धर्मांतर रोखून सनातन धर्माचे रक्षण करू, अशी प्रतिज्ञा करा ! – पू. चित्तरंजन स्वामी महाराज, शांती काली आश्रम, अमरपूर, त्रिपुरा

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ षष्ठम दिवस – मान्यवरांचे विचार

विद्याधिराज सभागृह, २१ जून (वार्ता.) – त्रिपुराममधील धर्मांतराची स्थिती तेथे आल्यानंतरच लक्षात येऊ शकते. वर्ष १९८५-८६ पासून त्रिपुरामध्ये हिंदूंचे धर्मांतर मोठ्या प्रमाणात होऊ लागले. माझे गुरु शांतीकाली महाराज यांच्यासह मीही धर्मांतर रोखण्याचे कार्य करू लागलो. माझ्या मोठ्या भावाचे अपहरण करून त्याला ‘तुझ्या भावाला (पू. चित्तरंजन स्वामी यांना) धर्मांतर रोखण्याचे काम थांबवायला सांग’, अशी धमकी दिली; परंतु गुरूंच्या कृपेने मी कार्य चालू ठेवले. नोकरी सोडून धर्मांतर रोखण्यासाठी प्रयत्न केले. या कार्यात विश्‍व हिंदु परिषदेचे अशोक सिंघल, रा.स्व. संघाचे मोहन भागवत यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती पू. चित्तरंजन स्वामी महाराज यांनी वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सहाव्या दिवशी झालेल्या सत्रात दिली.

पू. चित्तरंजन स्वामी महाराज

ते पुढे म्हणाले …

१. शिक्षणाच्या नावाखाली ख्रिस्ती धर्मप्रचारक अनेक राज्यांमध्ये घुसखोरी करतात. मणीपूर आणि नागालँड या राज्यांत मोठ्या प्रमाणत हिंदूंचे धर्मांतर होते. २५ पाद्री, नन, तसेच १ सहस्र प्रचारक त्रिपुरामध्ये येऊन धर्मांतराचे कार्य करत आहेत.

२. त्रिपुरामधील लोक भोळे आहेत. ते शिक्षणाला महत्त्व देतात. ख्रिस्त्यांनी तेथे मुलांसाठी शाळा काढल्या आहेत. शाळेत घातल्यानंतर २-३ वर्षांनी ख्रिस्ती धर्मप्रसारक त्या मुलांच्या पालकांना भेटतात. ‘तुमचे मूल हुशार आहे. त्याच्यात क्षमता आहे. त्याला बाप्तिस्मा द्या. (धर्मांतर करा) आम्ही त्याला चांगले शिक्षण देऊ’, असे सांगतात. भोळे हिंदू त्याला भुलतात आणि अशा प्रकारे कुटुंबाचे धर्मांतर केले जाते.

३. गुरूंच्या आशीर्वादाने धर्मांतराच्या विरोधात आम्ही लढा देत आहोत. पुढील २ वर्षांत मिझोराम आणि नागालँड येथून आलेल्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांना आम्ही परत पाठवू.

४. त्रिपुरात मठ-मंदिरांमध्ये अनेक साधू-संत आहेत; परंतु तेथे येणार्‍या हिंदूंना धर्माचे शिक्षण दिले जात नसल्याने धर्मांतराची समस्या फोफावली आहे. हिंदु धर्म वाचला, तर मठ-मंदिरे टिकणार आहेत. त्यामुळे प्रथम हिंदु धर्म वाचवण्यासाठी प्रयत्न करा.

५. येथे देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी प्रतिज्ञा करावी की, आम्ही धर्मांतर रोखून सनातन धर्माचे, हिंदूंचे रक्षण करू आणि प्रसंगी धर्मासाठी प्राणत्यागही करू.