(सुदानमध्ये अडकलेल्या भारतियांच्या सुटकेसाठी राबवलेल्या अभियानाचे नाव ‘ऑपरेशन कावेरी’)
लष्करप्रमुख जनरल अब्देल-फताह बुर्हान आणि ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ (आर्.एस्.एफ्.)चे प्रमुख जनरल महंमद हमदान दागालो यांच्यातील सत्तासंघर्षामुळे खनिजसंपत्तीने समृद्ध असणारा सुदान होरपळण्यास कारणीभूत ठरत आहे. सुदानमध्ये ४ सहस्र भारतीय असून या हिंसाचारामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या नागरिकांनी भारताच्या पंतप्रधानांना आवाहन केल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन कावेरी’ नावाची मोहीम हाती घेतली; परंतु सुदानची राजधानी खार्तुम हेच या लष्कराचे केंद्र बनल्याने तेथील विमानतळावरून सुटका करणे जोखमीचे होते. त्यामुळे भारताने प्रवासी जहाज पाठवण्याचा निर्णय घेतला. सौदी अरेबियाच्या साहाय्याने ‘ऑपरेशन कावेरी’ यशस्वीपणे चालू आहे.
१. सुदानमधील संघर्षाची भयावहता
रशिया-युक्रेन युद्धसंघर्ष सवा वर्षानंतरही कायम राहिला असल्याने संपूर्ण जग चिंतेत असतांना एका नव्या संघर्षाने जागतिक समुदायाचे लक्ष वेधून घेतले आहे. हा संघर्ष आहे आफ्रिकेतील सुदान देशामधील ! सुदान हा भौगोलिकदृष्ट्या आफ्रिकेतील तिसर्या क्रमांकाचा मोठा देश असून या देशात गेल्या काही दिवसांपासून कमालीचा हिंसाचार माजला आहे. यामध्ये आतापर्यंत ४०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचाराची तीव्रता इतकी भयंकर आहे की, तिथे रस्त्यावर मृतदेहांचा खच पडलेला आहे. यामुळे संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष सुदानकडे वळले आहे. साधारण वर्षभरापूर्वी जी परिस्थिती युक्रेनमध्ये उद्भवली होती किंवा त्यापूर्वी अफगाणिस्तानात जो हिंसाचार माजला होता, तशाच पद्धतीने सुदानमध्ये रक्तरंजित हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. या हिंसाचाराचे स्वरूप समजून घेण्यापूर्वी सुदानविषयी जाणून घ्यायला हवे.
२. सुदानचा इतिहास आणि सद्यःस्थिती
दोन दशकांपूर्वी सुदान देशाची २ देशांमध्ये विभागणी झाली. एकाला ‘दक्षिण सुदान’ आणि दुसर्या देशाला ‘उर्वरित सुदान’ म्हणतात. ही विभागणी झाली नसती, तर हा देश आफ्रिकेतील सर्वांत मोठा देश राहिला असता. दक्षिण सुदान हा संयुक्त राष्ट्राचा १९३ वा सदस्य देश आहे. इस्लामी प्रजासत्ताक असणार्या या देशात बहुसंख्य ख्रिस्ती लोकांचा समावेश आहे. सुदानची लोकसंख्या अनुमाने ४ कोटींच्या आसपास असून दक्षिण सुदानची लोकसंख्या सवा कोटींच्या आसपास आहे. हा देश खनिजसंपत्तीने समृद्ध देश आहे. प्रामुख्याने इथे सोन्याच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. इतिहासकाळात अनेक पाश्चिमात्य वसाहतवादी देश सोन्याच्या शोधासाठी सुदानमध्ये आले होते. येथे तेलाच्या खाणीही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे आफ्रिकेतील एक महत्त्वाचा देश म्हणून सुदान ओळखला जातो. पूर्वी हा देश पारतंत्र्यात होता. तेथे काही काळ इंग्लंडचे साम्राज्य, तर काही काळ तेथे इजिप्तची राजवट होती. वर्ष १९५० च्या दशकामध्ये सुदानला स्वातंत्र्य मिळाले; पण स्वातंत्र्य मिळूनही तेथे शांतता टिकलीच नाही.
वर्ष १९५० च्या दशकात कमालीचा हिंसाचार झाला. याचे कारण तेथे आफ्रिकी आदिवासींच्या काही छोट्या टोळ्या होत्या. त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर इतका रक्तपात आणि संघर्ष चालू असायचा की, तो महिनोन्महिने थांबत नसे. या संघर्षामध्ये लक्षावधी लोक मरण पावलेले आहेत. त्यामुळे तेथे लोकशाही खर्या अर्थाने नांदलीच नाही. ज्या ज्या वेळी तेथे लोकशाहीचे प्रयोग झाले, त्या वेळी लष्कर प्रभावी होतांना दिसून आले. सुदानमध्ये अंतर्गत वाद आहेतच, तसेच शेजारील देशांशीही त्यांचे अनेक वाद आहेत. त्यामुळे या देशाकडे सैन्य मोठ्या संख्येने आहे. भारताची लोकसंख्या १४२ कोटी असून आपल्याकडे १० लाखांचे सैन्य आहे; पण सुदानची लोकसंख्या ४ कोटी असून त्यांच्याकडे ४ लाख ५० सहस्र सैन्य आहे; कारण या देशाला सातत्याने अंतर्गत आणि बाह्य अस्थिरता अन् हिंसाचार यांचा सामना करावा लागला आहे. दक्षिण सुदान फुटून बाहेर पडला, तशाच प्रकारे तेथील काही प्रदेशांमध्ये यादवी युद्ध रंगलेले आहे.
३. सुदानमधील सत्तासंघर्षाचे मूळ कारण
गेल्या ३ दशकांपासून सुदानमध्ये लष्करी हुकूमशहांचे साम्राज्य आहे. या लष्करी हुकूमशहांचा लोकशाही व्यवस्थेकडे सत्ता हस्तांतरित करण्यास नकार असतो. त्यातून अनेक लष्करी बंड वा उठाव होतात आणि सत्ता आपल्या हाती घेतली जाते. सध्याच्या संघर्षाचे स्वरूप पाहिल्यास सुदानमध्ये एकीकडे लष्कर आहे, तसेच ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ (आर्.एस्.एफ्. – जलदगतीने समर्थन करणारे सैन्य) नावाचे ‘पॅरामिलिटरी’ (निमलष्करी) सैन्यही आहे. सुदान हा प्रामुख्याने अरब देश आहे. साधारणत: वर्ष २००३ मध्ये सुदानच्या पश्चिमेकडील भागात असणार्या काही मूळ आफ्रिकी वंशाच्या अल्पसंख्यांक लोकांनी सुदानपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांचे बंड किंवा उठाव मोडून काढण्यासाठी तत्कालीन लष्करी हुकूमशहाने आपल्या उपप्रमुखाला तेथे पाठवले. त्या उपप्रमुखाने हे बंड शमवण्यासाठी एक फोर्स सज्ज केली. त्यालाच ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ म्हटले जाते. या फोर्सची संख्या वाढत वाढत १ लाखांपर्यंत गेली.
आता ती इतकी मोठी झाली आहे की, ते एक नवे सत्ताकेंद्र झाले आहे. या ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’चा प्रमुख आणि सध्याचा लष्करप्रमुख यांच्यामध्ये संघर्ष चालू आहे. थोडक्यात लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात सध्या रणकंदन माजले आहे. सुदानचे लष्करप्रमुख जनरल अब्देल-फताह बुर्र्हान आणि ‘आर्.एस्.एफ्.’चे प्रमुख जनरल महंमद हमदान दागालो यांच्यातील सत्तासंघर्षामुळे सुदान आज होरपळून निघत आहे. बुर्हान यांनी ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ला मूळ सैन्यात समाविष्ट होण्याचे आवाहन केले; परंतु तसे झाल्यास दागालो यांचे अस्तित्वच रहाणार नाही. त्यामुळे या दोघांत संघर्ष पेटला आहे. हा संघर्ष सुदानची राजधानी खार्तुम येथे चालू आहे. राजधानीतील या संघर्षात प्रचंड हिंसाचारामुळे तेथील परकीय देशांच्या दूतावासांना धोका निर्माण झाला आहे. परिणामी १५ एप्रिलनंतर अनेक देशांनी तेथील स्वतःचे दूतावास लगेचच बंद करण्यास प्रारंभ केला. सर्वांत प्रथम अमेरिकेने आणि त्यानंतर सौदी अरेबियाने आपल्या दूतावासातील अधिकारी तेथून काढून घेतले. त्यामुळे भारतातसुद्धा ही मागणी मोठ्या प्रमाणावर करण्यात येऊ लागली.
४. भारतियांच्या सुटकेसाठी ‘ऑपरेशन कावेरी’ मोहीम
सुदानमध्ये साधारणत: २ सहस्र ८०० भारतीय वास्तव्यास आहेत. तसेच मूळ भारतीय वंशाचे १ सहस्र २०० लोक तेथे अनेक वर्षांपासून रहात आहेत. या संघर्षामुळे ४ सहस्र भारतियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे ‘आमची सुटका करण्यात यावी’, असे आवाहन या नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. त्यानंतर भारताने यासाठी ‘ऑपरेशन कावेरी’ नावाची मोहीम हाती घेतली आणि ती अत्यंत यशस्वीपणे काम करत आहे. भारत दोन्ही प्रकारे प्रयत्न करत आहे. एकीकडे आपल्या प्रचंड क्षमता असणार्या महाकाय ‘सी-१४’ विमानांचा यासाठी वापर करत आहे; परंतु खार्तुम हे राजधानीचे शहर सध्या ‘संघर्षाचे केंद्र’ झाले आहे. अफगाणिस्तानातही अशाच प्रकारे काबूल हे राजधानीचे शहर ‘संघर्षाचे केंद्र’ बनले होते. अशा स्थितीत आपल्या नागरिकांची सुटका करणे अधिक आव्हानात्मक आणि कठीण होते. त्यामुळे भारताने तांबड्या समुद्रामध्ये असणार्या खार्तुमच्या बंदरामध्ये प्रवासी जहाज पाठवले आणि प्रथम ५०० जणांना सुरक्षितपणे सोडवून आणले आहे. ‘ऑपरेशन कावेरी’च्या अंतर्गत आतापर्यंत जवळपास ३ सहस्र ५०० जणांची सुटका करण्यात आली आहे.
५. भारताच्या विविध मोहिमांना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसांची नावे
भारताने अलीकडील काळात केलेल्या मोहिमेचे वेगळेपण म्हणजे आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसांच्या नावाने ती राबवली गेली. उदाहरणच द्यायचे झाल्यास मागील वर्षी युक्रेनमध्ये भारताने ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम राबवली होती. या मोहिमेच्या अंतर्गत भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतियांना मायदेशी सुखरूप आणले होते. त्यापूर्वी अफगाणिस्तानात राबवलेल्या जोखमीच्या मोहिमेला ‘ऑपरेशन दैवीशक्ती’ असे नाव दिले होते. तुर्कस्तानमध्ये राबवलेल्या ऑपरेशनला ‘ऑपरेशन दोस्त’ असे नाव दिले गेले. या नावांमधून भारताने स्वतःची परंपरा, आणि कटीबद्धता जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. ‘ऑपरेशन कावेरी’ याला एक वेगळे महत्त्व आहे. ‘कावेरी’ या नदीला धार्मिक महत्त्व आहे. कावेरी नदीचा विचार करता ‘ती कर्नाटक-तमिळनाडूमधून वहात बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तशाच पद्धतीने या भारतियांना आपल्या मायदेशी आणून आपल्यामध्ये मिसळून घेतले जाईल’, असाही एक संदेश यातून दिला आहे.
६. सौदी अरेबियाच्या साहाय्याने भारत राबवत असलेली मोहीम
या संपूर्ण मोहिमेवर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष असून परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकरही यामध्ये प्रमुख भूमिका बजावत आहेत. परराष्ट्र राज्यमंत्री एस्. मुरलीधरन् हे सौदी अरेबियामध्ये आहेत; कारण सुदान हा अरब देश असल्याने तेथे सौदी अरेबियाचा पुष्कळ मोठा प्रभाव आहे. त्यामुळे सौदीच्या साहाय्याने भारत आपल्या नागरिकांची सुटका करत आहे. सौदीने आपले विमानतळ खुले केल्यामुळे सुदानमध्ये अडकलेल्या भारतियांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. भारताची ही मोहीम अत्यंत यशस्वीपणे चालू आहे. वर्ष २०१५ मध्ये युद्धकाळातही सौदी अरेबियाने भारताला अशाच प्रकारे साहाय्य केले होते. त्या वेळी सौदी आणि येमेन यांच्यातील युद्धामुळे अडकलेल्या ४ सहस्र ५०० भारतियांसह ४१ देशांच्या नागरिकांना भारताने सुरक्षितरित्या परत आणले होते.
७. संयुक्त राष्ट्रांचा पुढाकार आवश्यक !
मुळात सुदान हा देश नैसर्गिक खनिजसंपत्तीने समृद्ध असूनही या देशाला हिंसाचाराचा शाप लागला आहे. प्रत्येक वेळी त्याचे केवळ स्वरूप पालटत जाते आणि त्यामध्ये निष्पाप नागरिकांचा नाहक मृत्यू होतो. आताचा संघर्ष थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
८. ‘आपत्ती काळातील संकटमोचक’ : भारताची नवी ओळख !
अलीकडच्या काळात ‘आपत्ती काळातील संकटमोचक’, अशी भारताची जागतिक प्रतिमा सिद्ध झाली आहे. ‘संकटात सापडलेल्यांना सोडवणारा देश’ म्हणून भारताने मिळवलेले प्राविण्य उल्लेखनीय आहे. या बचावकार्यासाठी नौदल, हवाई दल, भूदल, वैद्यकीय व्यवस्था, दूतावास, राजदूत आणि परराष्ट्र मंत्रालय या सर्वांमधील समन्वयातून भारताने हे प्राविण्य विकसित केलेले आहे. यापूर्वी भारत हा संयुक्त राष्ट्रांच्या ‘शांती मोहिमे’मध्ये सहभागी होत होता. भारताच्या लष्कराने इतर देशांमध्ये अनेकदा महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे; परंतु गेल्या २ दशकांमध्ये असे प्रसंग उद्भवल्यावर भारतासमोर इतर देशांमध्ये अडकलेल्या भारतियांची सुटका करण्याचे आव्हान उभे ठाकले. आज जवळपास पावणेतीन कोटी भारतीय १३३ देशांमध्ये रहात आहेत. याच लोकांकडून भारताला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळत आहे. त्यांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. जेव्हा नैसर्गिक आपत्ती किंवा अंतर्गत यादवी, बंडाळी, युद्ध संघर्ष उद्भवतो, तेव्हा भारतियांची सुरक्षा हा कळीचा विषय ठरतो. अशा वेळी केंद्र सरकारची संपूर्ण यंत्रणा कामाला लागतांना दिसते. अशा मोहिमांसाठी मंत्रीस्तरावरील अधिकारी नेमला जातो. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली बैठका होतात. परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री आदींना विशेष उत्तरदायित्व दिले जाते. त्यातून अत्यंत सुरेख आणि अचूक समन्वयातून या मोहिमा यशस्वी केल्या जातात. ‘कावेरी’ हे त्याचेच उदाहरण आहे.
वर्ष १९९४ मध्ये सोमालियात ‘हुतू’ आणि ‘तुत्सी’ या दोन जमातींमधील यादवी संघर्ष पुढे आला होता. त्या वेळी सोमालियामधून भारतियांची सुटका करण्यातून या मोहिमांचा प्रारंभ झाला. त्यानंतर भारताने एका मागून एक अशी अनेक ‘ऑपरेशन्स’ (मोहिमा) राबवली. विशेष म्हणजे यामधून ‘भारत केवळ आपल्या नागरिकांची सुटका करत नाही, तर अन्य देशांच्या नागरिकांचीही सुटका करतो’, हे युक्रेन युद्धाच्या वेळी दिसून आले. कोरोना महामारीच्या काळातही सहस्रो भारतियांना परदेशातून मायदेशी आणतांना भारताने अन्य देशांतील नागरिकांनाही त्यांच्या त्यांच्या देशांमध्ये पोचवले. त्यामुळे पूर्वीच्या काळी ‘शांती सैनिक’ म्हटले की, भारताचे नाव पुढे यायचे, तशाच पद्धतीने आपत्ती किंवा संघर्ष यांच्या काळात अडकून पडलेल्या ‘नागरिकांच्या बचावासाठीचा पर्याय’ म्हणून भारताचे नाव घेतले जाते. मोठे देश किंवा पाश्चिमात्य देश हे केवळ त्या क्षेत्रातील नागरिकांचाच विचार करतात; पण भारत तसे करत नाही. याचसमवेत भारत हा अधिकारी आणि सामान्य नागरिक असाही भेद करत नाही, हे सुदानमध्ये स्पष्टपणे दिसून आले. जगभरात आज ‘ऑपरेशन कावेरी’ची चर्चा होत असून ही भारताची एक नवी ओळख आहे’, हे लक्षात घेतले पाहिजे.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक
(साभार : साप्ताहिक ‘विवेक’, ५.५.२०२३ आणि ‘फेसबुक’)
संपादकीय भूमिकास्वतःच्या नागरिकांसह अन्य देशातील नागरिकांनाही त्यांच्या देशांमध्ये सुखरूप पोचवणारा भारत हा ‘संकटमोचक’ ! |