British Hindus Most Eco-Friendly : सर्व धर्मियांमध्ये हिंदू सर्वाधिक पर्यावरणपूरक कृती करतात !

ब्रिटनच्या एका संस्थेने केलेल्या संशोधनातील निष्कर्ष

लंडन (ब्रिटन) – ‘इन्स्टिट्यूट फॉर दी इम्पॅक्ट ऑफ फेथ इन लाईफ’ (श्रद्धेचा जीवनावर प्रभाव पडण्याचा अभ्यास करणे) अर्थात् ‘आय.आय.एफ्.एल्.’ या संस्था हिने एक वैशिष्ट्यपूर्ण संशोधन केले आहे. या संशोधनानुसार, ब्रिटनमध्ये सर्व धर्मियांमध्ये हिंदू  निसर्गरक्षणासाठी प्रत्यक्ष कार्य करण्यात अग्रेसर आहेत, म्हणजेच ते सर्वाधिक पर्यावरणपूरक कृती करतात.

संशोधनातील महत्त्वपूर्ण निष्कर्ष –

१. या संशोधन अहवालात ख्रिस्ती, मुसलमान आणि हिंदू या ब्रिटनमधील तीन सर्वांत मोठ्या धार्मिक समुदायांचे सर्वेक्षण करण्यात आले. ‘तुम्ही कोणत्या देवावर विश्वास ठेवता, यावर तुम्ही अधिक पर्यावरणपूरक आहात कि नाही’, हे ठरते, असे यात सांगण्यात आले.

२. या संशोधनाद्वारे धार्मिक श्रद्धा आणि पर्यावरणवाद यांच्यातील संबंध शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. संशोधकांनी विविध धर्मांतील सदस्यांच्या सखोल मुलाखती घेऊन सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा अधिक खोलवर अभ्यास केला.

३. निकालातून असे दिसून आले की, ब्रिटीश हिंदू पर्यावरणीय गोष्टींत आघाडीवर आहेत, तसेच ते इतर धर्मीय गटांच्या तुलनेत अधिक पर्यावरणपूरक कृती करतात. अभ्यासात असे आढळले की, ६४ टक्के हिंदू पर्यावरण अबाधित राखण्यासाठी प्रयत्नरत आहेत, ७८ टक्के हिंदू निसर्गाच्या हितासाठी सक्रीयपणे स्वतःच्या सवयी पालटतात, तर ४४ टक्के हिंदू हे पर्यावरणीय गटांमध्ये सहभाग घेतात.

४. ९२ टक्के मुसलमान आणि ८२ टक्के ख्रिस्ती यांचा असा विश्वास आहे की, त्यांचा धर्म त्यांना पर्यावरणाची काळजी घेण्यास बाध्य करतो; परंतु त्यांच्याकडून हे नेहमीच कृतीत रूपांतरित होत नाही.

५. हिंदूंना असेही वाटते की, ‘जगातील सर्व वस्तू या देवाप्रमाणे पूज्य आहेत. पूजा ही त्या वस्तूची नसते, तर त्यात व्याप्त देवाची असते. ही भूमिका वास्तवात असा दृष्टीकोन देते की, ज्यामध्ये सर्व काही पवित्र आहे आणि म्हणूनच पर्यावरणाची काळजी घेणे, म्हणजे देवाची पूजा करणे आणि सर्व सृष्टीची सेवा करणे होय; कारण सर्व सृष्टी ईश्वरात खोलवर जोडलेली आहे.’

६. वयाचा विचार करता १८ ते २४ वर्षे वयोगटातील ४६ टक्के तरुणांना वाटते की, ‘देव स्वत: पर्यावरणवादी आहे’, तर ६५ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील केवळ १७ टक्के लोकांना असे वाटते.

हिंदु धर्माची अद्वितीय शिकवणच हिंदूंना अधिक पर्यावरणपूरक बनवते !

आय.आय.एफ्.एल्.च्या संशोधन मंडळाच्या सदस्या अमांडा मुर्जन म्हणाल्या की, हिंदु धर्मात सर्व अस्तित्वाच्या परस्परसंबंधावर जोर दिला जातो, ज्यामुळे पर्यावरणीय नीतीमत्ता खोलवर रुजते. हिंदु धर्माच्या शिकवणीनुसार, ‘निसर्ग हा केवळ साधन नाही, तर त्याला पवित्र घटक मानले गेले आहे. सर्व काही ईश्वरात आहे’, ही श्रद्धा मानवाला सर्व अस्तित्वाशी जोडते आणि निसर्ग संवर्धनाचे अंतर्भूत दायित्व अधिक सशक्त करते.’

‘द गार्डियन’ने काही ब्रिटीश हिंदू, मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्याशी या संशोधनाविषयी चर्चा केली. ‘श्रद्धा आणि पर्यावरण यांचा समन्वय कसा साधला जातो ?’, हा या चर्चेचा विषय होता. नोकरी करणार्‍या ३५ वर्षीय बन्सरी रूपारेल म्हणाल्या की,

१. हिंदु धर्मात सर्व काही पर्यावरणाशी किंवा पर्यावरणाची काळजी घेण्याशी आणि दयाळूपणाशी संबंधित आहे.

२. हिंदु परंपरेनुसार सूर्यास्तानंतर आपण झाडांवरून फुले किंवा पाने तोडत नाही; कारण ती झोपलेली असतात किंवा विश्रांती घेत असतात. जेव्हा आपण फुले तोडतो, तेव्हा आपण मनात विचारायला हवे, ‘मी फूल तोडत आहे, तर तुला (झाडाला) काही हरकत आहे का ?’

३. हिंदु धर्म कर्मावर आधारित आहे. ‘जे कर्म करतो, त्यानुसार त्याला तसे फळ मिळते. आपण या जन्मात जे करतो, त्याचा पुढील जन्मावर परिणाम होतो; कारण पुनर्जन्म आहे.

४. मी अधिक प्लास्टिक वापरत नाही आणि माझी उत्पादने पर्यावरणपूरक असतील, याची मी निश्चिती करते.

५. तरुण पिढी, जसे की ‘जेन झी’ (वर्ष १९९६ ते २०१० या कालावधीत जन्मलेली पिढी), माझ्या लहानपणीपेक्षा पर्यावरणवादाकडे अधिक झुकलेली दिसून येते.

६. पर्यावरण हे आपल्या मानवी शरिराचे प्रतिबिंब आहे. उदाहरणार्थ झाड कापले की, त्याचे खोड आपल्या बोटांच्या ठशांसारखे दिसते. निसर्गातील अनेक गोष्टी आपल्या शरिराचे प्रतिबिंब असतात. हे सर्व परस्परसंबंधित आहे आणि हिंदु धर्म आपल्याला हेच शिकवतो की, स्वतःला पर्यावरणाचा भाग माना आणि मनुष्य अन् निसर्ग यांच्यातील संबंधाचा सन्मान करा.

संपादकीय भूमिका

  • हिंदु धर्मात तत्त्वज्ञानापेक्षा कृतीला, म्हणजेच प्रत्यक्ष कर्माला सर्वाधिक महत्त्व आहे. ज्ञानाधारित कर्मामुळेच हिंदू केवळ भारतातच नाही, तर जगातील प्रत्येक देशात सर्वाधिक योगदान देणार्‍या समुहांपैकी एक आहेत, हे या संशोधनातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले एवढेच !
  • हिंदूंना ‘पर्यावरणपूरक’ होण्याचा उपदेश करणार्‍यांना आता ब्रिटनचा हा अहवाल दाखवून जाब विचारला पाहिजे !