(म्हणे) ‘पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीचे काम सरकारचे नव्हे !’ – काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन

 काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना पोटशूळ !

काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन

मडगाव, १३ जून (वार्ता.) – पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीचे काम सरकारचे नव्हे. मंदिरे, मशीद आणि चर्च यांची पुनर्बांधणी करण्याचे काम संबंधित भक्तगणांचे आहे, असे विधान काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केले. पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीचे कार्य गोवा सरकारने हाती घेतले आहे. यासाठी सरकारने २० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे आणि मंदिरांची सूची सिद्ध करण्यासाठी तज्ञांची ५ सदस्यीय समिती नेमली आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतेच गोव्यातील पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा नष्ट करण्याचे आवाहनही गोमंतकियांना केले होते. या पार्श्वभूमीवर खासदार सार्दिन यांनी हे विधान केले.

खासदार सार्दिन पुढे म्हणाले, ‘‘मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सांगू इच्छितो की, त्यांनी सरकारचे व्यवस्थापन चांगले करण्यावर भर दिला पाहिजे. जनतेला सुशासन आणि कार्यक्षम सरकारची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गोमंतकियांवर संस्कृती लादण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येक गोमंतकियास त्याला हव्या त्या संस्कृतीचे अनुकरण करण्यास द्यावे.

पोर्तुगिजांनी त्यांच्या राजवटीत काही वाईट गोष्टी केल्या, त्याप्रमाणे चांगल्या गोष्टीही केल्या आहेत. पोर्तुगीज या भूमीतून गेल्यानंतर त्यांनी केलेल्या वाईट गोष्टी संपुष्टात आलेल्या असून ज्या काही चांगल्या गोष्टी होत्या, त्या गोमंतकीय संस्कृतीत मिसळून गेल्या आहेत आणि ती आता गोमंतकियांची संस्कृती बनली आहे. तसेच काही गोमंतकीय पोर्तुगालमध्ये स्थायिक झालेले आहेत आणि त्यांनी तेथील संस्कृतीत गोमंतकीय संस्कृतीतील काही गोष्टी मिसळवलेल्या आहेत. हे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ध्यानात ठेवावे.’’ (पोर्तुगिजांनी गोमंतकीय हिंदूंवर केलेले पाशवी अत्याचार गोमतकियांनी विसरावे, असे खासदार सार्दिन यांना वाटते का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • हिंदूंसाठी आर्थिक प्रावधान केल्यावर अल्पसंख्यांक कसा गळा काढतात ? त्यांच्या पोटात कसे दुखते ? ते खासदार सार्दिन यांच्या वक्तव्यातून दिसून येते.
  • जुने गोवे येथील शवप्रदर्शनाला येणारा खर्च, प्रतिवर्षी तेथे होणार्‍या जत्रेनिमित्त होणारा खर्च हाही सरकारने करायचा नाही, तर चर्च संस्थेने करावा, असे खासदार सार्दिन सांगतील का ?
  • त्याचप्रमाणे चर्च संस्थेच्या डायोसेसन संस्थांना शिक्षणासाठी सरकारने अनुदान देऊ नये, असे खासदार सार्दिन यांनी सांगावे !
  • हज यात्रेसाठी सरकारकडून देण्यात येणारे अनुदानही रहित करण्याची खासदार सार्दिन यांनी मागणी करावी.