्‍या दिव्यांपासून भटक्या कुत्र्यांपर्यंतच्या समस्यांविषयी जागृती करणे, सार्वजनिक उत्सवांत होणार्‍या अपप्रकारांविरोधात मोहीम राबवून ‘आदर्श उत्सव कसा साजरा करावा ?’ ते सांगणे, आदर्श म्हणजे रामराज्याची संकल्पना मांडणे, लव्ह जिहाद आणि धर्मांतर याविरोधात जनजागृती करणे आदी अनेक मोहिमांत सनातन संस्थेचा मोठा सहभाग होता. पुण्यातील खडकवासला जलाशय प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सनातनने प्रथम जागृती केली. आता हिंदुत्वनिष्ठ संघटनांना त्यात १०० टक्के यश मिळत आहे. देवता, धर्म, हिंदु, राष्ट्र आदींच्या संदर्भात कुठलीही अन्यायकारक घटना लक्षात आल्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एकत्र करून प्रशासनाला निवेदन देऊन जागृती करण्याची अभिनव आणि अतिशय वैध पद्धत सनातनने अंगीकारली. हिंदूंवरील विविध आघातांविषयी अनेक हिंदुत्वनिष्ठ एकाच वेळी राज्यात अनेक ठिकाणी निवेदने देत आहेत. त्यामुळे आपसूकच विविध चळवळी उभ्या राहून जागृती आणि परिवर्तन होणे यांना चालना मिळाली आहे. अशाच प्रकारे आता ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाचा जयघोषही चालू झाला आहे. यावरून लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे सनातनसारखी आध्यात्मिक संस्था एखादी राष्ट्रविषयक मोहीम हाती घेते, तेव्हा त्यामागे साक्षात् ईश्वराचा आशीर्वाद आणि गुरूंचा संकल्प असल्याने तिचे यश हे सुनिश्चित असते. सनातनचे साधक आज हेच अनुभवत आहेत !

सामर्थ्य आहे चळवळीचे… !


सनातनचे साधक अत्यंत निरपेक्षपणे समाज आणि राष्ट्र कार्य करतात. ते त्यांची समष्टी साधना म्हणून राष्ट्रविषयक चळवळींतही सहभागी होतात. त्यांच्या साधनेचे मनोबल त्यांना देवता, धर्म आणि हिंदू यांवरील अन्यायाच्या विरोधातील लढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा देते. त्यांच्या जीवनाचे ध्येय हे ईश्वर (आनंद)प्राप्ती असल्याने आणि समाज किंवा राष्ट्र कार्यात सहभागी होण्यामागे त्यांचा यत्किंचितही कुठलाच स्वार्थ नसल्याने त्यांना अपेक्षित प्रसिद्धी मिळाली नाही, तरी त्यांची साधना होते अन् सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बीजरूपाने समाज, धर्म किंवा राष्ट्र यांवरील आघातावर प्रहार केला जातो. पुढे संबंधित मोहीम किंवा सूत्र हे काळगतीनुसार व्यापक होत जाऊन समाजपरिवर्तनाला आरंभ होतो. स्थुलातून झालेल्या या पालटामागे वरील सूक्ष्मातील ईश्वरी तत्त्व कार्यरत असते. इथे ही सूक्ष्मातील कार्याची प्रक्रिया उलगडून सांगण्याचे कारण म्हणजे ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचें; परंतु तेथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ।’ ही समर्थ रामदासस्वामींची उक्ती साक्षात् अनुभवणारी आणि त्याचा प्रत्यय देणारी सनातन संस्था ही एकमेवाद्वितीय आहे, हे यामुळे लक्षात येईल ! छत्रपती शिवरायांची भवानीदेवीवरील श्रद्धा, सतत तिचे नाव घेणे, गुरूंचे आज्ञापालन करणे, श्रींची इच्छा समजून राज्य चालवणे या सर्व गोष्टी हिंदवी स्वराज्यामागील मोठे आध्यात्मिक अधिष्ठान दर्शवतात. तद्वत्च येणार्‍या हिंदु राष्ट्रनिर्मितीमागे, ते येतांना होणार्‍या प्रचंड संघर्षामागे जे आध्यात्मिक अधिष्ठान आहे, त्याचे दायित्व एका दीपस्तंभाप्रमाणे सनातन संस्थेने उचललेले आहे, असे म्हटले तर वावगे नव्हे !

हिंदुत्वनिष्ठांसाठी मातृ-पितृ तुल्य संस्था

सनातनचे साधक हिंदुत्वनिष्ठांच्या मोहिमांतही सहभागी होतात, तसेच त्यांना नामजपाचे आत्मिक बळ आणि उत्साहवर्धक सत्संगही देतात. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांना सनातन संस्था मातृ-पितृ तुल्य वाटून त्यांना सनातनचा आधार वाटतो. देशभक्त आणि राष्ट्रप्रेमी हिंदुत्वनिष्ठ तळमळीने राष्ट्रकार्य करत असतात; परंतु ‘यतो धर्मस्ततो जयः ।’ म्हणजे ‘धर्माच्या अधिष्ठानामुळेच ते विजयश्री खेचून आणू शकतात’, हे सनातन संस्थेने त्यांच्यावर बिंबवले आहे. अनेकांनी याची प्रचीती घेतल्यामुळे अनेक हिंदुत्वनिष्ठही साधना करू लागले आहेत. धर्मसंस्थापना हे अवताराचे कार्य आहे. त्यामुळे योग्य वेळ आली की, हिंदु राष्ट्राची स्थापनाही होणार आहे. असे असले, तरी स्वतःचा उद्धार स्वतः (क्रियमाण वापरून) करायचा असल्याने साधना करणे आवश्यक आहे, हे सनातन संस्थेने केलेले मार्गदर्शन हळूहळू राष्ट्र आणि धर्म प्रेमींनाही आता पटू लागले आहे. कुठल्याही राष्ट्र-धर्म विषयक मोहिमा यशस्वी होण्यासाठी, त्यातील सूक्ष्मातील अडथळे दूर होण्यासाठी आवश्यक आध्यात्िमक बळ मिळण्यासाठी सनातनचे संत नामजपादी उपाय करतात. हिंदुत्वनिष्ठांच्या मोहिमांना अशा प्रकारे ईश्वराचे आशीर्वाद प्राप्त करून देऊन त्याच्या विजयाची निश्चिती करण्याचे कार्य सनातन संस्था करते ! येत्या हिंदु राष्ट्राच्या म्हणजेच रामराज्याच्या स्थापनेच्या कार्यात धर्माचे, म्हणजेच ईश्वराचे अधिष्ठान देण्याचे कार्य केल्याने सनातन संस्थेचे नाव विश्वाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले जाईल, यात शंका नाही !

येत्या रामराज्याच्या स्थापनेच्या कार्यात ईश्वरी अधिष्ठानाचे कार्य सनातन संस्थेने केल्याने तिचे नाव इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले जाईल !