लढाऊ वृत्ती आणि प्रखर राष्ट्रनिष्ठा असलेले भारतीय सैनिक !

आज, १५ जानेवारी २०२३ या दिवशी ‘स्थलसेना दिन’ आहे. त्या निमित्ताने…

हिंदुस्थानात वर्ष १६०० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. या ईस्ट इंडिया कंपनीने वर्ष १७७६ मध्ये सैन्यदलाची स्थापना कोलकातामध्ये केली. या सैन्यदलावर स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांचे वर्चस्व होते. इंग्रजांनी आपल्या देशावर सुमारे १५० वर्षे राज्य केले. आपण ब्रिटिशांच्या विरुद्ध विविध मार्गाने लढून आपला देश १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी पारतंत्र्यातून मुक्त केला आणि आपण स्वतंत्र झालो. तरीही आपण स्वतंत्र झाल्यानंतर अनुमाने २ वर्षे या सैन्यदलाचे प्रमुख पद इंग्रज अधिकारीच भूषवत होते. ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केलेल्या या सैन्यदलाचा अखेरचा कमांडर जनरल फ्रान्सिस बुचर होता. त्याने १५ जानेवारी १९४९ या दिवशी या सैन्यदलाची सर्व सूत्रे हिंदुस्थानचे लेफ्टनंट जनरल करिअप्पा यांच्याकडे सुपूर्द केली. स्वतंत्र हिंदुस्थानच्या सैन्यदलाचे पहिले कमांडर म्हणून करिअप्पा यांची नोंद इतिहासात करण्यात आली. हाच दिवस आपण ‘सैन्यदिन’ म्हणून साजरा करतो.

श्री. दुर्गेश परुळकर

१. भारतीय सैन्य दल आणि सर्वांत जुने निमलष्करी दल ‘आसाम रायफल्स’ यांच्याविषयीची माहिती

करिआप्पा यांनी भारतीय सैन्य दलाच्या प्रमुख पदाची सूत्रे हाती घेतली, त्या वेळी आपल्या सैन्यदलात २ लाख सैनिक होते. आता त्यांची संख्या १४ लाखांपेक्षा अधिक आहे. अमेरिका आणि चीन यानंतर जगातील ‘सर्वांत मोठे सैन्य’ असलेला देश म्हणून आपल्या देशाचा क्रमांक लागतो. हिंदुस्थानातील सैन्यदलाची ‘आसाम रायफल्स’ ही सर्वांत जुनी ‘पॅरामिलिटरी फोर्स’ (निमलष्करी दल) आहे.  वर्ष १८३५ मध्ये ‘कछार लेव्ही’ या नावाने ही स्थापन करण्यात आली. प्रारंभी या दलाचे काम स्थानिक लोकांपासून ब्रिटीश वस्त्यांचे संरक्षण करणे आणि चहाच्या बागांचे संरक्षण करणे, हे होते. आपल्या देशातील सर्वांत जुने असलेले हे पोलीसदल आहे. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी जे गार्डस (सुरक्षारक्षक) लागतात, ते याच रेजिमेंट आर्मीचे आहेत. ही रेजिमेंट राष्ट्रपती भवनात असते.

ईशान्येचा पहारेकरी आणि पर्वतीय क्षेत्रातील लोकांचा मित्र

वर्ष १९७१ मध्ये याचे नाव पालटून ‘आसाम रायफल्स’ ठेवण्यात आले. याचे मुख्य कार्यालय शिलाँग येथे आहे. देशाच्या ईशान्य भागातील आंतरिक सुरक्षा आणि हिंदुस्थान-म्यानमार सीमा सुरक्षा यांचे दायित्व आसाम रायफल्सवर आहे. हिंदुस्थानच्या ईशान्य भागातील लोकांना राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणण्याचे महत्त्वपूर्ण काम आसाम रायफल्सने केले आहे. या आसाम रायफल्सला ईशान्येचा पहारेकरी आणि पर्वतीय क्षेत्रातील लोकांचा मित्र म्हणून गौरवले जाते. या दलाचे नियंत्रण गृहमंत्रालय आणि रक्षा मंत्रालय यांच्या वतीने संयुक्तपणे केले जाते.

२. सियाचीनसारख्या प्रतिकूल वातावरणातही देश आणि देशाचे नागरिक यांचे रक्षण भारतीय सैन्य दल !

सियाचीन ही जगातील सर्वांत उंचीवर असलेली रणभूमी होय. हवामान आणि भौगोलिक परिस्थिती यांमुळे तेथील वातावरण मानवासाठी शारीरिकदृष्ट्या अत्यंत प्रतिकूल आहे. म्हणूनच सियाचिन ही ‘अत्यंत धोकादायक रणभूमी’ म्हणून ओळखली जाते. आपल्या देशाच्या नकाशावर पाकव्याप्त कश्मीर आणि अक्साई चीन हे दोन ठळक डाग आहेत. पाकिस्तान आणि चीन यांनी बळकावलेला भूभाग या दोन भूभागांमध्ये सियाचीन ही रणभूमी वसलेली आहे. म्हणूनच हे रणक्षेत्र आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

‘सियाचीन’ – जगातील सर्वांत उंचीवर असलेली रणभूमी

गेल्या अनेक दशकांपासून भारतीय सैन्य दल या भूमीचे रक्षण करत आहे. सियाचीन ही रणभूमी समुद्रसपाटीपासून २० सहस्र फूट उंचीवर आहे. सुमारे १० सहस्र सैनिक या भूमीचे रक्षण करण्यासाठी सज्ज आहेत. येथील तापमान शून्यापेक्षा खाली उणे ६० अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाऊ शकते. या क्षेत्रात प्राणवायूचे प्रमाण केवळ १० टक्के आहे.  त्यात तिथे हाडे गोठून टाकणारा गारठा असतो. अशा प्रतिकूल असलेल्या वातावरणात स्वतःला शारीरिकदृष्ट्या सबल ठेवून आणि शत्रूशी लढून ही भूमी सुरक्षित ठेवण्याचे काम भारतीय सैनिक करत आहेत. म्हणूनच आपल्या या वीर सैनिकांचे कौतुक कितीही केले तरी कमीच आहे. या भूमीवर बर्फाची वादळे निर्माण होतात. या वादळाचा वेग ताशी १०० किलोमीटर असतो. इथे होणारी बर्फवृष्टी सुद्धा ३ फूट उंचीच्या स्तराची असते. अशा प्रतिकूल वायूमानाच्या परिस्थितीत कोणताही धातू शरिराजवळ आला, तर केवळ १५ सेकंदात तो शरिराला चिकटतो. असा शरिराला चिकटलेला धातू शरिरापासून वेगळा काढण्याचा प्रयत्न केला, तर संपूर्ण त्वचा तो ओरबाडून काढतो. अशा ठिकाणी आपले सैनिक आपल्या मायभूमीचे आणि भारतियांचे रक्षण करण्यासाठी हेतूत: स्वतःचा जीव धोक्यात घालतात.
या क्षेत्रातील आपल्या सैनिकांना प्रथम वायूमानाशी सामना करावा लागतो. त्यानंतर पाकिस्तान आणि चीन या देशांचे सैनिक आपले शत्रू आहेत. अशा ठिकाणी रहाणार्‍या सैनिकांची मुख्य तक्रार असते, ती म्हणजे त्यांना झोप येत नाही आणि त्यांचे वजन अचानक न्यून होते. अशा वातावरणात त्यांच्या मेंदूवर भयंकर परिणाम होऊ शकतो आणि त्यांचा स्मृतिभ्रंश होण्याची शक्यताही असते. तरीही सर्व प्रकारचे धोके पत्करून भारतीय सैनिक तिथे लढत असतात. त्यांची ही लढाऊ वृत्ती आणि राष्ट्रनिष्ठा यांना या सैन्यदिनाच्या निमित्ताने सन्मानपूर्वक नमस्कार !

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (११.३.२०२३)