भाषेतील काही शब्द लिहिण्याची पद्धत आणि त्यामागील कारणे

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

‘संस्कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या संस्कृतोद्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

मागील लेखात आपण ‘भाषेचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून अभ्यास’ आणि ‘काही विशिष्ट शब्द लिहिण्याची पद्धत’ यांविषयी माहिती पाहिली. आजच्या लेखात आणखी काही शब्द पाहू.

(लेखांक १६ – भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/628754.html

(टीप : या विषयातील ‘२ अ’ ते ‘२ इ’ ही सूत्रे शुक्रवार, १८.११.२०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत.)

२ ई. ‘सोयरसुतक’ नव्हे, तर ‘सुवेरसुतक’ असे लिहिणे : हे सूत्र समजून घेण्यासाठी प्रथम आपण या दोन शब्दांचे अर्थ पाहू. ‘सोयरसुतक’ या शब्दामध्ये ‘सोयर’ आणि ‘सुतक’ हे दोन शब्द समाविष्ट आहेत. यांपैकी ‘सोयर’ या शब्दाला कोणताही अर्थ नाही. ‘सुतक’, म्हणजे ‘एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांनी तेरा दिवस काही विशिष्ट नियम पाळायचे असतात. या तेरा दिवसांच्या कालावधीला ‘सुतक’ असे म्हणतात. ‘सुवेरसुतक’ या शब्दामध्ये ‘सुवेर’ आणि ‘सुतक’ असे दोन शब्द समाविष्ट आहेत. त्यांपैकी ‘सुवेर’ म्हणजे, ‘एखाद्या घरात मूल जन्माला आल्यास त्या घरातील व्यक्तींनी बारा दिवस काही विशिष्ट नियम पाळायचे असतात. या बारा दिवसांच्या कालावधीला ‘सुवेर’ असे म्हणतात.’

समाजात काही व्यक्ती अशा असतात ज्यांना जगात किंवा विशिष्ट लोकांच्या संदर्भात काहीही घडले, तरी त्याचे काहीच वाटत नाही. अशा व्यक्तींविषयी बोलतांना ‘त्यांना कशाचे काहीच सुवेरसुतक (सुख-दुःख) नाही’, असे म्हटले जाते. अशा वाक्यांत बर्‍याचदा ‘सोयरसुतक’ हा चुकीचा शब्द वापरला जातो. त्याच्या जागी वरील परिच्छेदात दिलेले अर्थ लक्षात घेऊन ‘सुवेरसुतक’ हा योग्य शब्द वापरावा.

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

२ उ. ‘वास्तुदेवता’ या शब्दातील ‘स्तु’ र्‍हस्व, तर ‘वास्तूशास्त्र’ या शब्दातील ‘स्तू’ दीर्घ लिहिणे : ‘वास्तुदेवता’ या शब्दातील ‘वास्तु’ ही देवता आहे. ‘देवतांच्या नावांतील चैतन्य लिहिणार्‍यास आणि वाचणार्‍यास मिळावे, यासाठी ती नावे मूळ संस्कृतनुसार लिहावीत’, असे सनातनचे धोरण आहे. त्यामुळे ‘वास्तुदेवता’ या शब्दातील ‘स्तु’ मूळ संस्कृतप्रमाणे र्‍हस्व लिहावा. ‘वास्तूशास्त्र’ या शब्दाचा अर्थ ‘वास्तूविषयी, म्हणजे एखाद्या घराविषयी किंवा इमारतीविषयी बोध देणारे शास्त्र’, असा आहे. येथे ‘वास्तू’ हा शब्द देवता या अर्थाने नव्हे, तर ‘घर किंवा इमारत’ या अर्थाने वापरण्यात आला आहे. त्यामुळे या शब्दातील ‘स्तू’ दीर्घ लिहावा.

२ ऊ. लेखन करणार्‍या व्यक्तीने लेखनाच्या शेवटी स्वतःचे नाव लिहितांना नावापूर्वी ‘श्री.’ लिहिणे : सध्या समाजात प्रचलित असलेल्या नियमानुसार एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःचे स्वतंत्र लेखन करते, तेव्हा त्या लिखाणाच्या शेवटी स्वतःचे नाव लिहितांना ती नावापूर्वी ‘श्री.’ ही उपाधी लिहीत नाही. ही प्रथा इंग्रजीतून मराठी भाषेत आली आहे. आपल्या संस्कृतीमध्ये मात्र ‘स्वतःला आदराने संबोधणे, म्हणजे स्वतःतील ईश्वराला आदराने संबोधणे’, ही विचारसरणी रूढ आहे. त्यामुळे आपण लिखाणाच्या शेवटी स्वतःचे नाव लिहितांना नावापूर्वी ‘श्री.’ (श्रीयुत) लिहावे.

२ ए. पती-पत्नी यांच्या नावांचा एकत्रित उल्लेख करतांना प्रथम पतीचे आणि नंतर पत्नीचे नाव लिहिणे : सध्या बरेच जण पती आणि पत्नी यांच्या नावांचा एकत्र उल्लेख करतांना प्रथम पत्नीचे अन् नंतर पतीचे नाव लिहितात, उदा. सौ. रेणू आणि श्री. अथर्व करंदीकर. ही पद्धत अयोग्य आहे. प्रथम पतीचे आणि नंतर त्याच्या पत्नीचे नाव लिहावे, उदा. श्री. अथर्व आणि सौ. रेणू करंदीकर.

२ ऐ. ‘अंधःकार’ याऐवजी ‘अंधकार’ असे लिहिणे योग्य असणे : संस्कृतमध्ये ‘अंधः’ (मूळ शब्द ‘अंधस्’) म्हणजे ‘जेवण’, तर ‘अंध’ म्हणजे ‘काळोख’. ‘अंधकार’ या शब्दाचा अर्थ ‘काळोख होणे’, असा आहे. असा अर्थ असलेला शब्द लिहितांना त्यात ‘जेवण’ या अर्थाने वापरण्यात येणारा ‘अंधः’ हा शब्द लिहिणे अयोग्य आहे. त्या जागी ‘अंधकार’ हा शब्द लिहावा.

२ ओ. ‘घनःश्याम’ याऐवजी ‘घनश्याम’ असे लिहिणे : ‘घनश्याम’ हा संस्कृत शब्द आहे. या शब्दात ‘घन’ आणि ‘श्याम’ असे दोन शब्द आहेत. संस्कृत व्याकरणानुसार ‘जेव्हा दोन शब्द जोडले जातात, तेव्हा त्यांतील पहिला शब्द त्याच्या मूळ रूपात जसाच्या तसा रहातो.’ ‘घनश्याम’ या शब्दातील पहिला शब्द ‘घन’ हा आहे आणि तेच त्याचे मूळ रूप आहे. ‘घनः’ हे त्याचे मूळ रूप नाही. त्यामुळे ‘घन’ हा शब्द ‘श्याम’ या शब्दाच्या आरंभी जोडल्यावर ‘घनश्याम’ असा शब्द सिद्ध होतो. ‘घनःश्याम’ असा होत नाही. यानुसार ‘घनःश्याम’ असे न लिहिता ‘घनश्याम’ असे लिहावे.

२ औ. ‘ऋषिकेश’ असे नव्हे, तर ‘हृषीकेश’ असे लिहिणे : बरेच जण व्यक्तीचे नाव ‘ऋषिकेश’ असे लिहितात; परंतु वास्तविक ते ‘हृषीकेश’ असे आहे. ‘हृषीकेश’ या संस्कृत शब्दातील ‘हृषीक’ म्हणजे इंद्रिये. त्यांचा ईश किंवा स्वामी तो ‘हृषीकेश’ होय. श्रीविष्णूच्या २४ नावांपैकी हे एक नाव आहे.’

(क्रमशः पुढील शुक्रवारी)

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.११.२०२२)