रांची – झारखंडच्या संथाल परगणासह इतर भागांत बांगलादेशी मुसलमानांची घुसखोरी चालूच आहे. झारखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येपेक्षा अधिक आधारकार्ड बनवण्यात आल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. त्याची आकडेवारीही उपलब्ध आहे. यापूर्वीही राज्यात मतदारांच्या संख्येत असामान्य वाढ झाल्याची चर्चा होती. (भारतीय नागरिकांना आधीच अल्प ठरत असलेल्या साधनसंपत्तीचा घुसखोर अपलाभ उठवत आहेत आणि त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. हे लक्षात घेऊन सरकारने घुसखोरांना हद्दपार करण्यासाठी कठोर पावले उचलणे अपेक्षित आहे ! – संपादक)
१. झारखंडमधील संथाल परगणाचा भाग असलेल्या साहिबगंज आणि पाकूर येथे लोकसंख्येपेक्षा अधिक आधारकार्ड बनवण्यात आले आहेत. ऑक्टोबर २०२४ पर्यंत साहिबगंजची अंदाजे लोकसंख्या १३ लाख ८० सहस्र होती, तर तेथे १४ लाख ५३ सहस्र आधारकार्ड बनले आहेत. त्याचप्रमाणे पाकूरमध्येही अंदाजे लोकसंख्या १० लाख ८९ सहस्र आहे; परंतु तेथे ११ लाख ३६ सहस्र आधारकार्ड बनले आहेत. म्हणजेच या २ जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत १०४ टक्के आधारकार्ड बनले आहेत.
२. असाच एक प्रकार लोहरदगा येथूनही समोर आला आहे. येथे ५ लाख ५८ सहस्र लोकसंख्येसाठी ६ लाख ८ सहस्र आधारकार्ड बनवण्यात आले आहेत. म्हणजेच लोकसंख्येच्या तुलनेत येथे १०८ टक्के आधार क्रमांक सिद्ध झाले आहेत.
३. केंद्र सरकारने अलीकडेच संथाल परगणा जिल्ह्यांमध्ये गुप्तचर यंत्रणांचे एक पथक पाठवले होते. या पथकाने साहिबगंजच्या अनेक भागांनाही भेट दिली होती. हे पथक बांगलादेशी मुसलमानांच्या घुसखोरीचे पुरावे घेऊन होते.
४. झारखंडमधील अवैध घुसखोरीविषयी उच्च न्यायालयातही खटला चालू आहे. उच्च न्यायालयाने राज्यातील बांगलादेशी घुसखोरांचे सर्वेक्षण करून त्यांना हद्दपार करण्याचे निर्देशही दिले आहेत.
संपादकीय भूमिकाझारखंडमध्ये मुसलमानांचे लांगूलचालन करणारे झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार सत्तेत असल्यामुळे आणखी वेगळे काय होणार ? आता केंद्र सरकारनेच येथे लक्ष घालून या घुसखोरांना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ! |