‘इस्लामिक स्टेट मॉड्युल’ प्रकरणांत पुणे येथील ४ स्थावर मालमत्ता जप्त !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची कारवाई !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – देशातील आतंकवादी संघटनांचे जाळे उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) पुण्यातील ‘इस्लामिक स्टेट मॉड्यूल’ प्रकरणामध्ये ४ स्थावर मालमत्ता ‘आतंकवाद्यांचे उत्पन्न’ म्हणून जप्त केल्या आहेत. पुणे पोलिसांनी गेल्या वर्षी कोथरूड परिसरातून अटक केलेल्या २ संशयित आतंकवाद्यांनी महाराष्ट्र आणि गुजरात येथे आतंकवादी आक्रमणे करण्याचा कट रचल्याचे उघडकीस आले होते. त्यानुसार वरील कारवाई करण्यात आली आहे.

कोंढवा भागातील जप्त केलेल्या या ४ मालमत्ता ११ आरोपींशी जोडल्या गेल्या आहेत. ज्यांमध्ये ३ जण पसार आहेत. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने या प्रकरणातील ११ जणांवर आरोपपत्र आधीच प्रविष्ट केले आहे. महंमद इम्रान खान, महंमद युनूस साकी, महंमद शाहनवाज, महंमद रिजवान अली, कादीर पठाण, सिमाब काझी, झुल्फिकार अली, बडोदावाला, अब्दुल्ला शेख, तल्हा लियाकत खान, शमिल नाचन आणि आकीफ नाचन यांच्याशी संबंधित या मालमत्ता आहेत. या ४ मालमत्ता सशस्त्र दरोडे टाकून आतंकवादासाठी निधी गोळा करण्यासमवेत ‘आयईडी फॅब्रिकेशन’ प्रशिक्षण कार्यशाळा, गोळीबाराच्या पद्धती, लपून बसण्यासाठी केला जात होता. येथे राहून जंगलांचा शोध घेऊन महाराष्ट्र, गुजरात आणि भारताच्या इतर भागांमध्ये विविध ठिकाणी आक्रमणे करून आतंकवाद पसरवण्याच्या घटना ‘इस्लामिक स्टेट’च्या षड्यंत्राशी संबंधित आहेत.

संपादकीय भूमिका :

आतंकवाद्यांशी संबंधित असे आतंकवाद्यांना आश्रय देणारे तळ शोधून काढून उद्ध्वस्त करणे महत्त्वाचे आहे !