नामांच्या लिंगांमध्ये पालट केल्यास नामांच्या रूपांत होणारे पालट

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

‘संस्कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या संस्कृतोद्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असण्ो अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत.

७ एप्रिल या दिवशीच्या लेखात आपण ‘नामांच्या लिंगांमध्ये पालट केल्यास नामांच्या रूपांत कोणते पालट होतात ?’, या संदर्भातील काही सूत्रे जाणून घेतली. आजच्या लेखात नामांच्या लिंगांविषयी काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पाहू.

(लेखांक १८ – भाग ४)

मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/670730.html

नामांच्या लिंगांविषयी काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. मराठीतील काही नामे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी या दोन्ही लिंगांमध्ये असणे

साधारण शंभर वर्षांपूर्वी मराठीतील ‘अधिकारी’ हे नाम पुल्लिंगी होते; परंतु गेल्या काही दशकांमध्ये स्त्रियाही विविध आस्थापनांत ‘अधिकारी’ म्हणून कार्य करू लागल्या आहेत. त्या स्त्रिया आहेत, म्हणून त्यांच्या ‘अधिकारी’ या पदाचे ‘अधिकारीण’ असे किंवा अन्य वेगळे रूप सिद्ध झालेले नाही. ते ‘अधिकारी’ असेच राहिले आहे. ‘तो अधिकारी आहे’ आणि ‘ती अधिकारी आहे’, अशा वाक्यरचना केल्या जातात. अशा प्रकारे ‘अधिकारी’ हा शब्द पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी अशा दोन्ही लिंगांमध्ये वापरला जातो. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

२. मराठीत रुळलेल्या इंग्रजी शब्दांचे लिंग मराठीतील त्यांच्या प्रतिशब्दाच्या लिंगावरून ठरत असणे

‘बोर्ड (board)’ हा मराठीत पुष्कळ रुळलेला इंग्रजी शब्द आहे. ‘बोर्ड’ला मराठीत ‘फळा’ असे म्हणतात. ‘फळा’ हा पुल्लिंगी शब्द असल्यामुळे ‘बोर्ड’चा उल्लेखही मराठीत पुल्लिंगीच केला जातो. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

२ अ. वरील सूत्र क्र. ‘२’मधील नियमाला अपवाद असणारे काही इंग्रजी शब्द : ‘बटण (button)’ हा इंग्रजी शब्द आहे. ‘जे दाबल्यावर एखादे यंत्र कार्यरत होते, त्याला ‘बटण’ असे म्हणतात.’ या शब्दाला मराठीत ‘कळ’ हा पर्यायी शब्द आहे. मराठी भाषेत ‘बटण’ हा शब्द नपुंसकलिंगी, तर ‘कळ’ हा शब्द स्त्रीलिंगी वापरला जातो. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

३. जोडशब्दाचे लिंग त्या शब्दातील शेवटच्या शब्दाच्या लिंगावरून ठरणे

‘अंकगणित’ या जोडशब्दामध्ये ‘अंक’ आणि ‘गणित’ असे दोन शब्द समाविष्ट आहेत. त्यांतील ‘अंक’ हा पहिला शब्द पुल्लिंगी, तर ‘गणित’ हा शेवटचा शब्द नपुंसकलिंगी आहे. त्यामुळे ‘अंकगणित’ हा जोडशब्द नपुंसकलिंगी मानला जातो. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

४. काही पशूपक्ष्यांमध्ये नर आणि मादी असे दोन्ही असूनही त्या पशूपक्ष्यांचा उल्लेख पुल्लिंगी, स्त्रीलिंगी किंवा नपुंसकलिंगी यांपैकी कोणत्याही एकाच लिंगात केला जाणे

‘कबुतर’ या पक्ष्याच्या जातीत नर आणि मादी असे दोघेही असतात; मात्र भाषेत कबुतराचा उल्लेख नेहमी ‘ते कबुतर’ असा नपुंसकलिंगीच केला जातो. अगदीच दुर्मिळ प्रसंगांमध्ये प्रसंगांच्या आवश्यकतेनुसार ‘ते कबुतर नर आहे कि मादी आहे ?’, याचा उल्लेख करतात. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

४ अ. नेहमी पुल्लिंगीच उल्लेख असणारी नामे : साप, ससा, बगळा, भुंगा, भरद्वाज (एक पक्षी) इत्यादी.

४ आ. नेहमी स्त्रीलिंगीच उल्लेख असणारी नामे : मुंगी, गोगलगाय, खार, मगर, मधमाशी इत्यादी.

४ इ. नेहमी नपुंसकलिंगीच उल्लेख असणारे शब्द : झुरळ, अस्वल, बदक, फुलपाखरू, गिधाड इत्यादी.

(समाप्त)

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.४.२०२३)