VHP Campaign Free Hindu Temples : विश्‍व हिंदु परिषद मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी लवकरच राष्ट्रीय मोहीम राबवणार !

नवी देहली – भारतात एकही मशीद किंवा चर्च सरकारच्या नियंत्रणात नाही. जेव्हा अल्पसंख्यांक मुसलमान आणि ख्रिस्ती त्यांची धार्मिक स्थळे चालवू शकतात, तर हिंदू का नाही ? एकट्या तमिळनाडूमध्ये ४०० हून अधिक मंदिरे सरकारने नियंत्रणात घेतली आहेत. हे राज्यघटनेचे उल्लंघन आहे. सर्वोच्च न्यायालयानेही ‘मंदिराच्या संपत्तीच्या कारभाराशी सरकारचा काहीही संबंध नसावा’, असे तीनवेळा निकाल दिले आहेत मंदिरांच्या मालमत्तेचा दुरुपयोग अशा कामासाठी केला जातो, ज्यासाठी भक्तांनी दान दिलेले नाही. अनेक उदाहरणे याच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे विश्‍व हिंदु परिषद लवकरच संपूर्ण देशात मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय मोहीम राबवणार आहे, अशी माहिती विहिंपचे सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.

काशी आणि मथुरा मुसलमानांनी परत दिले, तर हिंदू थांबतील !

मुसलमान आक्रमकांनी भारतातील लाखो मंदिरे पाडली आणि त्यावर मशिदी बांधल्या. हे संपूर्ण जगाला ठाऊक आहे. वर्ष १९८४ मध्ये भारतातील संतांनी मुसलमानांना  चांगला प्रस्ताव दिला होता. ‘तुम्ही आम्हाला केवळ अयोध्या, मथुरा आणि काशी द्या. आम्ही अन्य लाखो मंदिरे विसरू.’ त्यांनी ते मान्य न केल्याने आजच्या परिस्थितीला मुसलमानांचे नेतृत्व उत्तरदायी आहे. त्या वेळी मुसलमानांनी मान्य केले असते, तर ही ३ ठिकाणे आमची असती आणि आताचे विषय पुढे आले नसते. आता ३ पैकी २ उरली आहेत. मला वाटते २ स्थाने दिली, तर समाजातील जागृत वर्गाला समजावून सांगू शकू की, सर्वत्र मंदिरे शोधू नका. त्यामुळे मथुरा आणि काशी हिंदूंना परत देण्याची मुसलमान समाजाला अजूनही संधी आहे. हिंदु समाज एकोपा आणि सौहार्द यांसाठी थांबू शकतो.