राज्यात पुणे प्रादेशिक विभागात सर्वाधिक ४० टक्के प्रतिसाद !
पुणे – महावितरणच्या ‘गो ग्रीन योजने’च्या अंतर्गत वीजदेयकासाठी छापील कागदांचा वापर न करता केवळ ‘ई-मेल’ आणि लघुसंदेश यांचा पर्याय निवडत पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी २ लाखांचा टप्पा गाठला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील २ लाख ११३ वीजग्राहकांनी या पर्यावरणपूरक योजनेला पसंती दिली. या योजनेमुळे ग्राहकांना वार्षिक २ कोटी ४० लाख १३ सहस्र ५६० रुपयांचा लाभ होत आहे. पर्यावरणात होत जाणार्या पालटांमुळे ‘गो ग्रीन योजना’ ही काळाची आवश्यकता झाली आहे. या योजनेतील पुणे प्रादेशिक विभागाचा प्रतिसाद कौतुकास्पद आहे. इतर वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी केले आहे.
आतापर्यंत राज्यात ५ लाख २४५ पर्यावरणस्नेही वीजग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत. यात सर्वाधिक ४० टक्के प्रतिसाद पुणे प्रादेशिक विभागात मिळाला असून महाराष्ट्र राज्याच्या एकूण १६ परिमंडलामध्ये सर्वाधिक पुणे परिमंडलामध्ये १ लाख ४३ सहस्र ३६८ वीजग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत. त्यांना १ कोटी ७२ लाख ४ सहस्र १६० रुपये लाभ होत आहे. सातारा जिल्ह्यातील १३ सहस्र १५३ ग्राहकांना १५ लाख ७८ सहस्र ३६० रुपये, सांगली जिल्ह्यातील ११ सहस्र ३१६ ग्राहकांना १३ लाख ५७ सहस्र ९२० रुपयांचा वीजदेयकामध्ये वार्षिक लाभ होत आहे.