पेजावर मठाचे विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांची स्पष्टोक्ती !
बेंगळुरू (कर्नाटक) – श्रीराममंदिर टिकवायचे असेल, तर भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाले पाहिजे. कन्नड लोक बहुसंख्य असलेल्या राज्याला ‘कर्नाटक’ म्हणतात, तर हिंदु बहुसंख्य असलेल्या भारताला ‘हिंदु राष्ट्र’ का म्हणू नये ?, असा प्रश्न उडुपी पेजावर मठाचे विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांनी उपस्थित केला. अयोध्येतील श्रीराममंदिरात श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळा समीप आला असतांना हिंदु राष्ट्राविषयी चर्चा होत असल्याविषयी विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी एका दूरचित्रवाहिनीवर बोलत होते. विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी हे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्यही आहेत.
पेजावर मठाचे विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी पुढे म्हणाले की,
१. कर्नाटक हे कन्नड भाषिक बहुसंख्यांक असलेले राज्य आहे. कन्नड भाषेने जन्म घेऊन ती वृद्धींगत झालेले हे स्थान आहे. हिंदू बहुसंख्य असलेल्या देशाला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणण्यात चूक काय आहे ? हे चूक असेल, तर कर्नाटक म्हणणे देखील चूक ठरेल.
२. हिंदू नित्यपठण करत असलेल्या तीर्थक्षेत्रांचा विकास झाला पाहिजे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदूंची धार्मिक क्षेत्रेदेखील मुक्त करायला हवी होती; परंतु आपली धार्मिक क्षेत्रे तशीच राहिली. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, तरी मुक्त झालेली नाहीत. आमची श्रद्धास्थाने आम्हाला परत मिळाली पाहिजेत.
३. अयोध्येच्या संदर्भात आलेल्या निर्णयाप्रमाणे काशी आणि मथुरा यांच्या संदर्भातही न्यायालयाने अनुकूलता दर्शवली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही हृदयपूर्वक स्वागत करतो. ध्येय साध्य होईपर्यंत हे कार्य थांबू नये. आम्ही बलपूर्वक कोणतेही क्षेत्र घेत नाही. लोकशाही असलेल्या राष्ट्रात राज्यघटनेच्या आधारे कार्य करत आहोत. सर्वांनी याला पाठिंबा दिला पाहिजे. विरोध करू नये.
हिंदु राष्ट्राविषयीच्या पेजावर मठाचे विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांच्या विधानावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, हा देश ‘हिंदु राष्ट्र’ व्हावा, हा भाजपचा सिद्धांत आहे. आपला देश हिंदूंचे राष्ट्र नाही. हा अनेकांचा देश आहे. केवळ हिंदु राष्ट्र करणे शक्य नाही. |
विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांच्या विधानाचा सिद्धरामय्या यांनी विरोध करणे योग्य नाही ! – माजी मंत्री प्रमोद मध्वराज
कर्नाटकातील माजी मंत्री प्रमोद मध्वराज म्हणाले की, या देशात बहुसंख्यांक हिंदूच आहेत. पेजावर मठाचे विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी हे हिंदु समाजाचे मार्गदर्शक आहेत. राज्यघटनेने सर्वांना भाषणस्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विरोध करणे योग्य नाही. पेजावर श्रींनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.