‘विक्रम’ लँडरमधून बाहेर आले ‘प्रज्ञान’ रोव्हर !

‘चंद्रयान-३’च्या ‘विक्रम’ लँडरमधून यशस्वीरित्या वेगळे झालेले ‘प्रज्ञान’ रोव्हर !

बेंगळुरू (कर्नाटक) – भारताच्या ‘चंद्रयान-३’चे ‘विक्रम’ लँडर २३ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यानंतर जवळपास २ घंटे २६ मिनिटांनी त्यामधील ‘प्रज्ञान’ रोव्हर बाहेर आले. ‘विक्रम’ लँडर उतरल्यानंतर चंद्रावर धूळ उडाली. ही धूळ खाली बसेपर्यंत ‘प्रज्ञान’ रोव्हरला ‘विक्रम’मधून बाहेर आणता येणार नव्हते; कारण या धुळीचा परिणाम त्याच्यावर झाला असता. जेव्हा धूळ खाली बसली, तेव्हा ‘प्रज्ञान’ला बाहेर आणण्यात आले.

 (सौजन्य : News18 UP Uttarakhand)

प्रज्ञान रोव्हर हा ६ चाके असणारा रोबोट आहे. हा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर चालला की, पृष्ठभागावर अशोक स्तंभ आणि इस्रोचचे बोधचिन्ह (लोगो) उमटणार आहे; कारण या रोव्हरच्या चाकांवर अशोक स्तंभ आणि इस्रोचा लोगो कोरण्यात आला आहे. पुढील १४ दिवस ‘विक्रम’ आणि प्रज्ञान’ चंद्राचा अभ्यास करणार आहेत. चंद्रावर बर्फाच्या स्वरूपात पाणी असल्याचे यापूर्वी इस्रोच्या संशोधनातून समोर आले होते. आता त्याचा अधिक सखोल अभ्यास या दोघांच्या माध्यमांतून केला जाणार आहे.