नागपूर, ७ डिसेंबर (वार्ता.) – सध्या शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेविषयी विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांच्यापुढे सुनावणी चालू आहे. ७ डिसेंबरपासून ही सुनावणी चालू झाली आहे. ७ डिसेंबर या दिवशी याविषयी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधतांना अधिवक्ता राहुल नार्वेकर म्हणाले, ‘‘विधानसभेचा सदस्य म्हणून अपात्र झालेली व्यक्ती विधान परिषदेची निवडणूक लढू शकते; मात्र तिच्यावर कोणत्याही प्रकारचा गंभीर गुन्हा नोंद नसावा किंवा वयाची ३० वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे.’’ यावरून त्यांनी ‘शिवसेनेचे आमदार अपात्र ठरले, तरी त्यांना विधान परिषदेचे सदस्य होता येईल’, असे अप्रत्यक्षरित्या म्हटले आहे. विधान परिषदेच्या सभापती सौ. नीलम गोर्हे या वेळी उपस्थित होत्या.
या वेळी अधिवक्ता राहुल नार्वेकर म्हणाले, ‘‘सर्वाेच्च न्यायालय आणि विधीमंडळ दोन्ही स्वायत्त संस्था आहेत. दोघेही एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत. असे असले, तरी सर्वाेच्च न्यायालय संविधानिक संस्था असल्यामुळे त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आमदारांच्या पात्रतेविषयीचा निर्णय ३१ डिसेंबरपूर्वी होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या पात्रतेविषयीचा निर्णय ३१ जानेवारीपर्यंत घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू असल्यामुळे सभगृहाचे काम संपल्यानंतर अतिरिक्त वेळेत हे सुनावणीचे काम होईल.’’