गोवा येथे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचे आयोजन !
अकोला, १३ जून (वार्ता.) – हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. याविषयीची माहिती हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
या वेळी ते म्हणाले की, हिंदु धर्म हा एकमात्र धर्म आहे की, जो समाजाला जोडू शकतो, तो विश्वबंधुत्वाची आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ची संकल्पना मांडू शकतो. त्यामुळे भारताचे पुन्हा तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर भारताला आदर्श रामराज्य अर्थात् हिंदु राष्ट्र होण्याविना पर्याय नाही.
हॉटेल सेंटर प्लाझा येथे आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेस हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता मुकुंद जालनेकर, राष्ट्र जागृती मंचचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय ठाकूर, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या अधिवक्त्या श्रुती भट याही उपस्थित होत्या.
अकोला जिल्ह्यातून एकूण १० संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ते हेही या महोत्सवाला उपस्थित रहाणार आहेत. या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच समितीच्या ‘HinduJagruti या ‘यु-ट्यूब’ चॅनेल आणि facebook.com/hjshindi1 या फेसबूक द्वारेही केले जाणार आहे.