Indian Navy Day 2023 : छत्रपती शिवरायांच्या विजिगीषू वृत्तीचा जयघोष करत ‘भारतीय नौदल दिन’ साजरा करूया !

आज ४ डिसेंबर २०२३ ‘भारतीय नौदल दिन’ आहे. त्या निमित्ताने छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या आरमाराचा, म्हणजेच हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचा थोडक्यात इतिहास पाहूया.

‘भारतीय नौदल दिन’

१. भारतातील आरमाराचा इतिहास आणि स्वराज्यासाठी त्याची आवश्यकता !

अष्टौ गुणा पुरुषं दीपयन्ति प्रज्ञा सुशीलत्वदमौ श्रुतं च।
पराक्रमश्चाबहुभाषिता च दानं यथाशक्ति कृतज्ञता च॥

अर्थ : बुद्धी, चांगले चारित्र्य, आत्मसंयम, ज्ञान, शौर्य, मितभाषी असणे, स्वतःच्या क्षमतेनुसार दानधर्म करणे आणि कृतज्ञता हे ८ गुण माणसाला शोभून दिसतात.

छत्रपती शिवाजी महाराज

हा श्लोक वाचल्यानंतर असे वाटते की, सुभाषितकाराने छत्रपती शिवरायांना समोर ठेवून हा श्लोक रचला असावा. शिवरायांच्या काळात जेवढ्या इस्लामी सत्ता होत्या, त्या सर्व इस्लामी सत्ताधिशांनी आरमाराकडे लक्ष दिले नाही. ११ व्या शतकात चोल राजा रामराज याने आरमाराकडे लक्ष दिले होते. आरमाराकडे लक्ष देणारा तोच शेवटचा हिंदु राजा होता. १५ व्या शतकात संगमेश्वरचा जखुराय नावाचा एक जहागीरदार होऊन गेला. तथापि चोल राजा रामराज याच्यानंतर ६०० वर्षांनी छत्रपती शिवरायांनी आरमाराची स्थापना केली.

२. सागरावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची आवश्यकता जाणणारे छत्रपती शिवराय !

नौकेत बसलेले छत्रपती शिवराय

शिवरायांना सागरावरच्या शत्रूची चाहूल लागली. सागरावर वर्चस्व प्रस्थापित केलेल्या बलाढ्य शत्रूच्या विरोधात तेवढ्याच सामर्थ्याने उभे रहावे लागणार होते. त्याची शिवरायांना जाणीव होती. १६ व्या शतकापासून पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच आणि डच या सत्ता स्वतःच्या आरमाराच्या बळावर हिंदुस्थानावर स्वारी करून आल्या. त्यांनी कोलकाता, चेन्नई, गोवा, वेंगुर्ला, राजापूर, मुंबई, सुरत अशा विविध ठिकाणी स्वतःच्या वसाहती निर्माण केल्या. हे सर्व पाहूनही त्या वेळच्या सत्ताधिशांनी आरमार उभारण्याचा साधा विचार केला नाही. ‘आपले स्वतःचे आरमार असावे’, असे त्यांना वाटले नाही. आपले समर्थ आरमार निर्माण करण्यासाठी कुणीही पुढे सरसावले नाही. याला अपवाद शिवरायांचा होता.

३. स्वराज्य टिकवण्यासाठी कोकण किनार्‍यावर बळकट दुर्गांची उभारणी !

हिंदवी स्वराज्याचा विस्तार करणे, हे शिवरायांचे ध्येय होते. त्यांना कोकणातही स्वराज्याचा विस्तार करायचा होता. हिंदवी स्वराज्य तेथे टिकवायचे असेल, तर स्वतःचे सामर्थ्यशाली आरमार आणि बळकट जलदुर्ग असलेच पाहिजेत, हे शिवरायांनी ओळखले होते. आरमार उभे करायचे, तर बंदर आणि गोद्या (जहाज उभे करण्यासाठीचे ठिकाण) हव्यात. वर्ष १६५६ – १६५७ पासून शिवरायांनी आरमाराच्या उभारणीला प्रारंभ केला. त्यांनी सिंधुदुर्ग, खांदेरी यांसारखे दुर्ग उभे केले. विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग यांसारखे बळकट दुर्ग कोकणच्या किनार्‍यावर उभे करून बळकट दुर्गांची माळ निर्माण केली. यापूर्वी कोणत्याही राजाने जलदुर्ग उभारण्याचा विचारही केला नव्हता.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाची पहाणी करतांना छत्रपती शिवराय

४. मराठ्यांच्या आरमाराचा स्थापना दिवस : आश्विन कृष्ण द्वादशी !

वर्ष १६५६ मध्ये कल्याण आणि भिवंडी येथे भगवा डौलाने फडकला. त्याच शुभमुहूर्तावर शिवरायांनी कल्याणला लढाऊ नौका बांधण्याच्या कार्याला आरंभ केला. विजयदुर्गाजवळ गडनदीच्या खाडीत जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती यांसाठी गोद्या बांधल्या. महानायक भंडारी, कान्होजी आंग्रे, धुळप अशी अनेक निष्ठावान मंडळी समर्थपणे आरमाराची धुरा सांभाळत होते. या विरांनी मराठ्यांच्या आरमाराचा वचक शत्रूवर बसवला होता. छत्रपती शिवरायांनी आरमाराची स्थापना केली, तो दिवस २४ ऑक्टोबर १६५७ म्हणजे आश्विन कृष्ण द्वादशी अर्थात् वसुबारस शके १५७९. या पारंपरिक सणाच्या, वसुबारसेच्या दिवशी आपल्या राष्ट्राचे आणि संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी शिवरायांनी आरमार स्थापन केले.

श्री. दुर्गेश परुळकर

आरमार म्हणजे राज्याचे एक स्वतंत्र अंग आहे. ‘ज्याच्याकडे अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आणि ज्याच्या जवळ समर्थ आरमार त्याचा समुद्र !’, या उक्तीला अनुसरून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरावरून होणार्‍या आक्रमणाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन स्वतःच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली.

५. आरमार दिनानिमित्त छत्रपती शिवरायांच्या विजिगीषु वृत्तीचा जयजयकार !

आपल्या देशाची परंपरा ही शौर्याची, विजयाची आहे. ‘अन्यायावर न्यायाने विजय संपादन करावा, अत्याचारावर प्रत्याचाराने, असत्यावर सत्याने, अज्ञानावर ज्ञानाने आणि तमावर तेजाने विजय संपादन करावा’, अशी शिकवण देणारी आपली संस्कृती आहे. या संस्कृतीचा थोर उपासक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सर्वांनाच प्रातःस्मरणीय आहेत. त्यांच्या क्षात्रतेजाचे स्मरण आपण नेहमीच ठेवले पाहिजे. या परमप्रतापी राष्ट्रपुरुषाच्या विजिगीषु वृत्तीचा जयघोष करत ‘भारतीय नौदल दिन’ साजरा करूया.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (९.११.२०२३)

संग्रहित रंगीत चित्रे (पेंटींग) : संकेतस्थळावरून साभार