बराक ओबामा यांचे नक्राश्रू !

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘सी.एन्.एन्.’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भारतातील मुसलमानांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली. अमेरिकेच्या दौर्‍यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या भेटीपूर्वी भारतातील मुसलमानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करून ‘याविषयी जो बायडेन यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी याविषयी चर्चा करावी’, असा सल्ला दिला. जो बायडेन ज्या ‘डेमॉक्रॅटिक’ पक्षाचे नेते आहेत, त्याच पक्षाचे बराक ओबामा हेही नेते आहेत. त्यामुळे मोदी यांच्याशी चर्चा करण्याविषयी बराक ओबामा यांना जो बायडेन यांच्याशी प्रत्यक्ष बोलून सुचवण्यात कोणतीही अडचण नव्हती; मात्र ओबामा यांनी हा विषय माध्यमांपुढे नेला. यावरून मोदी यांच्याशी चर्चा होण्याऐवजी ‘जागतिक स्तरावर भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असा आभास निर्माण करून भारताची अपकीर्ती करण्याचाच हेतू दिसून येतो. जगात अनेक देशांत बहुसंख्य समाजाकडून अल्पसंख्यांक पीडित आहेत; मात्र भारत हा एकमात्र देश आहे की, ज्यामध्ये बहुसंख्यांक समाज अल्पसंख्यांकांकडून पीडित आहे. बराक ओबामा यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे भारतातील लोकशाही आणि राजकीय परिस्थिती यांविषयी बराक ओबामा अनभिज्ञ आहेत, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे ‘बराक ओबामा यांनी मुसलमानांच्या सुरक्षिततेविषयी ढाळलेले नक्राश्रू हे जागतिक स्तरावर भारताची पर्यायाने हिंदूंची अपकीर्ती करण्यासाठीच आहेत’, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे.

बराक ओबामा जेव्हा मुसलमानांना पीडित आणि असुरक्षित दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्याचा दुसरा अर्थ ते हिंदूंना हिंसक ठरवत आहेत. बराक ओबामा यांच्यासारख्या नेत्याने आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला मुलाखत देतांना मुसलमान कोणत्या प्रकरणात पीडित आहेत आणि हिंदू कोणत्या घटनेत हिंसक आहेत ? याचे एकही उदाहरण दिलेले नाही.  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बोलतात, तेव्हा त्याची चर्चा जगात होणार, हे स्वाभाविक आहे. ‘भारतात डाव्यांनी हिंदुविरोधी वातावरण निर्माण करायचे आणि जागतिक स्तरावरील भारतविरोधी शक्तींनी त्याला हवा द्यायची’, हे समीकरण मागील अनेक वर्षे चालू आहे. ओबामांचे नक्राश्रू ही त्याचीच पुनरावृत्ती होय. जगातील एकाही इस्लामिक राष्ट्रात नाहीत इतक्या सुविधा ‘अल्पसंख्यांक’ म्हणून भारतात मुसलमानांना दिल्या जातात. अल्पसंख्यांकांच्या नावाखाली मुसलमानांना सुविधा देण्यासाठी काँग्रेसनेच भारतात स्वतंत्र अल्पसंख्यांक मंत्रालय स्थापन केले. सच्चर आयोगाच्या शिफारसीनंतर स्वत: देशाच्या पंतप्रधानांनी मुसलमानांच्या विकासासाठी १३ कलमी कार्यक्रम घोषित केला. तरीही ‘अल्पसंख्यांक’ म्हणून मुसलमानांविषयी सहानुभूती निर्माण करून हिंदूंनाच झोडणे, हे हिंदूंच्या अपकीर्तीचे जागतिक षड्यंत्र आहे.

हे प्रश्न ओबामा विचारतील का ?

प्रतिकात्मक छायाचित्र

देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या रोहिंग्या मुसलमानांना म्यानमार या बौद्ध देशातून निर्वासित व्हावे लागले. त्या वेळी मुसलमान असूनही पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा बांगलादेश या देशांनी रोहिंग्यांना आश्रय दिला नाही. रोहिंग्यांचा धर्मांध स्वभाव जाणूनही त्यांना भारताने आश्रय दिला. भारताने आश्रय देऊनही देहलीमध्ये झालेल्या दंगलींमध्ये रोहिंग्या मुसलमानांचा सहभाग असल्याचे आढळून आले. याविषयी ओबामांसारखे नेते कधी तोंड उघडत नाहीत. मागील काही वर्षांत भारतातील मुसलमानांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याउलट बांगलादेश आणि पाकिस्तान येथील हिंदू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बराक ओबामा यांना अल्पसंख्यांकांविषयी इतकीच सहानुभूती वाटत असेल, तर बांगलादेश आणि पाकिस्तान येथील अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचारांविषयी ते का बोलत नाहीत ? याचे कारण बराक ओबामा यांची सहानुभूती पीडितांसाठी नाही, तर जागतिक स्तरावर हिंदूंना मुसलमानविरोधी दाखवून भारताची अपकीर्ती करण्यासाठीच त्यांचे नक्राश्रू आहेत.

साम्यवाद्यांचा अजेंडा !

मागील काही दिवसांपासून भारतातील धर्मांधांकडून औरंगजेबाचे उदात्तीकरण करून हिंदूंना जाणीवपूर्वक उकसावण्यात आले. या वेळी धर्मांध औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍या मुसलमानांचे कान काँग्रेस, साम्यवादी, पुरोगामी मंडळी आणि तथाकथित सर्व ‘सेक्युलर’ (निधर्मी) मंडळी यांनी धरले नाहीत. या वेळी गप्प असलेल्या या मंडळींनी मुसलमानांच्या धर्मांधतेच्या विरोधात हिंदूंनी प्रतिकाराची भाषा केली, त्या वेळी ‘अल्पसंख्यांकांवर अत्याचार’, अशी बोंब मारायला प्रारंभ केला. बराक ओबामा यांचे नक्राश्रू आणि भारतातील तथाकथित सेक्युलरवाद्यांचा मुसलमानधार्जिणेपणा यांमध्ये ‘हिंदूंचे नामोहरण’ हा समान धागा आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून किंबहुना त्यापूर्वीच ‘देशात अल्पसंख्यांक पीडित आहेत’, ही न्यूनगंडाची भावना काँग्रेसने हिंदूंच्या मनात जाणीवपूर्वक निर्माण केली आणि हिंदूंना नेहमीच दाबण्याचा प्रयत्न केला.

 

मोगलांनी भारतावर आक्रमण करून हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. हिंदूंना धर्मांतरित केले. हिंदूंची मंदिरे पाडली. स्वतंत्र भारतातही आतंकवादी कारवाया करून धर्मांध मुसलमानांनी हिंदूंना जेरीस आणले आहे. काश्मीरमधून लाखो हिंदूंना विस्थापित करणारेही धर्मांध मुसलमान आहेत. त्यामुळे खरेतर अपराधीपणाची भावना मुसलमानांमध्ये असायला हवी. त्याऐवजी काँग्रेसने हिंदूंनाच धर्मांध ठरवले. मागील अनेक वर्षांमध्ये जाणीवपूर्वक अशा प्रकारे न्यूनगंड निर्माण करून हिंदुत्व बोथट करण्याचे काम काँग्रेसने केले. भारतातील साम्यवादी, तथाकथित पुरोगामी आणि ओबामा हे एकाच माळेचे मणी आहेत. त्यामुळे या षड्यंत्राला न फसता हिंदूंनी धर्मांधांच्या राष्ट्र आणि हिंदु विरोधी कारवाया उघड करून साम्यवाद्यांचा खोटारडेपणा उघड करावा.