India On Afghanistan : आतंकवादी संघटनांना आश्रय देण्यासाठी अफगाणिस्तानचा वापर केला जाऊ नये ! – भारत

भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विक्रम मिसरी

बिश्केक (किर्गिस्तान) – भारताचे हित अफगाणिस्तानशी निगडित आहे. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद यांसारख्या आतंकवादी संघटनांना आश्रय अन् प्रशिक्षण देण्यासाठी अफगाणिस्तानचा वापर केला जाऊ नये, असे वक्तव्य भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विक्रम मिसरी यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात केले. विविध देशांच्या सुरक्षा परिषदेचे सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्या येथे आयोजित सहाव्या प्रादेशिक बैठकीत मिसरी संबोधित करत होते. भारतासह रशिया, चीन, इराण, किरगिझस्तान, कझाकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही या बैठकीला उपस्थित होते.

मिसरी पुढे म्हणाले की,

१. अफगाणिस्तानातील अस्थिरता संपूर्ण क्षेत्रासाठी धोका आहे. तेथील शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य यांना भारत नेहमीच पाठिंबा देत आला आहे. शेजारी असल्याने भारत आणि अफगाणिस्तान यांचे आर्थिक अन् सुरक्षा हितसंबंध एकमेकांशी जोडलेले आहेत.

२. अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकारच्या स्थापनेला तसेच महिला, मुले आणि अल्पसंख्यांक यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याला भारतचा सदैव पाठिंबा आहे.

३. भारताने आतापर्यंत अफगाणिस्तानमध्ये २.४९ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. येथील ३४ प्रांतांमध्ये चालू असलेल्या ५०० प्रकल्पांत भारताचा सहभाग आहे. हे प्रकल्प पाणी, वीज, आरोग्य सेवा, शिक्षण, शेती आणि बांधकाम यांच्याशी संबंधित आहेत.