संभल (उत्तरप्रदेश) येथील हिंसाचाराचे प्रकरण
संभल (उत्तरप्रदेश) – येथील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाच्या वेळी २४ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या हिंसाचाराचा कट दीपा सराई येथील रहिवासी शारिक साठा याने रचल्याचा संशय आहे. त्याआधारे पोलीस अन्वेषण करत आहेत. शारिक साठा हा देशातील सर्वांत मोठा वाहनचोर आहे. सध्या तो बनावट पारपत्राद्वारे दुबईत स्थायिक झाला आहे. तो आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय. (‘इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स’) यांच्यासाठी काम करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. तो बनावट नोटांच्या गुन्ह्यातही सहभागी असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे.
१. शारिक साठा याच्यावर नखासा पोलीस ठाण्यात १२ गुन्हे नोंद आहेत. पोलिसांनी हसनपूर रोडवर असलेला एक भूखंडही जप्त केला असून त्याची किंमत १ कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
२. पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिष्णोई यांनी सांगितले की, संभलमधील हिंसाचारासाठी जर शारिक साठा याने पाकिस्तानी आणि अमेरिकी काडतुसे पाठवली असतील, तर त्याच्या टोळीपर्यंत पोचण्यासाठीच अन्वेषण केले जात आहे.
३. शारिक साठा देशाच्या विविध भागांतून आलिशान गाड्या चोरून नेपाळला पाठवायचा. तेथे त्याच्या टोळीचे सदस्य कार्यरत होते. शारिक साठा कारागृहात गेल्यावरही कारवाया करत होता. वर्ष २०२० मध्ये कारागृहातून सुटल्यानंतर तो बनावट पारपत्र बनवून दुबईला पळून गेला होता. २ वर्षांपूर्वी देहली पोलिसांनी शारिक टोळीकडून ३०० वाहने जप्त केली होती. त्या प्रकरणात शारिकच्या कुटुंबातील आरोपींनाही अटक करण्यात आली होती.
संपादकीय भूमिकापाकिस्तानशी कोणकोणत्या भारतीय गुंडांचे संबंध आहेत आणि ते भारतात काय कारवाया करू शकतात, करत आहेत, याची माहिती गुप्तचरांना आधीच का मिळत नाही ? |