‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर उसगाव (गोवा) येथील पशूवधगृहाच्या परिसरात ५ दिवसांचा जमावबंदी आदेश लागू

पणजी, २६ जून (वार्ता.) – सरकारने आधुनिकीकरण केलेल्या उसगाव येथील पशूवधगृहाच्या परिसरात ‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर २८ जून ते १ जुलै या कालावधीत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पशूवधगृह प्राणीहत्येसाठी सिद्ध करण्याच्या अनुषंगाने पशूवधगृहाच्या अधिकार्‍यांकडे चर्चा केलेली आहे, असे आदेशात म्हटले आहे.

दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी या अनुषंगाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, ‘अखिल गोवा मुस्लिम जमात संघटना’ इतर राज्यांतून मोले आणि पोळे या तपासनाक्यांवरून ‘कुर्बानी’साठी पशूंची उसगाव येथील पशूवधगृहात वाहतूक करणार आहे. (कुर्बानीसाठी पशूंची वाहतूक करणारे अल्पवयीन आणि दुभते गोवंश, तसेच गायी आणत नाहीत ना ? याची तपासणी प्रशासन करणार कि नाही ? ‘बकरी ईद’च्या (कुर्बानी) पार्श्वभूमीवर अवैधरित्या पशूवाहतूक केली जाते, असे आजपर्यंत लक्षात आले आहे. ती गोरक्षक लक्षात आणून देतात. गोरक्षकांना रोखण्यासाठी हा जमावबंदी आदेश लागू आहे का ? – संपादक)