मडगाव (गोवा) येथील ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे आधुनिक वैद्य मनोज सोलंकी यांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने वैद्यकीय व्‍यवसायाच्‍या माध्‍यमातून केलेले साधनेचे प्रयत्न !

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने माझ्‍या लक्षात आले, ‘मी पूर्णवेळ साधना करू शकत नाही; पण उपलब्‍ध वेळेनुसार साधना करण्‍याची मला संधी आहे. या स्‍थितीमध्‍ये जर आध्‍यात्मिक प्रगती करायची असेल, तर मला या वेळेचा पूर्ण उपयोग करून साधना करणे अनिवार्य आहे.’ सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळे मी व्‍यष्‍टी साधना आणि समष्‍टी साधना यांचे प्रयत्न करू शकलो.

(भाग १)

आधुनिक वैद्य मनोज सोलंकी

१. व्‍यष्‍टी साधनेचे केलेले प्रयत्न

वर्ष २००८ मध्‍ये देवद (पनवेल) येथे झालेल्‍या शिबिराच्‍या वेळी राबवलेल्‍या स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाच्‍या प्रक्रियेतून माझ्‍या लक्षात आले, ‘ही प्रक्रिया म्‍हणजे २४ घंटे स्‍वतःचे स्‍वभावदोष आणि अहं यांवर लक्ष ठेवून प्रयत्न करणे. जर आपल्‍याला साधनेत पुढे जायचे असेल, तर प्रामाणिकपणे प्रक्रिया राबवल्‍याविना ते शक्‍य नाही.’

१ अ. ‘राग’ हा स्‍वभावदोष न्‍यून करण्‍यासाठी योग्‍य आध्‍यात्मिक दृष्‍टीकोन देऊन स्‍वतःला शांत ठेवण्‍याचा प्रयत्न करणे : रागामुळे आपल्‍याला रुग्‍णांशी जवळीक साधणे कठीण जाते आणि रुग्‍णांचे उपचार अन् आपला व्‍यवसाय यांवर नकारात्‍मक परिणाम होतो. मी रागावर मात करण्‍याचा कितीही प्रयत्न करत असलो, तरी देव काही प्रसंगांतून माझी उणीव लक्षात आणून देत असे.

चिकित्‍सालय बंद झाल्‍यावर, बंद होण्‍याची वेळ झाल्‍यावर किंवा मला कुठे महत्त्वाचे काम असल्‍यावर रुग्‍ण माझ्‍याकडे आला, तर माझी चिडचिड व्‍हायची. त्‍या वेळी मला अस्‍वस्‍थ वाटत असे. त्‍यामुळे मला आनंद अनुभवता येत नसे. तेव्‍हा माझे चिंतन झाले. ‘रुग्‍ण काही जाणूनबुजून उशिरा येत नाहीत. त्‍याला त्रास होत आहे; म्‍हणून तो येतो. आपल्‍या वैद्यकीय व्‍यवसायामध्‍ये आपण रुग्‍णांची सेवा करण्‍याची शपथ घेतली आहे; म्‍हणून आपण रुग्‍णाला शांतपणे तपासायला हवे.’ मी माझ्‍या मनाला वरील दृष्‍टीकोन देऊन शांत ठेवण्‍याचा प्रयत्न करत असे.

१ आ. अहं-निर्मूलनासाठी केलेला प्रयत्न

१ आ १. चुकीची कृती होत असल्‍याचे अन्‍य आधुनिक वैद्यांनी लक्षात आणून दिल्‍याबद्दल त्‍यांच्‍याप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करून ‘पुढे असेच साहाय्‍य करावे’, असे त्‍यांना सांगणे : जेव्‍हा आपल्‍याकडून एखादी चुकीची कृती होते आणि एखादा वैद्य ते आपल्‍या लक्षात आणून देतो, तेव्‍हा अहंमुळे आपल्‍याला वाईट वाटते. अशा प्रसंगी त्‍या वैद्यांना भ्रमणभाष करून आपली चूक लक्षात आणून दिल्‍याबद्दल कृतज्ञता व्‍यक्‍त करून ‘पुढे असेच साहाय्‍य करावे’, असे सांगितल्‍यावर आपला अहं न्‍यून होण्‍यासाठी साहाय्‍य होते आणि चुकांतून शिकण्‍याची सवय लागते.

१ इ. गुणसंवर्धनासाठी केलेले प्रयत्न

१ इ १. संयम : काळजी करणारे रुग्‍ण काळजीपोटी वारंवार तेच तेच प्रश्‍न विचारतात. कधी कधी त्‍यांची काळजी योग्‍य असते. अशा वेळी कधी कधी आपला संयम सुटतो आणि आपल्‍याकडून प्रतिक्रिया व्‍यक्‍त होत असते. प्रक्रियेमुळे माझ्‍यातील या गुणाचा अभाव लक्षात येऊन माझ्‍याकडून गुणसंवर्धनासाठी प्रयत्न होऊ लागले.

१ इ २. प्रीती : रुग्‍णाला चांगली सेवा देण्‍यासाठी ‘प्रीती’ हा गुण फार उपयुक्‍त आहे. प्रीती निर्माण करण्‍यासाठी ‘रुग्‍णाशी अनौपचारिक बोलणे, त्‍याच्‍या कुटुंबाची विचारपूस करणे किंवा त्‍याच्‍या व्‍यवसायाची स्‍थिती समजून घेणे’, असे केल्‍याने प्रीती निर्माण होण्‍यासाठी साहाय्‍य होते.

१ इ ३. त्‍याग : गरजू किंवा वैद्यकीय उपचार न परवडणार्‍या रुग्‍णाकडून अल्‍प पैसे घेतल्‍याने किंवा पैसे न घेतल्‍याने त्‍याग होण्‍यास साहाय्‍य होते आणि एक वेगळे समाधान मिळते.’

– आधुनिक वैद्य मनोज वसंतलाल सोलंकी (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के, वय ५७ वर्षे), मडगाव, गोवा. (८.१.२०२३)

(क्रमशः)

आधुनिक वैद्य मनोज वसंतलाल सोलंकी यांच्‍या चिकित्‍सालयात झालेले पालट

१. ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले, सनातनचे अनेक संत आणि साधक यांच्‍या चरणस्‍पर्शाने माझ्‍या चिकित्‍सालयात सुगंध येत आहे.

२. प्रतीक्षा कक्षामध्‍ये मारक, तर सोनोग्राफी करण्‍याच्‍या खोलीमध्‍ये तारक सुगंध येत आहे.

३. चिकित्‍सालयातील श्रीकृष्‍णाच्‍या चित्रामध्‍ये गुलाबी छटा आणि प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या छायाचित्रामध्‍ये निर्गुणातील पालट जाणवत आहेत.

४. सोनोग्राफीचे यंत्र, माझी आसंदी आणि रुग्‍ण तपासण्‍याचा पलंग यांवर दैवी कण दिसतात.

५. साधकांना चिकित्‍सालयात आल्‍यासारखे न वाटता चांगले वाटते.’

(‘आधुनिक वैद्य मनोज सोलंकी यांचा ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले, संत, साधक, तसेच रुग्‍ण यांच्‍या माध्‍यमातून ईश्‍वरच आपल्‍या चिकित्‍सालयात आला आहे’, असा भाव आहे. ‘भाव तेथे देव’, या उक्‍तीनुसार ईश्‍वराने ‘आवश्‍यकतेनुसार तारक आणि मारक सुगंध येणे, दैवी कण दिसणे’, यांच्‍या माध्‍यमातून त्‍याचे अस्‍तित्‍व दाखवून दिले आहे.

डॉ. सोलंकी यांच्‍या संत, साधक आणि रुग्‍ण यांच्‍यावरील निरपेक्ष प्रेमाचे प्रतीक म्‍हणून त्‍यांच्‍या चिकित्‍सालयातील श्रीकृष्‍णाच्‍या चित्रामध्‍ये गुलाबी छटा दिसत आहे.

बहुतेक आधुनिक वैद्य व्‍यवसाय म्‍हणून रुग्‍णतपासणी करतात. ‘आपल्‍याला रुग्‍णाकडून अधिकाधिक पैसे कसे उकळता येतील ?’, असा त्‍यांचा विचार असतो. त्‍यामुळे त्‍यांच्‍या चिकित्‍सालयात रज-तमयुक्‍त स्‍पंदने असल्‍याने तेथे चांगले वाटत नाही; याउलट डॉ. सोलंकी रुग्‍णतपासणीची सेवा साधना म्‍हणून करतात. त्‍यांची आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के आहे. रुग्‍णतपासणी करतांना त्‍यांचे ईश्‍वराशी अनुसंधान असते, तसेच त्‍या वेळी ते नामजप करत असतात. त्‍यांच्‍या चिकित्‍सालयात संत आणि साधक तपासणी करण्‍यासाठी येत असतात. या सर्व कारणांमुळे त्‍यांच्‍या चिकित्‍सालयात सात्त्विक वातावरण निर्माण झाल्‍याने चांगले वाटते.’ – संकलक)

– आधुनिक वैद्य मनोज वसंतलाल सोलंकी (८.१.२०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • दैवी कण :  सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन  हे  घटक  असल्याचे  सिद्ध  झाले.  या  घटकांच्या  मूलद्रव्यांच्या  प्रमाणावरून शोधलेले  त्यांचे  ‘फॉर्म्युले’  सध्या  अस्तित्वात  असलेल्या  कोणत्याही  कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.