रामराज्य असेल, तरच न्याय प्रस्थापित होईल ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

रायपूर (छत्तीसगड) – ‘रामराज्य’ असे म्हणतांना जी गोष्ट येते, ती ‘हिंदु राष्ट्र’ असे म्हणतांना येत नाही. आम्हाला हिंदु राष्ट्र नको आहे. आमची रामराज्याची इच्छा आहे. हिंदु राष्ट्र रावण आणि कंस यांचेही होते; पण प्रजेला त्रास झाला. सर्वांत आदर्श राज्य रामराज्य होते. आपल्याला नवीन राज्य स्थापन करायचे आहे, त्यामुळे आपण रामराज्याविषयी का बोलत नाही ? रामराज्य असेल, तरच न्याय प्रस्थापित होईल, असे विधान ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.

शंकराचार्य पुढे म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी विद्वानांनी प्रदीर्घ चर्चेनंतर राज्यघटना बनवली. त्यात धर्मनिरपेक्ष राष्ट्राची संकल्पना मान्य करण्यात आली होती. आता धर्मनिरपेक्ष संकल्पनेतून आपल्या आकांक्षा पूर्ण होत नसल्याचे जनतेला वाटत असेल, तर त्यांनी आपापसांत चर्चा करून त्याचे स्वरूप ठरवावे. स्वरूप बाहेर आले, तर आपण त्याचे गुण-दोष विचारात घेऊ शकतो.

धर्मदंडाच्या अर्थाकडे दुर्लक्ष नको !

धर्मदंड

शंकराचार्य पुढे म्हणाले की, जुन्या संसद भवनात अध्यक्षांच्या आसनाच्या मागे ‘यतो धर्म: ततो जयः’ (जेथे धर्म असतो, तेथे जय असतो) असे लिहिलेले होते; परंतु ७५ वर्षांपासून या चिन्हांच्या अर्थाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचा विचार केला गेला नाही. आता नव्या संसदेत धर्मदंड ठेवण्यात आला; पण त्यामागचा अर्थ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या पत्रात किंवा पंतप्रधान मोदी यांच्या भाषणात आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतीकांचा अर्थ पूर्ण करू शकले, तर ते ऐतिहासिक ठरेल, अन्यथा ते केवळ कर्मकांडच ठरेल.

हिंदु समाजाला तोडण्याचे षड्यंत्र!

शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती म्हणाले की, राजकारणामुळे ‘आदिवासी हे ‘हिंदु’ नाहीत’, असे सांगितले जाते. आपण शहरांमध्ये स्थायिक झालो, याचा अर्थ असा नाही की, आपण कधीच वनवासी नव्हतो. आपली मुळेही जंगलाशी जोडलेली आहेत. आजही आपल्याला झाडे, फुले, पाने, लाकूड यांची आवश्यकता आहे. आज हिंदु समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत; पण आपण सर्वांनी एकजूट राहिले पाहिजे.

 जनतेची इच्छा असेल तर सरकार दारूबंदी करील !

दारूबंदीविषयी शंकराचार्य म्हणाले की, जनतेची इच्छा असेल, तर सरकारच्या साहाय्याने दारूबंदी होऊ शकते. आज घडणार्‍या सर्व गुन्ह्यांमध्ये दारूचा मोठा हात आहे. गुन्हेगारी थांबवायची असेल, तर दारूबंदी झाली पाहिजे.