१. सप्तर्षींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव करण्यास सांगणे
‘११.५.२०२३ या दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ‘हा जन्मोत्सव कसा साजरा करायचा ?’, याविषयी तमिळनाडूतील ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’चे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सप्तर्षींनी सांगितले होते. ‘नाडीभविष्य’ हे प्राचीन आणि प्रगल्भ असे ज्योतिषशास्त्र आहे.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे वैशिष्ट्य
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे हिंदु राष्ट्राच्या, म्हणजेच ईश्वरी राज्याच्या स्थापनेच्या कार्यासाठी गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ झटत आहेत आणि त्यांचे हे कार्य सनातनचे सद्गुरु, संत अन् साधक यांच्या माध्यमातून जगभर पसरले आहे. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवातून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचा परिणाम जगभरच नव्हे, तर ब्रह्मांडभर होणार, हे सप्तर्षी जाणून होते; म्हणून त्यांनी या जन्मोत्सवाला ‘ब्रह्मोत्सव’ हे नाव सुचवले आणि तो व्यापक स्तरावर (अधिकांश साधकांना प्रत्यक्ष, तसेच ‘ऑनलाईन’ पहाता येईल असा) करण्यास सांगितले होते. सप्तर्षींनीच परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा अवतार असल्याचे अनेक नाडीपट्ट्यांमध्ये लिहून ठेवले आहे आणि त्यांनीच परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म’ ही उपाधी लावायला सांगितले आहे.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे स्वरूप
सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे साधकांनी एक सुंदर रथ बनवला होता. त्या रथामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले विराजमान झाले. त्यांच्यापुढे त्यांच्या उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दोघीही विराजमान झाल्या. मोठ्या मैदानात साधकांनी तिन्ही गुरु असलेला हा रथ ओढत अंडाकृती फिरवला. त्या वेळी हा ब्रह्मोत्सव बघायला साधक भोवती ‘स्टेडियम’मध्ये बसतात, तसे बसले होते.
४. ब्रह्मोत्सवाची ईश्वराला अपेक्षित अशी फलनिष्पत्ती साध्य व्हावी, यांसाठी ईश्वराने सुचवलेले उपाय
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे समष्टी कार्य आध्यात्मिक आणि ज्ञानाच्या स्तरावर करत आहेत. त्यांचा ब्रह्मोत्सव साजरा होणे, हेही समष्टी कार्यच होते. त्यामुळे त्यामध्ये आसुरी शक्ती विघ्ने आणणारच होत्या ! तसेच ‘या ब्रह्मोत्सवाची ईश्वराला अपेक्षित अशी फलनिष्पत्ती साध्य होण्यासाठीही उपाय करायला हवेत’, हेही लक्षात आले. यांसाठी जे काही नामजपादी आध्यात्मिक उपाय करण्यास देवाने मला सुचवले, ते येथे दिले आहेत.
हे सर्व उपाय विविध संतांनी केले.
टीप : (न्यास करतांना हाताचा तळवा शरिरापासून १ – २ सें.मी. अंतरावर ठेवला.)
नामजपादी आध्यात्मिक उपायांच्या संबंधी आलेल्या अनुभूती
१. निसर्ग अनुकूल रहाणे
गोव्यातील हवामान खात्याने ८ आणि ९ मे २०२३ या दिवशी काही ठिकाणी गडगडाट आणि विजा यांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवून ‘यलो ॲलर्ट’ घोषित केला होता, तसेच ११ मे या दिवशी पश्चिम किनारपट्टी भागात वादळी वार्यांसह मुसळधार पावसाची शक्यताही व्यक्त केली होती. असे असूनही कार्यक्रमाच्या दिवशी, म्हणजे ११ मे या दिवशी पाऊस आला नाही आणि वातावरणही चांगले होते.
२. तिन्ही गुरूंचे स्वास्थ्य चांगले रहाण्यासाठी उपाय करूनही त्यांना थोडे शारीरिक त्रास झालेच !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ब्रह्मोत्सवाच्या दिवशी पुष्कळ थकवा होता; पण त्याही स्थितीत ते तयार झाले आणि रथात ५ घंटे सलग बसले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शरिरावर पुष्कळ सूज आली होती, तसेच त्यांचा चेहराही सुजला होता. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना शरिरात पुष्कळ उष्णता जाणवत होती. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघींचा घसा २ दिवस आधीपासून धरला होता. त्यामुळे त्यांना मधे मधे खोकला येत होता; पण प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी त्यांना एकदाही खोकला आला नाही. तिन्ही गुरूंवर मी ब्रह्मोत्सवाला आरंभ होण्याआधी नामजपादी आध्यात्मिक उपाय केले. यावरून वाईट शक्तींचे सूक्ष्मातील युद्ध किती मोठे होते, हे लक्षात येते !
३. तिन्ही गुरु रथात विराजमान झाल्यावर रथाची दृष्ट काढल्याने रथातून आनंदाचे प्रक्षेपण होण्याचे प्रमाण वाढणे
ब्रह्मोत्सवाला आरंभ होण्याआधी सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे मी तिन्ही गुरु रथात विराजमान झाल्यावर त्यांची प्रथम लिंबाने, त्यानंतर नारळाने आणि शेवटी कोहळ्याने दृष्ट काढली. त्यानंतर रथातून आनंदाचे प्रक्षेपण होण्याचे प्रमाण वाढले.
४. रथाची फेरी निर्विघ्नपणे पार पडणे
ब्रह्मोत्सवाला आरंभ झाला. रथामध्ये तिन्ही गुरु बसलेले असतांना निघालेली रथाची फेरी निर्विघ्नपणे पार पडली. तिन्ही गुरूंना बघून सर्व साधकांची भावजागृती होत होती आणि त्यांना आनंदही मिळत होता.
५. परशुरामक्षेत्री हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यासाठी प्रेरणा मिळून ते कार्य आणखी गतीने होण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी गुरुगीताच सांगितल्याचे जाणवणे
ब्रह्मोत्सवाला ठिकठिकाणाहून आलेले संत, साधक, हिंदुत्वनिष्ठ, हितचिंतक असे एकूण १० सहस्र जण उपस्थित होते. एवढ्या जणांच्या येण्याजाण्याच्या, तसेच कार्यक्रमस्थळी केलेल्या व्यवस्थेमध्ये कुठलीच अडचण आली नाही. सर्व जण दुपारी २ ते रात्री ८ वाजेपर्यंत तहानभूक विसरून आणि देहभान हरपून एकाच ठिकाणी बसले होते. सर्वांनाच ब्रह्मोत्सवातील आनंद आणि तिन्ही गुरूंना बघण्याचा आनंद घेता आला, तसेच एवढा भव्यदिव्य आणि ‘न भूतो न भविष्यति’, असा आनंदोत्सव त्यांच्या हृदयात कायमचा कोरला गेला. सर्वांच्या साधनेला गती मिळाली. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली, तसे सर्व साधकांना या परशुरामक्षेत्री हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यासाठी प्रेरणा मिळून ते कार्य आणखी गतीने होण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी गुरुगीताच सांगितल्याचे जाणवले.
अशा तर्हेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव त्यांनीच निर्विघ्नपणे पार पाडून घेतला. त्यांनी सर्वांना आनंद तर दिलाच, तसेच सर्वांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेला गतीही दिली. ही त्यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी त्यांनी दिलेली अमूल्य अशी भेट होती. यासाठी आम्ही सर्व जण त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१४.५.२०२३)