वर्ष १९९० पासून बनावट कागदपत्रांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे उघड !
आळेफाटा (जिल्हा पुणे) – बनावट कागदपत्रांच्या आधारे ३ दशकांपासून बेल्ह्यात वास्तव्यास राहून वैद्यकीय व्यवसाय करणार्या सुकुमार बिश्वास या बांगलादेशी बोगस आधुनिक वैद्याला आतंकवादविरोधी पथकाने २६ डिसेंबर या दिवशी अटक केली. हा बांगलादेशी वर्ष १९९० पासून बनावट कागदपत्रांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करत होता. बिश्वासने जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कल्याण, मुंबई आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा आणि भूमी खरेदी केल्या. (जागा आणि भूमी खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे रक्कम कुठून आली ? याचे अन्वेषण होणे आवश्यक आहे. – संपादक) त्यांच्याविरुद्ध आतंकवादविरोधी पुणे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनील गायकवाड यांनी तक्रार दिल्यानंतर आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सुकुमार बिश्वास आणि त्यांची पत्नी ललिता या दोघांचे पारपत्र, व्हिसा, पॅन, आधारकार्ड, शिधापत्रिका, मतदान ओळखपत्र, बँकेचे धनादेश, पतसंस्था आणि बँकेच्या खात्याची एटीएम कार्ड, त्यांनी केलेल्या आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे आतंकवादविरोधी पथकाने जप्त केली आहेत.
संपादकीय भूमिकाबांगलादेशी तरुण ३ दशकांपासून बनावट कागदपत्रांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करत होता, हे पोलिसांच्या लक्षात कसे आले नाही ? आरोग्य विभागाने त्याला बोगस ठरवून वैद्यकीय व्यवसायाला घातलेली बंदी पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकार्यांनी कोणत्या कागदपत्रांच्या आधारावर रहित केली, याची चौकशी होऊन संबंधित अधिकार्यांवर कारवाई होईल का ? |