Imam Expelled From France : फ्रान्सच्या राष्ट्रध्वजाला ‘सैतानी ध्वज’ म्हणणार्‍या इमामाची १२ घंट्यांत देशातून हकालपट्टी !

ट्युनिशियाचा इमाम महजूब महजौबीम

पॅरिस (फ्रान्स) – ‘कट्टरतावाद’ पसरवल्याबद्दल फ्रान्स सरकारने ट्युनिशियाचा इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा) महजूब महजौबीम याची देशातून हकालपट्टी केली आहे. इमाम महजूब महजौबीम याने फ्रान्सच्या ‘बॅग्नाल्स-सुर-सेईस’ येथील इटोबा मशिदीमध्ये धर्मांधता पसरवणारे विधान केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर तत्काळ कारवाई करत फ्रान्स सरकारने अटक करून अवघ्या १२ घंट्यांत त्याला देशातून हाकलून दिले.

फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डरमानिन यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले, ‘फ्रान्सने कट्टरतावाद पसरवणष आणि आक्षेपार्ह टिप्पण्या करणे यांंसाठी ट्युनिशियाच्या मुसलमान धर्मगुरूची हकालपट्टी केली आहे. फ्रान्समध्ये धर्मांधतेला थारा नाही.’ इमामला कुठे पाठवण्यात आले आहे, याविषयी डरमानिन यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डरमानिन यांची पोस्ट

इमामाने फ्रान्सच्या राष्ट्रध्वजावर केली होती टीका !

मशिदीतील इमामाच्या प्रवचनाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात इमाम एका ध्वजाला ‘सैतानी ध्वज’ म्हणतांना दिसत आहे. यात तो म्हणतो, ‘जो अल्लाच्या तत्त्वांनुसार चालतो, त्याच्या आयुष्यात अशा झेंड्यांना स्थान नाही. जे तिरंगी झेंडे आम्हाला त्रास देतात आणि ज्यांच्यामुळे आम्हाला डोकेदुखी होते, असे तिरंगे आमच्याकडे नसतील.’ या इमामाने थेट फ्रान्सच्या राष्ट्रध्वजाचे नाव घेतले नसले, तरी फ्रान्सच्या ध्वजामध्ये निळा, पांढरा आणि लाल, असे तीन रंग असल्याने याच ध्वजाविषयी म्हटले गेल्याचे मानले जात आहे.

न्यायालयात आव्हान देणार ! – इमाम

मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून फ्रेंच राष्ट्रध्वजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता, असे इमामाने फ्रेंच प्रसारमाध्यमांना सांगितले. या कारवाईच्या विरोधात न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही इमामाने सांगितले.

संपादकीय भूमिका

भारतात कधीतरी असे होईल का ? भारताने फ्रान्स सरकारकडून शिकले पाहिजे आणि अशी कृती केली पाहिजे !