डिचोली, २८ जून (वार्ता.) – २९ जून या दिवशी ‘बकरी ईद’ (कुर्बानी) साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर डिचोली येथे गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे २५ गोवंशियांना जीवदान देण्यात आले.
डिचोली येथे मशिदीच्या मागे गोवंश आणला जात असल्याची तक्रार गोरक्षकांनी केल्यानंतर डिचोली पालिसांनी घटनास्थळी धाव घेऊन २५ गोवंशियांची सुटका केली. या गोवंशियांना सिकेरी, मये येथील ‘गोमंतक गोसेवा संघा’च्या गोशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती डिचोली पोलिसांनी दिली आहे.
घटनेवरून गुन्हा नोंद नाही
पोलीस सूत्रांनुसार सायंकाळपर्यंत याविषयी कुणावरही गुन्हा नोंद झालेला नाही. गोवंशियांची हत्या न झाल्याने कुणाच्याही विरोधात गुन्हा नोंद न झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मशिदीच्या मागे एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोवंश का आणण्यात आला ? गोवंश आणणे आणि ‘कुर्बानी’ यांचा काय संबंध आहे ? गोवंश आणणार्यांच्या विरोधात गुन्हाच नोंद न झाल्यास त्यांच्यावर कारवाई कशी होणार ? आणि कारवाई न झाल्यास बकरी ईदच्या अगोदर सर्रासपणे राज्यभर घडणार्या अशा घटनांना आळा कसा बसणार ? गोव्यातील अनधिकृत पशूवधगृहांवर शासकीय यंत्रणा आणि पोलीस यांचे नियंत्रण आहे का?, असे अनेक प्रश्न गोप्रेमींनी उपस्थित केले आहेत.
गोवंश आणणार्यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंदवा ! – हनुमंत परब, अध्यक्ष, गोवंश रक्षा अभियान
डिचोली येथे गोवंश आणणार्यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंदवावा. या प्रकरणी शासन आणि पोलीस यांनी सखोल अन्वेषण करणे आवश्यक आहे. हा गोवंश कुठून आणला ? कुठल्या वाहनाने आणला ? वाहनाचे क्रमांक काय आहेत आणि वाहनांचे मालक कोण आहेत ? गोवंश कुणाकडून खरेदी केला ? याचे सविस्तर अन्वेषण करून दोषींना शिक्षा करा, अशी मागणी गोवंश रक्षा अभियानचे अध्यक्ष श्री. हनुमंत परब यांनी केली आहे.
संपादकीय भूमिकागोरक्षकांच्या लक्षात येते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेले प्रशासन आणि पोलीस यांच्या का लक्षात येत नाही ? |