१. सहस्रो वर्षे मंदिरे टिकवून ठेवणारे अद्भुत वास्तुशास्त्र
‘वास्तविक मंदिराची वास्तू किंवा शिल्पशास्त्र यांचा अद्याप पूर्णपणे उलगडा करण्यात आलेला नाही. पूर्वी मंदिराचे बांधकाम करण्यासाठी वास्तूशास्त्राचे विशेष पुस्तक नव्हते. विविध मंदिरांचे विविध प्रकारचे वास्तूशास्त्र आहे. भारतात विविध भौगोलिक स्थितीमध्ये मंदिरे बांधण्यात आली आहेत. अनेक मंदिरे जंगलांमध्ये, समुद्राजवळ, पर्वतांवर, तर काही पाण्यात बांधलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या वास्तूशास्त्रामध्ये विविधता आहे. मला वाटते की, सध्या वास्तूशास्त्रात पुष्कळ संशोधन झाले असून अनेक पुस्तकेही लिहिण्यात आली आहेत. असे असले, तरी यासंदर्भातील ज्ञानाविषयी अजूनही आपण पुष्कळ अनभिज्ञ आहोत. आता मंदिरांचे बांधकाम वास्तूरचनाकाराच्या खोलीत होते. जुन्या मंदिरांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला जातो. काही मंदिरे, तर हिंदु शैलीत बनतही नाहीत. हिंदु मंदिरात गर्भगृह, भोगमंडप, पंचरथ अशा विविध गोष्टी असतात. भारतात अशीही काही मंदिरे आहेत, ज्यांच्या गर्भगृहात वर्षातून एकदाच सूर्याची किरणे पडतात. त्यामागे त्यांची तीक्ष्ण बुद्धीमत्ता होती. अनेक भूकंपाच्या वेळी इमारती पडल्या; पण मंदिरे जशीच्या तशी उभी आहेत.
अलीकडेच मी महानदी खोर्याचे वारसा सर्वेक्षण (हेरिटेज सर्व्हे) केलेे. हे सर्वेक्षण करतांना आम्ही नदीच्या दोन्ही किनार्यांवर काय काय आहे, हे पहातो. तेव्हा आमच्या लक्षात आले की, ६३ मंदिरे ही नदीमध्ये आहेत. पूर्वी धरण नव्हते. नदी स्वत:च तिची दिशा पालटत असे. शैव मंदिरे नदीच्या किनार्यावर उभारण्यात येत होती. पुराच्या वेळी मंदिरच नाही, तर गावही पाण्याखाली जात असे. त्यामुळे गाव पुनर्स्थापित होत होते. तेव्हा गावकरी त्या मंदिरातील शिवलिंग किंवा प्रतिमा आदी घेऊन नवीन मंदिर बनवत होते. हळूहळू हे मंदिर नदीच्या मधोमध येत होते. ६३ मंदिरे नदीच्या मध्यात असल्याचे आमच्या लक्षात आले. अशी कितीतरी मंदिरे असतील, जी आपल्याला माहिती नाहीत. उन्हाळ्याच्या दिवसांत मंदिरे उघडी पडतात. आश्चर्य, म्हणजे ८०० ते १ सहस्र वर्षांनंतरही नदीच्या मध्ये असलेली मंदिरे अजूनही उभी आहेत, काही ढासळली आहेत, तर काही एका बाजूने कलली आहेत आणि काही नष्टही झाली असतील. अशा मंदिरांचे आम्ही पाण्याच्या आत जाऊनही सर्वेक्षण केले आहे.
२. नदीच्या पाण्यात असलेली मंदिरे अन्यत्र हालवण्याविषयी भारतीय पुरातत्व विभागाची अनास्था
मंदिरे अन्य ठिकाणी स्थापित करण्याविषयी आम्ही भारतीय पुरातत्व विभागाला विनंती केली. ६० वर्षांपूर्वी जेव्हा अस्वान धरणाचे बांधकाम होत होत होते, तेव्हा इजिप्तमध्ये अबूसिंबेल मंदिर होते. त्याला ‘युनेस्को’ने २ किलोमीटर लांब पुनर्स्थापित केले आहे. भारतातही नागार्जुन धरण बनत असतांना तेव्हाच्या पुरातत्व विभागाने २ मंदिरांचे अन्य ठिकाणी स्थानांतर केले होते. अशा प्रकारे
७००-८०० वर्षे जुनी ६३ मंदिरे पुनर्स्थापित होऊ शकतात; पण पुरातत्व विभागाने हे काम आजतागायत केले नाही. हे एकट्या ओडिशाचे उदाहरण आहे. अशा प्रकारे अनेक मंदिरे संपूर्ण भारतात पहायला मिळतील. पुरातत्व विभागाचे प्राधान्य ताजमहल, कुतूबमिनार, हुमायूचे थडगे, लाल किल्ला, खजुराहो इत्यादी गोष्टींना असते.
हिंदूंनाच मंदिरांचा उद्धार करावा लागेल !
केवळ ओडिशात ६ सहस्र ५०० मंदिरांची नोंदणी मी स्वत: केली आहे. सरकारला सर्वच मंदिरांचा उद्धार करणे शक्य नाही. यासाठी लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग हवा. त्यातही हिंदूंनाच हे कार्य करावे लागेल. भारताच्या राज्यघटनेत मूलभूत अधिकारांसमवेत मूलभूत कर्तव्यही दिले आहेत, ज्याकडे कुणी लक्ष देत नाही.
– श्री. अनिल धीर
३. गड-दुर्गांवरील धर्मांधांचे अतिक्रमण काढण्याकडे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे दुर्लक्ष
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ही जगभरातील अतिशय जुनी संस्था आहे. जगात सर्वाधिक काम कोणत्या पुरातत्व संस्थेने केले, तर ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने केले आहे. केवळ भारतातच नाही, तर दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया खंडात भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे कार्य आहे. तालिबानने तोडलेल्या बौद्ध मूर्तींचे संवर्धनही भारतानेच केले होते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचा ‘रेकॉर्ड’ अतिशय चांगला आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एखादी संस्था जेव्हा फार जुनी होते, तेव्हा त्यात शिथिलता येते. यासंदर्भात अलीकडच्या २० वर्षांत राजकीय, स्थानिक किंवा त्यांचे अधिकारी यांची अनास्था दिसून येते. गड-दुर्गांवर पुरातत्व सर्वेक्षणाचे सुरक्षारक्षक असतात. तेथे अतिक्रमणाला प्रारंभ होतो, तेव्हाच ते का थांबवत नाही ? भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे कायदेही अतिशय कठोर आहेत. त्यामुळे अतिक्रमण हटवण्यासाठी न्यायालयातही जाण्याचीही आवश्यकता नाही. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे अधिकारी अशा अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करतात. हे अतिक्रमण काढायला जेवढा उशीर होतो, तेवढे ते काढणे कठीण होते. अतिक्रमण दर्ग्याचे असो किंवा मंदिराचे ते काढले गेले पाहिजे. अतिक्रमण हे केवळ हिंदु बांधकामांवरच होते. ते कधी चर्च किंवा मशीद यांच्या मालमत्तेवर होत नाही. अनेक हिंदु राजांच्या गड-दुर्गांवर कुणी जात नाही किंवा कदाचित तेथे सुरक्षारक्षकही नसेल. त्याचा अपलाभ धर्मांध उठवतात.
४. हिंदु, बौद्ध, जैन आणि शीख यांच्या वारसा स्थळांची श्रेणी ठरवणे आवश्यक !
ओडिशात अनेक मंदिरांतून मूर्ती चोरीला जातात. त्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यास गेल्यावर त्याची विशेष नोंद घेतली जात नाही. मोटरसायकल चोरीचा गुन्हा आणि मूर्तीचोरीचा गुन्हा यांकडे सारख्याच दृष्टीने पाहिले जाते. ज्या राज्यांनी वारसा रक्षणासाठी विशेष पोलीस यंत्रणा बनवली नाही किंवा वारसा कायदे बनवले नसतील, तर सायकल चोरी आणि मूर्तीचोरी यांचा सारखाच गुन्हा नोंद होतो. आम्ही भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडे असलेल्या ६ ते ७ सहस्र स्मारकांना वेगळे काढण्यात यावे. हिंदु स्मारकांमध्ये मंदिर, मठ किंवा घाट यांचा समावेश आहे. त्यांना आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे, त्यांची ऐतिहासिक ओळख आहे, तसेच ते लोकांच्या हृदयात आहेत. त्यामुळे हिंदु मंदिरे आणि गड, तसेच बौद्ध, जैन अन् शीख यांची वारसा स्थळे यांना वेगळ्या श्रेणीत ठेवले पाहिजे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अखत्यारित असलेल्या वारसा स्थळांना तिकीट लावले जाऊ शकत नाही. ते राजवाडे, संग्रहालये यांना पहाण्यासाठी तिकीट लावू शकतात. मंदिरांना नव्हे. पंथानुसार श्रेणी केल्यावर तेथे संवेदनाशील अधिकारी ठेवले पाहिजेत. त्यांची श्रद्धाच असणे आवश्यक नाही; पण त्यांना कळले पाहिजे की, हे केवळ बांधकाम नाही, तर ते श्रद्धांशी संंबंधित आहेत. भलेही तेथे पूजा होत नसेल; पण त्यांचा इतिहास आहे. मला जर माझ्या ईश्वराला भेटायला जायचे असेल, तर त्याला तिकीट आकारणे, हे अतिशय चुकीचे आहे. सूर्यमंदिराच्या ठिकाणी तिकीट लावण्याला आम्ही विरोध केला; पण त्याचा लाभ झाला नाही.
मंदिर भग्नावस्थेत असले, तरी ते शेवटपर्यंत मंदिरच रहाणार आहे. तेथील श्रद्धा किंवा आध्यात्मिक वास पुरातत्व सर्वेक्षण काढून घेऊ शकत नाही.
ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या वारसांचेही संरक्षण करा; पण हिंदूंच्या वारसांना प्राधान्य मिळाले पाहिजे. भोजशाळा, ज्ञानवापी, अयोध्या जेथेही सर्वेक्षण करण्यात आले, तेथे हिंदु मंदिर असल्याचा संशय होता, तो खरा ठरला. हिंदूंना कुणाची मशीद नको. मला उघड्या डोळ्यांनी दिसते की, हे मंदिराचे अवशेष आहेत. जेथे जेथे पुरातत्व विभागाने खोदकाम केले, तेथे तेथे अवशेष मिळाले, तसेच तेथे त्यांनी न्यायालयाला लिहून दिले की, हे हिंदु मंदिरांचे अवशेष आहेत. ‘सर्वच संशयास्पद बांधकामे मंदिरात परावर्तित करा’, असे आम्ही म्हणणार नाही; पण किमान त्याची सूची तरी बनवणे आवश्यक आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण तसे करत नसेल, तर सरकारने एखादी समिती किंवा आयोग बनवावा. अयोध्या, भोजशाळा, तसेच ज्ञानवापी येथे हिंदु अवशेष किंवा मूर्ती मिळाल्या. त्यामुळे धार्मिक स्थानांविषयी हिंदूंच्या भावना अधिक वृद्धींगत होईल. मुसलमानांनी हिंदूंची स्थाने त्यांना परत केली, तर त्यांचा मानसन्मान अधिक वाढेल. इतरांच्या धार्मिक स्थानांवर मशीद बनवणे, त्यांच्या पंथातही स्वीकारले जात नाही. अशा गोष्टींना राजकारणापासून लांब ठेवल्या पाहिजे.
भारतीय वारसांची देखभाल नागरिकांचे दायित्व
आपल्या वारसांचे जतन करणे, हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे, हे राज्यघटनेत लिहिले आहे; पण हे शिकवले जात नाही. आपणच आपल्या वारसास्थळांचे रक्षण केले पाहिजे. त्यामुळे आपले दायित्व अधिक वाढते. मला देशाचा एक नागरिक म्हणून आणि धर्माभिमानी हिंदु म्हणूनही हे कार्य करायचे आहे.
– श्री. अनिल धीर
५. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला संवेदनशील अधिकार्यांची आवश्यकता
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या संदर्भात अतिशय कठोर कायदे आहेत. जगन्नाथ मंदिर, पुरी येथील मठ तोडण्यात आले, तेव्हा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण शांत राहिले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचा शब्द हा कायदा आहे. त्यांनी विरोध केला असता, तर ही मठ, मंदिरे वाचली असती. जर कायद्यांची कार्यवाही करायची नाही, तर ते बनवले कशाला ? अशी प्रकरणे न्यायालयही स्थगिती देऊन थंड बस्त्यात ठेवते. हिंदु वारसांविषयी न्याय मिळायला जेवढा विलंब लागेल, तेवढा लोकांमध्ये उद्रेक वाढत जाईल, तेवढा राजकीय लोक त्याचा अपलाभ उठवतील. अशी प्रकरणे येतात, तेव्हा न्यायालयांनी अखंड सुनावणी घेतली पाहिजे. जेव्हा तुम्हाला समस्या समजली, तेव्हा त्यावर उपाय काढणे आवश्यक आहे. त्याला विलंब लावल्यावर ते अधिक चिघळते.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे माजी संचालक के.के. महंमद यांनी अयोध्येविषयी अतिशय चांगला अहवाल दिला होता; कारण ते संवेदनशील अधिकारी होते. अजूनही मला वाटते की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्था उत्तम संघटना आहे, तेथे अतिशय चांगले अधिकारी आणि कर्मचारी आहेत. असे असतांनाही हिंदु मंदिरांच्या संदर्भात असे होत असेल, तर ते चुकीचे आहे. इतकी मोठी संस्था आणि एवढा प्रचंड अनुभव असतांना कोणती अडचण येते ? आमच्याहूनही भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला अधिक माहिती आहे. त्यांच्याकडे तज्ञ आहेत. बाबरी पतन झाले, दंगली झाल्या, मुंबई स्फोट झाले. त्यातून कुणीच काहीही शिकले नाही. हे चुकीचे आहे.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. अनिल धीर, सदस्य, ‘इन्टॅक’ गव्हर्निंग कौन्सिल, ओडिशा.