उज्जैन (मध्यप्रदेश) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे पाणीटंचाईविषयी चिंता व्यक्त केली. मांस बनवण्याच्या प्रक्रियेत भरपूर पाणी लागते. मांसाहार न केल्यास पशूवधगृहे आपोआप बंद होतील, असे ते म्हणाले. ते उज्जैन येथे २७ ते २९ डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजित केलेल्या ‘सुजलाम् आंतरराष्ट्रीय जल महोत्सव परिषदे’त बोलत होते.
‘सुमंगलम् पंचमहाभूत अभियाना’च्या अंतर्गत पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी उज्जैन येथे पोचल्यावर प्रथम श्री महाकालाची पूजा केली. सरसंघचालकांनी येथील प्रांगणात देशातील पहिल्या १३ फूट उंच जलस्तंभाचे अनावरण केले.
१. परिषदेच्या सारस्वत सत्रात श्री. मोहन भागवत म्हणाले की, प्राणी हत्येमुळे पाण्याचा खर्च वाढतो. अन्नाचे सूत्र कुणावरही लादता येणार नाही. काही लोक संयत राहूनच मांसाहार करतात. श्रावण मासात आणि गुरुवारी बरेच लोक मांसाहार करत नाहीत. शाकाहारी असणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आहे.
हल्लीच्या काळात संघाविषयी चांगल्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत !
या कार्यक्रमात प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना सत्कार पत्र देण्यात आले. या अभिनंदन करणार्या पत्रामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची प्रशंसा करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या सूत्रधारानेही भागवत यांची महर्षि दधीचि यांच्याशी तुलना केली. ‘माझी महर्षि दधीचि यांच्याशी तुलना करणे चुकीचे आहे. हल्लीच्या काळात संघाविषयी चांगल्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. संघाविषयी चांगल्या गोष्टी ऐकण्याची आम्हाला सवय नाही’, असेही ते म्हणाले.