मडगाव (गोवा) येथील ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे आधुनिक वैद्य मनोज सोलंकी यांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने वैद्यकीय व्‍यवसायाच्‍या माध्‍यमातून केलेले साधनेचे प्रयत्न !

८.९.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या भागात आपण ‘आधुनिक वैद्य मनोज सोलंकी यांनी वैद्यकीय व्‍यवसाय करत व्‍यष्‍टी साधनेच्‍या अंतर्गत स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसह गुणसंवर्धनासाठी कसे प्रयत्न केले ?’ यांविषयी पाहिले. आजच्‍या भागात त्‍यांनी समष्‍टी साधनेसाठी केलेल्‍या प्रयत्नांविषयी पाहू.                                            

(भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/718166.html

आधुनिक वैद्य मनोज सोलंकी 

२. समष्‍टी साधना

२ अ. चिकित्‍सालयात येणार्‍या रुग्‍णांना आध्‍यात्मिक ध्‍वनी-चित्रचकत्‍या दाखवणे : ‘मी माझ्‍या चिकित्‍सालयात येणार्‍या हिंदु रुग्‍णांना विविध आध्‍यात्मिक ध्‍वनी-चित्रचकत्‍या दाखवतो, उदा. नामजपाचे महत्त्व, साधना; तसेच गुढीपाडवा, होळी, दिवाळी इत्‍यादी सणांंवरील ध्‍वनी-चित्रचकत्‍या.

२ आ. रुग्‍णांना साधना सांगणे किंवा त्‍यांना आजाराच्‍या आध्‍यात्मिक भागाविषयी जाणीव करून देऊन त्‍यावर उपाय सुचवणे : गर्भधारणा न होणारी दांपत्‍ये सोनोग्राफी (टीप) करतात. जेव्‍हा त्‍यांचे सगळे अहवाल सर्वसामान्‍य असूनही गर्भधारणा होत नाही, तेव्‍हा मी त्‍यांच्‍या स्‍थितीप्रमाणे त्‍यांना दत्ताचा नामजप करणे, श्राद्ध करणे इत्‍यादी उपाय सुचवतो. एखाद्या रुग्‍णामध्‍ये ‘काळजी करणे’, हा स्‍वभावदोष असेल, तर मी त्‍याला नामजपाविषयी सांगतो, तसेच पुढच्‍या स्‍तराचे कर्करोग झालेल्‍या रुग्‍णांना ‘तो प्रारब्‍धाचा भाग आहे’, असे सांगून साधना सांगतो.

टीप – विशिष्‍ट ध्‍वनीलहरींच्‍या साहाय्‍याने पोटातील अवयवांची चित्रे घेण्‍याची चाचणी.

२ इ. आधुनिक वैद्य आणि वर्गमित्र यांच्‍यात सामाजिक प्रसारमाध्‍यमांतून ‘आजारांची आध्‍यात्मिक कारणे अन् उपाय’ यांविषयी प्रसार करणे : ‘भारतीय वैद्यकीय संस्‍थे’चा (‘इंडियन मेडिकल असोशिएशन’चा) स्‍थानिक ‘व्‍हॉट्‍स अ‍ॅप’ गट आणि वर्गमित्रांचा ‘व्‍हॉट्‍स अ‍ॅप’ गट यांवरून ‘आजारांची आध्‍यात्मिक कारणे अन् उपाय’ यांविषयी मी प्रसार करतो. ‘कोरोनाची आध्‍यात्मिक बाजू आणि नामजपादी उपाय, तसेच जीवनामध्‍ये प्रत्‍येक गोष्‍टीमागे, तसेच आजारामागे शारीरिक, मानसिक अन् आध्‍यात्मिक कारणे असणे, शारीरिक आणि मानसिक उपायांसह नामजपादी आध्‍यात्मिक उपाय केल्‍यावर परिपूर्ण उपचार होणे’, याविषयीची माहिती देतोे.

२ ई. रुग्‍णांना आयुर्वेद आणि इतर प्राचीन वैद्यकीय उपचारपद्धती यांची माहिती देणे : माझ्‍याकडे येणारा रुग्‍ण जर आधुनिक वैद्यकीय शास्‍त्राने बरा होणार नसेल, तर मी त्‍याला आयुर्वेद किंवा अन्‍य प्राचीन वैद्यकीय उपचारपद्धत सुचवतो; तसेच भारतीय वैद्यकीय संस्‍थेच्‍या स्‍थानिक ‘व्‍हॉट्‍सअ‍ॅप’ गटावर आयुर्वेद आणि इतर प्राचीन वैद्यकीय उपचारपद्धती यांची माहिती देऊन जागृती करतो.

२ उ. वैद्यकीय क्षेत्रामध्‍ये हिंदु धर्महानीच्‍या विरोधात जागृती करणे : आमच्‍या ‘भारतीय वैद्यकीय संस्‍थे’च्‍या (‘इंडियन मेडिकल असोशिएशन’च्‍या) स्‍थानिक ‘व्‍हॉट्‍स अ‍ॅप’ गटावर मी धर्माविरुद्ध हानी करणार्‍या प्रसंगांविषयी जागृती केली.

२ उ १. स्‍वतःच्‍या पदाचा अपवापर करून ख्रिस्‍ती धर्माचा प्रचार करणार्‍या आधुनिक वैद्यांविरुद्ध सामाजिक संकेतस्‍थळावरून जागृती करणे : मे २०२१ मध्‍ये ‘भारतीय वैद्यकीय संस्‍थे’चे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष डॉ. जयलाल यांनी स्‍वतःच्‍या पदाचा वापर ख्रिस्‍ती धर्माचा प्रचार करण्‍यासाठी केला होता. याविषयीची जागृती स्‍थानिक भारतीय वैद्यकीय संस्‍थेच्‍या ‘व्‍हॉट्‍सअ‍ॅप’ गटावर केली होती, तसेच राज्‍य अध्‍यक्षाला पत्र लिहून डॉ. जयलाल यांनी क्षमा मागण्‍याची आणि पदाचा राजीनामा देण्‍याची मागणी केली होती. याला काही हिंदु आधुनिक वैद्यांनी पाठिंबा दर्शवला होता. डॉ. जयलाल यांच्‍यावर खटला दाखल होऊन त्‍यांना दोषी ठरवून त्‍यांच्‍यावर कडक ताशेरे ओढण्‍यात आले होते.

२ उ २. ख्रिस्‍ती धर्माचे उदात्तीकरण करणारे तेलंगाणा राज्‍याचे वैद्यकीय संचालक डॉ. गुंडू राव यांच्‍या विरोधात जनजागृती करणे : डिसेंबर २०२२ मध्‍ये तेलंगाणा राज्‍याचे वैद्यकीय संचालक डॉ. गुंडू राव यांनी ‘कोरोना येशू ख्रिस्‍ताने बरा केला’, असे वक्‍तव्‍य करून कोविड योद्धा आणि आधुनिक वैद्य यांचा अवमान केला होता. त्‍या विषयीची जागृती ‘स्‍थानिक भारतीय वैद्यकीय संस्‍थे’च्‍या ‘व्‍हॉट्‍सअ‍ॅप’ गटावर केली आणि धर्मनिरपेक्ष देशामध्‍ये असे प्रकार चालत असल्‍याचे लोकांच्‍या निदर्शनास आणून दिले.

२ ऊ. हिंदु वैद्यांचे संघटन : ‘भारतीय वैद्यकीय संस्‍थे’च्‍या स्‍थानिक ‘व्‍हॉट्‍सअ‍ॅप’ गटावर मोहीम राबवल्‍यावर धर्माभिमानी हिंदु वैद्यांची माझ्‍याशी ओळख झाली आणि काहींनी त्‍याला उघडपणे पाठिंबा दिला, तसेच काही हिंदु वैद्यांनी अप्रत्‍यक्ष पाठिंबा दर्शवला. इतर पंथांच्‍या तुलनेत हिंदु वैद्यांचा आपल्‍या धर्माप्रतीचा अभिमान अल्‍प जाणवला; कारण त्‍यांना स्‍वतःची धर्मनिरपेक्षतेची प्रतिमा जपायची असते.

२ ए. ‘आरोग्‍य साहाय्‍य समिती’च्‍या अंतर्गत सेवा करणे : परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेने मला ‘आरोग्‍य साहाय्‍य समिती’च्‍या माध्‍यमातून सेवेची संधी मिळाली. या समितीच्‍या अंतर्गत मी ‘समाजातील आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोवा मेडिकल कॉलेज) येथील वैद्यांना संपर्क करून लेख सिद्ध करणे, माहिती गोळा करणे, औषधाच्‍या समवेत असलेल्‍या माहितीपत्रकातील लहान आकारातील अक्षरांच्‍या (‘फाँट’च्‍या) लिखाणाच्‍या विरोधात संबंधित शासकीय अधिकार्‍यांना निवेदन देणे, समाजातील वैद्यांना सहभागी करून घेणे’, इत्‍यादी सेवा केल्‍या आहेत; तसेच या पूर्वी मी गोवा उच्‍च न्‍यायालयात औषधाच्‍या समवेत असलेल्‍या माहितीपत्रकातील लहान आकारातील अक्षरांच्‍या लिखाणाच्‍या विरोधात जनहित याचिका प्रविष्‍ट केली होती.

२ ऐ. आश्रम स्‍तरावर लागणारी औषधे आणि यंत्र यांच्‍या संदर्भात सेवा करणे : मी ‘आश्रम स्‍तरावर लागणार्‍या औषधांविषयी माहिती गोळा करणे, तसेच औषधे उपलब्‍ध करून देणे’, या सेवा करतो. मी आश्रम स्‍तरावर सोनोग्राफीचे यंत्र विकत घेण्‍याची सेवा केली. मला कोरोनाच्‍या कालावधीत ‘आश्रमासाठी प्राणवायू यंत्र निवडणे आणि विकत घेणे’, या सेवांची संधी मिळाली.

२ ओ. संत आणि साधक यांची वैद्यकीय सेवा करणे अन् त्‍या वेळी त्‍यांचा सत्‍संग मिळणे : संत आणि साधक यांची वैद्यकीय सेवा (सोनोग्राफी तपासणी) केल्‍यावर मला सत्‍सेवा अन् सत्‍संग मिळून त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळते, तसेच ‘मला चिकित्‍सालयातही सेवा करण्‍याची संधी मिळते, तसेच मला साधकांशी जवळीक साधायला मिळते’, याविषयी मला देवाप्रती पुष्‍कळ कृतज्ञता वाटते.

३. कृतज्ञता

व्‍यवसायाच्‍या माध्‍यमातून सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी माझ्‍याकडून साधनेचे प्रयत्न करून घेतले. त्‍यांची कृपा आणि त्‍यांनी दिलेल्‍या दृष्‍टीकोनामुळे मला हे शक्‍य झाले. त्‍यांच्‍याप्रती कितीही कृतज्ञता व्‍यक्‍त केली, तरी ती अल्‍पच आहे.’

(समाप्‍त)

– आधुनिक वैद्य मनोज वसंतलाल सोलंकी (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के, वय ५७ वर्षे), मडगाव, गोवा. (८.१.२०२३)