Chhatrapati Shivaji Maharaj Statue : भारतीय सैन्याने लडाखमधील चीन सीमेवर उभारला छत्रपती शिवरायांचा पुतळा

समुद्रसपाटीपासून १४ सहस्र ३०० फूट उंचीवर फडकला भगवा ध्वज

लडाख – भारतीय सैन्याने पूर्व लडाख येथील चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पुतळा उभारला असून नुकतेच या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. हा पुतळा सीमेवरील पँगाँग तलावाच्या किनार्‍यावर म्हणजे समुद्रसपाटीपासून १४ सहस्र ३०० फूट उंचीवर उभारण्यात आला आहे. तेथे भगवा ध्वजही उभारण्यात आला आहे. भारतीय सैन्याच्या ‘१४ कॉर्प्स’चेे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांनी या पुतळ्याचे २६ डिसेंबर या दिवशी अनावरण केले. याचा व्हिडिओ सैन्याने प्रसारित केला आहे.

भारत आणि चीन यांनी लडाख सीमेवरील डेमचोक आणि डेपसांग भागांतून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याच्या काही दिवसांनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. पूर्व लडाखमध्ये ५ मे २०२० या दिवशी पँगाँग तलावाच्या परिसरात भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता.