अफगाणिस्तानमध्ये आक्रमण कराल, तर वर्ष १९७१ च्या युद्धाप्रमाणे स्थिती करू !  

तालिबानची पाकिस्तानला समजेल अशा भाषेत चेतावणी !

काबुल (अफगाणिस्तान) – पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या आतंकवादी संघटनेने पाकमध्ये समांतर सरकार स्थापन केल्यानंतर पाकचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी तालिबानला उद्देशून, ‘जर तालिबानने या संघटनेला आमच्या देशात आक्रमणे करण्यापासून थांबवले नाही, तर आम्ही अफगाणिस्तानमध्ये घुसून या संघटनेच्या तळांवर आक्रमण करू’, अशी धमकी दिली होती.

(तालिबान सरकारचा उपपंतप्रधान अहमद यासिर याने केलेले हेच ते ट्विट )

यावर आता तालिबान सरकारचा उपपंतप्रधान अहमद यासिर याने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून पाकिस्तानी सैन्याचा पराभव आणि सैन्याचे भारताच्या सैन्यापुढे पत्करलेल्या शरणागतीचे छायाचित्र प्रसारित करत म्हटले, ‘अशा प्रकारचा परिणाम लक्षात ठेवा.’ हे छायाचित्र वर्ष १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाचा आहे. यात पाकिस्तानी सैन्याचा दारूण पराभव झाला. त्यांच्या ९० सहस्र सैनिकांनी शरणागती पत्करली होती. या छायाचित्रामध्ये शरणागतीच्या कागदपत्रावर पाकिस्तानच्या वतीने लेफ्टनंट जनरल आमिर अब्दुल्ला खान नियाझी यांनी स्वाक्षरी केली होती. भारतीय सैन्याचे  लेफ्टनंट जनरल जगजितसिंह अरोरा त्यांच्या शेजारीच उपस्थित होते. या शरणागतीनंतर बांगलादेश वेगळा देश झाला आणि पाकिस्तानचे २ तुकडे झाले.

१. उपपंतप्रधान यासिर याने पुढे लिहिले आहे, ‘राणा सनाउल्लाह, हे अफगाणिस्तान आहे हे विसरू नका. हा तो अफगाणिस्तान आहे जिथे महान शक्तींच्या कबरी बांधल्या गेल्या आहेत. आमच्यावर सैनिकी आक्रमण करण्याची स्वप्ने पाहू नका, अन्यथा भारताशी युद्ध केल्यानंतर जो तुमचा परिणाम झाला, त्यापेक्षा हा परिणाम लाजिरवाणा असेल.

२. या विधानानंतर काही घंट्यांनी अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानेही स्वतंत्र निवेदन जारी केले. ते म्हणाले की, पाकिस्तान बिनबुडाचे आरोप करत आहे. आम्ही टीटीपीला आश्रय दिलेला नाही. ‘अफगाणिस्तान दुर्बल आहे’ किंवा ‘त्याला कुणीही मालक नाही’ अशा भ्रमात राहू नये. ‘आपल्या देशाचे रक्षण कसे करायचे ?’, हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे. आक्रमण झाले, तर चोख प्रत्युत्तर देऊ.