HOLI Row In AMU : ‘अनुमती मिळो किंवा न मिळो, १० मार्चला विश्‍वविद्यालयात होळी खेळली जाईल !’

अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयाने ‘होळी मिलन’ कार्यक्रमाला अनुमती नाकारल्याने अखिल भारतीय करणी सेनेची चेतावणी

अलीगड (उत्तरप्रदेश) – अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयाच्या परिसरात १० मार्च या दिवशी विद्यार्थ्यांना होळीचा सण साजरा करण्यास विश्‍वविद्यालय प्रशासनाने नकार दिल्यानंतर येथे तणाव निर्माण झाला आहे. ‘होली मिलन’ नावाचा कार्यक्रम येथे सादर करण्यात येणार आहे; मात्र अनुमती नाकारल्याने हिंदूंच्या संघटना आंदोलन करण्याच्या सिद्धतेत आहेत. त्यातच अखिल भारतीय करणी सेनेच्या पदाधिकार्‍यांनी मोर्चा काढला आणि जिल्हाधिकारी कार्यालयात पंतप्रधानांच्या नावे निवेदन सादर केले.

१. करणी सेनेचे ज्ञानेंद्र सिंह चौहान यांनी सांगितले की, १० मार्च या दिवशी रंगभरी एकादशीला विश्‍वविद्यालयामध्ये हिंदु विद्यार्थ्यांसमवेत होळी खेळली जाईल आणि ‘होळी मिलन’देखील होईल. यासाठी अनुमती मिळो अथवा न मिळो. जर या विश्‍वविद्यालयात  इफ्तार (मुसलमानांचे रमझानच्या काळात उपवास सोडणे) आणि ‘ईद मिलन’ आयोजित केले जाऊ शकते, तर ‘होळी मिलन’ का नाही ?

२. या संदर्भात उपविभागीय अधिकार्‍यांनी सांगितले की, विश्‍वविद्यालय परिसरामध्ये कोणत्याही कार्यक्रमासाठी विश्‍वविद्यालयाच्या प्रशासनाने अनुमती द्यावी. याबद्दल चर्चा चालू आहे.

विद्यार्थी नेहमीप्रमाणे होळी खेळू शकतात; मात्र ‘होळी मिलन’ला अनुमती देणार नाही ! – विश्‍वविद्यालय प्रशासन

विश्‍वविद्यालयाच्या प्रशासनाचे म्हणणे आहे की, वर्षानुवर्षे सर्व विद्यार्थी येथील वसतीगृहांतील खोल्या आणि सभागृह येथे आपापसात होळी खेळत आहेत, त्यावर कोणतेही बंधन नाही अन् त्यासाठी कोणत्याही अनुमतीची आवश्यकता नाही; मात्र स्वतंत्र ‘होळी मिलन’ कार्यक्रमासाठी अनुमती देण्यात येणार नाही.

ईदही साजरी होऊ दिली जाणार नाही ! – माजी महापौर आणि भाजप नेत्या शकुंतला भारती यांची चेतावणी

माजी महापौर आणि भाजप नेत्या शकुंतला भारती म्हणाल्या की, हा हिंदुस्थान आहे, पाकिस्तान नाही. विश्‍वविद्यालय कुणाचीही वैयक्तिक मालमत्ता नाही. ज्या पद्धतीने हे लोक ‘होळी खेळली जाणार नाही’, असे म्हणत आहेत, मी असे म्हणत आहे की, तिथे ईदही साजरी होऊ दिली जाणार नाही. ही एक उघड चेतावणी आहे. हा हिंदुस्थान आहे. आम्ही कुणालाही हिंदूंच्या भावनांशी किंवा कुणाच्याही भावनांशी खेळू देणार नाही. होळी आपल्या एकतेचे प्रतीक आहे, प्रेमाचे प्रतीक आहे, त्यागाचे प्रतीक आहे; म्हणून ही घाणेरडी कृत्ये करणे (होली मिलन कार्यक्रमाला अनुमती नाकारणे) थांबवा. आजच मी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांना कळवीन. मी तुम्हाला चेतावणी देते की, येथे होळी साजरी केली जाईल. प्रशासनाने शहाणपणा दाखवावा आणि होळी साजरी करण्यास अनुमती द्यावी.

संपादकीय भूमिका

अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालय केंद्र सरकारच्या अनुदानावर चालते. येथे ईदनिमित्त कार्यक्रम सादर होत असतील, तर हिंदूंचेही सणांचे कार्यक्रम सादर झाले पाहिजेत. जर होत नसतील, तर ‘धर्मनिरपेक्ष’ सरकारने विश्‍वविद्यालयाचे अनुदान बंद केले पाहिजे !