राष्ट्र आणि धर्म कार्याचा दीपस्तंभ ठरलेल्या साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सव पावशी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे उत्साहात साजरा !
कुडाळ, १३ ऑगस्ट (वार्ता.) – स्वातंत्र्यपूर्व काळात उजवी विचारसरणी असलेल्या लोकांच्या हातून डाव्या विचारसरणीच्या लोकांकडे प्रसारमाध्यमे (वृत्तपत्रे) का गेली ? याचा दूरगामी विचार केला गेला नाही. देशात ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे आता वाढलेली दिसतात; मात्र त्याची पायाभरणी ३० ते ४० वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. चित्रपटांच्या माध्यमातून पद्धतशीरपणे ही गोष्ट पसरवण्यात आली. चित्रपटसृष्टीचा पाया मराठी लोकांनी घातला आणि नंतरच्या काळात ती गुंडांच्या हाती गेली. उजव्या विचारसरणीच्या लोकांनी केलेला अक्षम्य हलगर्जीपणा याला कारणीभूत आहे. आज ‘लव्ह जिहाद’चे भयाण वास्तव समोर आले. त्या वेळी असा कोणताही प्रकार नसल्याचे सांगण्यात येत होते.
२० वर्षांपूर्वी हेच सत्य ‘सनातन प्रभात’ मांडत होते. साधकांनी स्वतःची पदरमोड करून ‘सनातन प्रभात’ चालवले आहे, तर डाव्या विचारसरणीच्या लोकांना ‘फंडिंग’ होते. अशा परिस्थितीत २५ वर्षांपूर्वी परात्पर गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी) ‘सनातन प्रभात’चा शुभारंभ केला. ‘सनातन प्रभात’चे वैशिष्ट्य हेच आहे की, ते हिंदूंवरील अत्याचार ठळकपणे जगासमोर आणते, तर इतर माध्यमे अशा बातम्या दडपतात, असे गौरवोद्गार वेंगुर्ला येथील वेदमूर्ती भूषण जोशी यांनी ‘सनातन प्रभात’विषयी काढले.
सनातन हिंदु धर्माचा विचार अग्रस्थानी ठेवून कोणतेही राजकीय पाठबळ नसतांना, निर्भीडपणे हिंदु राष्ट्राचा पुरस्कार करणार्या साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पावशी येथील ‘शांतादुर्गा मंगल कार्यालया’त १३ ऑगस्ट या दिवशी रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यात वक्ते म्हणून वेदमूर्ती भूषण जोशी बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम आणि ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. भरत राऊळ उपस्थित होते. प्रारंभी प्रार्थना आणि श्लोक म्हणण्यात आले, तसेच वेदमूर्ती सुशांत भागवत (माडखोल) यांनी वेदमंत्रपठण केले. त्यानंतर पुरोहितांचा सत्कार करण्यात आला.
वेदमूर्ती जोशी या वेळी म्हणाले,
१. ‘‘स्वतःला ‘विवेकवादी’ म्हणवणारी मंडळी विसंगत वागतात. स्मशानात विवाह करणे, हे त्याचेच उदाहरण आहे. वास्तविक ज्या स्मशानात प्रदूषित वातावरण असते, विलाप असतो, त्या ठिकाणी मंगल कार्य करणे विसंगत आहे. ही गोष्ट माध्यमांनी पुरोगामीत्वाच्या नावाखाली पुढे रेटली. ‘सनातन प्रभात’ अशा गोष्टींचा रोखठोक प्रतिवाद करते. अशा ‘सनातन प्रभात’ला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे.
२. ‘सनातन प्रभात’ अधिकाधिक मराठी शब्द वापरते. चांगल्या व्यक्तींपर्यंत ‘सनातन प्रभात’ पोचवायला हवे.
३. समाजातील इतर वृत्तपत्रांतून ‘इतरांचे काय चुकते ?’ यावरच बोलले जाते; मात्र ‘सनातन प्रभात’मधून साधक स्वतःच्या चुका मांडतात, हे अत्यंत वेगळे वैशिष्ट्य आहे. याविषयी सनातनचे कौतुक करावे तेवढे थोडे !
४. हिंदु धर्माविषयी जेथे जेथे चांगले काम होत आहे, त्यांना ‘सनातन प्रभात’मधून व्यासपीठ मिळवून दिले जाते. हिंदूंनी मोठ्या संख्येने ‘सनातन प्रभात’च्या मागे उभे रहावे आणि आर्थिक बळ द्यावे, जेणेकरून हिंदूंच्या लढ्याला एकप्रकारे बळ मिळेल.’’
सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम, वेदमूर्ती भूषण जोशी आणि ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. भरत राऊळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सद्गुरु सत्यवान कदम आणि अन्य मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.सांगतेच्या वेळी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साहाय्य केलेल्या सर्वांचे या वेळी आभार व्यक्त करण्यात आले. सोहळ्याचे सूत्रसंचालन कु. प्रिया मिसाळ यांनी केले.
‘सनातन प्रभात’ लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’ची भूमिका निभावत आहे ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था
‘सनातन प्रभात’चा जो ज्ञानसूर्य प्रतिदिन प्रकाशित होतो, त्याच्या किरणांमुळे हिंदु राष्ट्राची चळवळ तेजोमय होत आहे, तसेच अनेकांचे जीवनही उजळून निघत आहेत. सनातन हिंदु धर्माचा विचार अग्रस्थानी ठेवून, किंबहुना या विचारांचेच अधिष्ठान ठेवून २५ वर्षे अव्याहतपणे ‘सनातन प्रभात’ची वाटचाल चालू आहे. गेल्या काही वर्षांपासून देशभरात हिंदुत्वाचे वारे वहात असल्याचे चित्र आहे; पण जेव्हा ‘हिंदुत्वाचा पुरस्कार करणे हाही अपराध वाटावा’, अशी स्थिती होती, तेव्हा ‘सनातन प्रभात’ने निर्भीडपणे हिंदुत्वाची बाजू उचलून धरली. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मधून अत्याचारी इंग्रज सरकारवर आसूड ओढले होते. हिंदु राष्ट्राच्या चळवळीत ‘सनातन प्रभात’ची भूमिकाही ‘केसरी’प्रमाणे म्हणजे एखाद्या सिंहाप्रमाणेच आहे.
हिंदुत्व, हिंदु राष्ट्र यांविषयीच्या आध्यात्मिक संकल्पना सुस्पष्ट करून त्याविषयी जागृती करण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ करत आहे. ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणार्या महत्त्वपूर्ण विषयांवरील लेख आणि माहिती यांचा धर्मप्रसार करतांनाही विशेष लाभ होतो.
‘सनातन प्रभात’ हे हिंदूंचे व्यासपीठ ! – भरत राऊळ, ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी
१. ‘ब्राह्मतेज’ आणि ‘क्षात्रतेज’ हा ‘सनातन प्रभात’चा गाभा आहे. सध्या वृत्तपत्राच्या क्षेत्रात जेथे ‘पाकीट संस्कृती’ची (पैसे देऊन बातम्या छापण्याची) बजबजपुरी आहे, तेथे ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहरांपासून संपादकांपर्यंत कुणीही वेतन घेत नाही. ते निःस्वार्थी भावाने हिंदु राष्ट्राची सेवा म्हणून कार्यरत आहेत.
२. ‘सनातन प्रभात’ हे बीजरूपात कार्य करणारे वृत्तपत्र आहे. जे विषय ‘सनातन प्रभात’ने मांडले, त्या विषयांनी पुढे आंदोलनाचे स्वरूप घेतले. धर्मद्रोह्यांच्या अशास्त्रीय आवाहनांना धर्मशास्त्र मांडून चोख प्रत्युत्तर दिले आहे. हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनाला वैचारिक पाठबळ देण्याचे कार्य आणि ‘हिंदुत्वाचे कार्य हे साधना म्हणून कसे करावे ?’ याचे मार्गदर्शन सनातन प्रभात करते. ‘सनातन प्रभात’चे वाचक हे केवळ ‘वाचक’ नसून रस्त्यावर उतरून कार्य करणारे हिंदुत्वनिष्ठ आहेत. त्यामुळे सर्वांगांनी ‘सनातन प्रभात’ हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ आहे.
३. ‘सनातन प्रभात’ने प्रकाशित केलेल्या बातम्या आणि लेख प्रत्येक मासाला संकेतस्थळ आदी माध्यमांतून २५ लाखांपेक्षा अधिक वेळा वाचले जातात. ‘सोशल मिडिया’वरही ‘सनातन प्रभात’ लोकप्रिय आहे, हे यातून लक्षात येते.