‘इस्रो’च्या पुढील मोहीम ‘गगनयान’द्वारे अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार !

जानेवारी ते मार्च २०२४ मध्ये कार्यान्वित करणार !

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘मंगळयान’ आणि ‘चंद्रयान-३’ या मोहिमांच्या नेत्रदीपक यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या ‘गगनयान’ मोहिमेकडे आता भारतवासियांचे लक्ष लागले आहे. भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवून अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामध्ये भारताचे स्थान अधिक बळकट करणारी ही ‘इस्रो’ची महत्त्वाकांक्षी मोहीम असणार आहे.

जानेवारी ते मार्च २०२४ या कालावधीत ही मोहीम कार्यान्वित करण्यात येईल. कोरोना महामारीमुळे या मोहिमेला फटका बसला, अन्यथा आतापर्यंत ही मोहीम भारताने यशस्वी करून दाखवली असती, असे सांगण्यात येत आहे. वर्ष २०१८ मध्येच पंतप्रधानांनी या मोहिमेची घोषणा केली होती. या मोहिमेसाठी एकूण ९ सहस्र २३ कोटी रुपये खर्च येईल, असे सांगण्यात येत आहे.

१. अमेरिका, तत्कालीन सोव्हिएत महासंघ आणि चीन या तीन देशांनी आतापर्यंत अवकाशात मानव पाठवला आहे. यानंतर आता प्रथमच ‘इस्रो’ने ही मोहीम आखली आहे.

२. यामध्ये पृथ्वीभोवती ४०० किलोमीटरच्या कक्षेमध्ये तीन अंतराळवीरांना तीन दिवसांसाठी पाठवण्यात येणार आहे. तेथील प्रयोगांनंतर त्यांना भारतीय समुद्रामध्ये सुरक्षित उतरविण्याचा ‘इस्रो’चा प्रयत्न असेल.

‘गगनयान’चे हे असतील ३ महत्त्वपूर्ण टप्पे !

‘गगनयान’ मोहीम ३ टप्प्यांत कार्यान्वित करण्यात येईल.

१. पहिल्या टप्प्यात ‘एल्.एम्.व्ही. ३’ या प्रक्षेपकातून कुपी अवकाशात सोडण्यात येईल आणि तेथून ती सुरक्षितपणे पृथ्वीच्या अवकाशात परत आणण्यात येणार आहे.

२. त्यानंतर ‘व्योममित्र’ हा रोबोटही कुपीमध्ये सोडण्यात येणार असून त्याद्वारे निरीक्षणे टिपण्यात येणार आहेत.

३. तिसर्‍या टप्प्यात अंतराळवीरांसह ही कुपी अवकाशात सोडण्यात येईल. या मोहिमेसाठी हवाई दलातील ४ वैमानिकांना वर्ष २०२० मध्येच रशियामध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते.

‘गगनयान’चा भारताला असा होणार लाभ !

  •  मानवी मोहिमा आखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची क्षमता दाखवण्याची संधी !
  •  अवकाशात वैद्यकीय, जैवअवकाशीय आणि अभियांत्रिकी यांचे प्रयोग करता येणार !
  •  अवकाशातील यानांचे प्रक्षेपण आणि एखाद्या अपेक्षित ठिकाणी यान पोचवणे अन् थांबवणे, या प्रयोगांसाठी साहाय्य होणार !
  •  अवकाश स्थानकाची (‘स्पेस स्टेशन’ची) निर्मिती आणि अन्य ग्रहांवरील मानवी मोहिमांसाठी आंतरराष्ट्रीय अवकाश संस्थांसमवेत सहकार्य वाढविण्यास साहाय्य होणार !