मकरसंक्रांतीच्या दिवशी रामनाथी आश्रमात होणार्या ‘श्री ज्वाला नरसिंह होमा’चा सर्वत्रच्या साधकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा !‘सध्या सर्वत्रचे सनातनचे संत, साधक आणि त्यांचे परिवारजन यांना होणार्या शारीरिक त्रासांमध्ये पुष्कळ वाढ झाल्याचे लक्षात येत आहे. सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे मकरसंक्रांतीच्या दिवशी (१५.१.२०२४ या दिवशी) श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सर्व संत, साधक आणि त्यांचे परिवारजन यांच्या आरोग्यासाठी ‘ज्वाला नरसिंह’ होम करणार आहेत. सर्व साधकांनी या दिवशी श्रीविष्णूच्या श्री नरसिंह रूपाला प्रार्थना करून या होमाचा सूक्ष्मातून लाभ घ्यावा. भगवान श्रीविष्णूचा श्री नरसिंह अवतार हा भक्ताला प्रतिकूल परिस्थितीवर विजयप्राप्ती करून देणारा आहे. तो आशेची सर्व चिन्हे संपल्यावर भक्तांसमोर प्रकट होणार्या भगवत्रूपी आधाराचा प्रतीक आहे. मनुष्याची सहनशक्ती संपत येत असतांना साहाय्याला येणार्या ईश्वरी आधारस्तंभाचे उदाहरण, म्हणजे भगवंताचा श्री नरसिंह अवतार होय ! आजच्या मकरसंक्रांतीच्या दिवशी श्रीविष्णूच्या श्री नरसिंह रूपाला शरण जाऊन त्याला आळवूया.’ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (११.१.२०२४) |
१. महर्षींनी सनातन संस्थेचे संत आणि साधक यांच्या आरोग्यासाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना नरसिंहपूर (सांगली) येथील ‘श्री ज्वाला नरसिंह’ मंदिरात जाऊन प्रार्थना करण्यास सांगणे
‘कांचीपूरम् येथे झालेल्या २३७ व्या सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचनात महर्षींनी सांगितले, ‘गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे संत आणि साधक यांना विविध प्रकारचे शारीरिक त्रास होत आहेत. ताप, सर्दी, खोकला यांसह साधकांचा अपघात होणे, साधकांना शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागणे, कर्करोगासारख्या भयंकर व्याधींना तोंड द्यावे लागणे, दातांचे त्रास होणे इत्यादी विविध शारीरिक त्रास होत आहेत. धर्म-अधर्म यांच्या लढ्यात सूक्ष्मातील अनिष्ट शक्ती साधकांना अशा प्रकारे त्रास देत आहेत, तसेच कालमाहात्म्यानुसार मनुष्याच्या समष्टी पापांमुळे वैश्विक स्तरावर अनेक व्याधी वाढत आहेत. अशा वेळी साधकांच्या आरोग्यासाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगली जिल्ह्यातील नरसिंहपूर येथील ‘श्री ज्वाला नरसिंह’ मंदिरात जाऊन प्रार्थना करायची आहे.’
२. महर्षींनी दत्तजयंतीला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘श्री ज्वाला नरसिंहा’ची विशेष पूजा करण्यास आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना मकरसंक्रांतीला ‘ज्वाला नरसिंह होम’ करण्यास सांगणे
महर्षि सांगतात, ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा जन्म सांगली शहरात झाला आहे. त्यांच्या जन्मस्थानापासून ५० कि.मी. अंतरावर कृष्णा नदीच्या काठी हे नरसिंहाचे मंदिर आहे. दत्तजयंतीला, म्हणजे २६.१२.२०२३ या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री ज्वाला नरसिंहा’ची विशेष पूजा करावी आणि मकरसंक्रांती, म्हणजे १५.१.२०२४ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘ज्वाला नरसिंह होम’ करावा.’
३. सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी दत्तजयंतीच्या दिवशी ‘ज्वाला नरसिंह’ मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने विशेष पूजा करणे
सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी दत्तजयंतीच्या दिवशी नरसिंहपूर येथील ‘ज्वाला नरसिंह’ मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने विशेष पूजा केली. या वेळी पुजार्यांनी आधी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून साधकांच्या आरोग्यासाठी संकल्प करून घेतला. त्यानंतर श्री नरसिंहाच्या मूर्तीची पूजा केली आणि अलंकार घालून शेवटी आरती केली. या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे आई-वडील (सनातनच्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे अन् पू. सदाशिव परांजपे) हेही उपस्थित होते.
४. श्री ज्वाला नरसिंह मंदिरात प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य श्री. नाना घळसासी आणि सौ. कुमुद घळसासी यांचे दर्शन होणे
योगायोग म्हणजे या वेळी प.पू. भक्तराज महाराज यांचे जवळचे शिष्य श्री. व्यंकटेश नारायण घळसासी (सर्व जण त्यांना प्रेमाने ‘नाना’ म्हणतात) यांची नरसिंह मंदिरात भेट झाली. कोळे नरसिंहपूर हे त्यांचे मूळ गाव असून मंदिराच्या जवळच त्यांचे घर आहे. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सौ. कुमुद घळसासी यांनी सर्वांना प.पू. बाबांच्या सेवेतील अनमोल क्षणांची काही उदाहरणे सांगून साधकांमध्ये गुरुसेवेचा ध्यास जागृत केला. श्री. घळसासी यांनी नरसिंह मंदिराचा इतिहासही सांगितला. श्री. आणि सौ. घळसासी यांच्याकडे प.पू. भक्तराज महाराज यांची गादी आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आणि त्यांच्या समवेतच्या सर्वांनी श्री. घळसासी यांच्या घरी जाऊन प.पू. बाबांच्या गादीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे श्री. घळसासी यांच्या घरी प.पू. चिले महाराजही येऊन गेले आहेत. सनातनच्या कार्याला घळसासीकाकांच्या माध्यमातून प.पू. भक्तराज महाराज यांचे आशीर्वाद लाभले.
५. कुठे आहे ‘ज्वाला नरसिंह मंदिर’ ?
सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठी ‘कोळे नरसिंहपूर’ नावाचे गाव आहे. सांगलीपासून अदमासे ५० कि.मी. आणि ईश्वरपूर (इस्लामपूर) पासून १२ कि.मी. अंतरावर हे गाव आहे. येथे कृष्णा नदीच्या काठी १६ हातांच्या ‘ज्वाला नरसिंह’चे मंदिर आहे. गुरुचरित्रामध्ये या गावाचा उल्लेख आढळतो. जवळच ‘बहे’ नावाचे गाव आहे, जेथे समर्थ रामदासस्वामींनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी एक मारुति कृष्णा नदीच्या काठी असलेल्या रामलिंग बेटावर आहे. त्यामुळेही नरसिंहपूरला ‘बहे नरसिंहपूर’ असे म्हणतात.
६. कोळे नरसिंहपूर येथील ‘ज्वाला नरसिंहमूर्ती’चा महिमा
कृष्णा नदीचे माहात्म्य सांगणार्या ‘कृष्णा माहात्म्य’ नावाच्या ग्रंथात पुढील श्लोकाचा उल्लेख आढळतो.
यदा पुनस्तदा भक्त्या तपः कर्तुं पराशरः ।
नारसिंहं तदा ध्यायन् कृष्णा तीरे मुनीश्वरः ॥
अर्थ : श्रेष्ठ मुनी पराशर यांनी कृष्णा नदीच्या तीरावर भक्तीभावाने भगवान नरसिंहाचे ध्यान करून तपस्या केली.
असे म्हटले जाते की, एकदा पराशरऋषींना हिरण्यकश्यपूचा वध करणार्या नरसिंह अवताराच्या दर्शनाची इच्छा झाली. पराशरऋषींनी नरसिंहाचे ध्यान करत कठीण तपश्चर्या केली. ऋषींच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवंताने त्यांना त्याच्या १६ भुजांच्या नरसिंह रूपाचे दर्शन दिले. हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन वध करणार्या नरसिंहाच्या रूपाला ‘ज्वाला नरसिंह’ असे म्हटले आहे; कारण ते मारक रूप आहे. भगवंताने ज्या रूपात पराशरऋषींना दर्शन दिले, त्याच मूर्तीरूपात भगवंत अंतर्धान पावले. पराशरऋषींनी त्या मूर्तीचे कृष्णा नदीत विसर्जन केले. २००० वर्षांपूर्वी भगवंताने एका भक्ताला स्वप्नदृष्टांत देऊन ही मूर्ती बाहेर काढून घेतली. त्यानंतर तेथील राजाच्या साहाय्याने एक मंदिर बांधण्यात आले. आज त्याच मंदिरात श्री ज्वाला नरसिंहाची सुंदर मूर्ती भक्तांना दर्शन देण्यासाठी उभी आहे. या मंदिरात गेल्यावर भक्तांना भगवंत साक्षात् असल्याची प्रचीती येते.
७. कृतज्ञता
मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम् ।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ॥
अर्थ : ज्याची कृपा मुक्यालाही बोलते करते आणि पांगळ्यालाही पर्वत ओलांडण्यास समर्थ बनवते, त्या परमानंदस्वरूप माधवाला (श्रीकृष्णाला) मी नमस्कार करतो.
या संस्कृत श्लोकानुसार सनातनच्या तिन्ही गुरूंची अपार कृपा सनातनच्या सर्व साधकांवर आहे. साधकांच्या आरोग्यासाठी स्थुलातून गुरूंना काही करण्याची आवश्यकता नाही, तरीही साधकांसाठी सतत झटणार्या तिन्ही गुरूंच्या चरणी आम्ही सनातनचे सर्व साधक कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– श्री. विनायक शानभाग, कांचीपूरम्, तमिळनाडू.
(११.१.२०२४)
|