प्रभु आले मंदिरी ।

रामलला

नववधूचे रूप लेऊनी अयोध्या सजली ।
भारत भूवर आज साजरी होतसे दीपावली ।।
सकल हिंदूंच्या नयनांचे हे स्वप्न साकारले ।
रघुनंदनांचे आज मंदिरी पुनरागमन झाले ।। १ ।।

हिंदू अस्मिता जागी झाली अती संघर्षही पेटला ।
कलियुगात या प्रभूंनी लढला न्यायालयीन खटला ।।
‘भूमी रामललाचीच’ निकालात न्यायमूर्ती वदले ।
रघुनंदनांचे आज मंदिरी पुनरागमन झाले ।। २ ।।

अलौकिक कार्याची स्वतः प्रभूंनी योजना आखली ।
भूमीपूजनासाठी श्री. नरेंद्रांची नेमणूक झाली ।।
सोनेरी तो कळस बांधण्यास आदित्यास पाचारले ।
रघुनंदनांचे आज मंदिरी पुनरागमन झाले ।। ३ ।।

पौष द्वादशीचा मुहूर्त आज हा अत्युत्तम लाभला ।
पाच शतकांचा वनवास प्रभूंचा आज पुन्हा संपला ।।
शिशिराच्या या पानझडीतच चैत्र जणू फुलले,
रघुनंदनांचे आज मंदिरी पुनरागमन झाले ।। ४ ।।

‘हमने मंदिर वही बनाया हैं’, सकल हिंदुजन वदले ।
कारसेवकांच्या बलीदानाचे आज स्मरण झाले ।।

कृतज्ञता

ऐतिहासिक सोहळा पाहून आमचे जीवन धन्य झाले ।
रघुनंदनांचे आज मंदिरी पुनरागमन झाले ।। ५ ।।

 

दु:साहस ना करा कुणी करूनी वाकडी नजर ।
रामराज्य हे पुन्हा अवतरले या भारत भूमीवर ।।
योग, शक्ती सामर्थ्यासह प्रभूंचे आशिष आम्हा लाभले ।
रघुनंदनांचे आज मंदिरी पुनरागमन झाले ।। ६ ।।

– सौ. मंजिरी जोशी, पुणे. (१८.१.२०२४)