वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात हिंदूंचे धर्मांतर रोखण्‍यासाठीच्‍या उपायांवर विचारमंथन !

धर्मांतर रोखण्‍यासाठी हिंदूंनी आदिवासींच्‍या घरापर्यंत पोचायला हवे ! – महेंद्र राजपुरोहित, अग्‍नीवीर, नवसारी, गुजरात

श्री. महेंद्र राजपुरोहित

विद्याधिराज सभागृह (रामनाथी, गोवा) – आदिवासींचे धर्मांतर करण्‍यासाठी ख्रिस्‍ती मिशनर्‍यांकडून षड्‍यंत्र चालू आहे. ख्रिस्‍ती मिशनरी आदिवासींना आर्थिक साहाय्‍य करून त्‍यांच्‍यामध्‍ये स्‍वतःविषयी सहानुभूती निर्माण करत आहेत. त्‍यातूनच धर्मांतर होते. आदिवासींच्‍या घरामध्‍ये जाऊन ख्रिस्‍ती त्‍यांना जवळ करतात. त्‍यांच्‍या समस्‍या सोडवतात. हिंदू संघटना मात्र आदिवासींपर्यंत पोचत नाहीत आणि ‘आदिवासी धर्मांतर करतात’, असे म्‍हणतात. प्रत्‍येक आदिवासी कुटुंबाच्‍या घरापुढे तुळस असते, कपाळाला टिळा लावलेला असतो. प्रत्‍येकाच्‍या घरी गाय असते. असे असूनही ‘आदिवासी धर्मांतर का करतात ?’, यावर विचार करणे आवश्‍यक आहे. आदिवासींचे धर्मांतर रोखण्‍यासाठी हिंदूंना तळागाळापर्यंत जाऊन आदिवासींना धर्माविषयी जागृत करावे लागेल. आदिवासींचे धर्मांतर रोखण्‍यासाठी आम्‍हीही आदिवासी कुटुंबियांपर्यंत पोचलो. आदिवासी युवक-युवतींचे सामूहिक विवाह लावून देणे, युवकांसाठी खेळांचे आयोजन करणे आणि महिलांना रोजगार उपलब्‍ध करून देणे यांसाठी आम्‍ही प्रयत्न केले. आतापर्यंत आम्‍ही ९ सहस्र आदिवासी बंधू-भगिनींची घरवापसी केली आहे. मोगल आणि इंग्रज यांनी आक्रमण करूनही आपल्‍या पूर्वजांनी हिंदु धर्म सोडला नाही, याचा आपण अभिमान बाळगायला हवा, असे उद़्‍गार नवसारी (गुजरात) येथील ‘अग्‍नीवीर’ संघटनेचे श्री. महेंद्र राजपुरोहित यांनी काढले. ते १६ ते २२ जून या कालावधीत रामनाथी (गोवा) येथे आयोजित केलेल्‍या वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात उपस्‍थितांना संबोधित करत होते.


हिंदु धर्माच्‍या रक्षणासाठी युवकांना प्रेरित करा ! – प्रकाश सिरवाणी, पश्‍चिम विदर्भ संपर्कप्रमुख, भारतीय सिंधू सभा

श्री. प्रकाश सिरवाणी

धर्माचे रक्षण करायचे असेल, तर प्रथम स्‍वत: धर्माचरण करायला हवे. हिंदु युवकांच्‍या कपाळाला टिळा दिसत नाही. आपल्‍या पूर्वजांनी जानवे, टिळा आणि शिखा (शेंडी) यांच्‍या रक्षणासाठी प्राणांचा त्‍याग केला. हिंदु युवक मात्र कपाळाला टिळा लावत नाहीत. हिंदु धर्माच्‍या रक्षणासाठी युवकांना प्रेरित करायला हवे. उल्‍हासनगर येथील सिंधी बांधव दुपारनंतर दुकाने बंद करतात. दुपारनंतरच्‍या वेळेत ही दुकाने ख्रिस्‍त्‍यांनी भाड्याने घेऊन तेथे त्‍यांचे कार्य चालू केले आहे. येथील काही घरांमध्‍ये ख्रिस्‍त्‍यांनी प्रार्थना चालू केल्‍या. अशा सिंधी लोकांच्‍या नातेवाइकांच्‍या घरामध्‍ये आम्‍ही सत्‍संग चालू केले. हिंदूंनी आपल्‍या धर्मग्रंथांचा अभ्‍यास केल्‍यास हिंदूंचे धर्मांतर होणार नाही.


धर्मांतरितांचे शुद्धीकरण केल्‍यानंतर कायदेशीर वैधता प्राप्‍त होण्‍यासाठी आवश्‍यक त्‍या कागदपत्रांची पूर्तता करा ! – अधिवक्‍ता नागेश जोशी, हिंदु विधीज्ञ परिषद, गोवा

अधिवक्‍ता नागेश जोशी

धर्मांतरितांची शुद्धीकरण प्रक्रिया (घरवापसी) या सर्व गोष्‍टी कायद्यांतर्गत येणारी कार्ये आहेत. भारतीय दंड संहितेच्‍या कलम २५ नुसार भारत एक ‘धर्मनिरपेक्ष देश’ असल्‍याने कोणत्‍याही व्‍यक्‍तीला वेगळा धर्म स्‍वीकारण्‍याची मुभा आहे. तसेच त्‍याचा प्रसार-प्रचारही करता येतो. हे कलम ख्रिस्‍ती आणि मुसलमान यांच्‍यासह हिंदूंनाही लागू आहे. धर्मांतरितांचे शुद्धीकरण करण्‍यासाठी धार्मिक विधींसह काही नियम बनवले पाहिजेत. ज्‍याची शुद्धीकरण प्रक्रिया राबवायची आहे, त्‍याचे ओळखपत्र, निवडणूकपत्र, रहिवासी पुरावा अशी कागदपत्रे घ्‍यावी. त्‍यानंतर ‘माझे सनातन हिंदु धर्माविषयी आकर्षण असल्‍याने मी हा धर्म स्‍वीकारत आहे’, अशा पद्धतीचे प्रतिज्ञापत्र लिहून घ्‍यावे. त्‍यानंतर शुद्धीकरणाचा विधी करावा. त्‍यानंतर ‘अ‍ॅफिडेव्‍हिट’ (प्रतिज्ञापत्र) बनवावे. त्‍याने नवीन नाव धारण केल्‍यावर त्‍याला ‘गॅझेट पब्‍लिकेशन’ (हिंदु धर्म स्‍वीकारल्‍याच्‍या संदर्भात वर्तमानपत्रातून निवेदन देणे) करायला सांगितले पाहिजे. या सर्व प्रक्रियेमुळे कागदोपत्री माहिती एकत्रित होते. आतापर्यंत लक्षात आले आहे की, हिंदूंचे अन्‍य पंथात धर्मांतर झाल्‍याची कागदपत्रे मिळतात; पण हिंदु धर्मात ‘घरवापसी’ झाल्‍याची कागदपत्रे बहुधा मिळत नाहीत. त्‍यामुळे कागदोपत्री माहिती जमा करण्‍याला महत्त्व आहे. या संदर्भातील कायदा करण्‍यासाठी ही माहिती कालांतराने सरकारला देता येते. एखाद्या सरकारने ‘घरवापसी बंदी’चा कायदा आणला, तर तो कायदा रहित होऊ नये, यासाठी या माहितीचा उपयोग होईल. त्‍यामुळे शुद्धीकरण प्रक्रियेची कागदपत्रे असणे आवश्‍यक आहे.


अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याची दिशा भारतविरोधी शक्‍तींनी निश्‍चित केली आहे ! – चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था

श्री. चेतन राजहंस

हिंदु धर्म दुराचाराला अधर्म मानतो. विश्‍वकल्‍याणाच्‍या भावनेने काम करणे, हा धर्म आहे. योग्‍य कृतीलाच धर्म म्‍हटले आहे. अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याच्‍या नावाखाली अन्‍यांना पिडा देणे, हा अधर्म आहे. अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्यातील मुख्‍य अडचण ही आहे की, अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्य कि स्‍वैराचार ? हे नेमके कोण निश्‍चित करणार ? अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्य नेमके कोणते ? याची दिशा भारतविरोधी शक्‍तींनी निश्‍चित केली आहे. यामध्‍ये डाव्‍या शक्‍ती आघाडीवर आहेत. अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याचा अनावश्‍यक प्रसार करण्‍यात आला आहे. हे अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्य साम्‍यवादी, डावे, नक्षलवादी आदी राष्‍ट्रविरोधी शक्‍तींच्‍या बाजूने झुकलेले आहे. राज्‍यघटनेतील कलम १९ (१ ए) नुसार प्रत्‍येकाला अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्य आहे; मात्र १९ (२) नुसार भारताच्‍या अखंडत्‍वाच्‍या दृष्‍टीने अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याला प्रतिबंधही घालण्‍यात आला आहे. सद्यःस्‍थितीत अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्य सोयीनुसार वापरले जात आहे. शबरीमला मंदिरामध्‍ये स्‍त्रियांच्‍या प्रवेशासाठी अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याचे सूत्र म्‍हणून उपस्‍थित केले जाते; मात्र अन्‍य धर्मियांविषयी हे अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्यवाले मूग गिळून गप्‍प रहातात.

संपादकीय भूमिका

अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याची व्‍याख्‍या स्‍पष्‍ट करून त्‍याचा अपलाभ घेणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई करायला हवी !