‘भाषेशी संबंधित अध्यात्म’ आणि भाषेतील काही शब्द लिहिण्याची पद्धत

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

‘संस्कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या संस्कृतोद्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

मागील लेखात आपण काही परकीय आणि त्यांना पर्यायी स्वकीय शब्दांची माहिती पाहिली. आजच्या लेखात ‘भाषेचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून अभ्यास’ आणि ‘काही विशिष्ट शब्द लिहिण्याची पद्धत’, यांविषयी जाणून घेऊ.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/627194.html

१. भाषेचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून अभ्यास करणे आवश्यक असणे

एक लहानसा प्रयोग करून पाहूया. पुढे दोन वाक्ये दिली आहेत. त्यांपैकी प्रथम ‘अ’ हे वाक्य चार-पाच वेळा उच्चारा. त्यानंतर ‘आ’ हे वाक्य चार-पाच वेळा उच्चारा. ‘दोन्हींपैकी कोणते वाक्य उच्चारल्यावर चांगले वाटते ?’, हे अभ्यासा आणि मग त्यापुढील लिखाण वाचा.

अ. मी हे करेन.

आ. मी हे करीन.

पहिल्या वाक्यापेक्षा दुसरे वाक्य उच्चारल्यावर अधिक चांगले वाटते. याचे कारण, ‘पहिल्या वाक्यातील ‘करेन’ या शब्दाच्या उच्चारणामध्ये अहंभाव जाणवतो. ‘करेन’च्या तुलनेत दुसर्‍या वाक्यातील ‘करीन’ या शब्दाचा उच्चार सौम्य वाटतो.’ यानुसार अहंभावाचे प्रकटीकरण टाळण्यासाठी ‘करीन’ हा सौम्य शब्द वापरावा. याचप्रमाणे ‘तो हे करेल’, असे न म्हणता ‘तो हे करील’, असे म्हणावे. याचे आणखी एक उदाहरण पुढे दिले आहे.

१ अ. ‘कोठे’ या शब्दाऐवजी ‘कुठे’ हा शब्द वापरणे अधिक योग्य असणे : मराठीमध्ये ‘कोठे’ आणि ‘कुठे’ हे दोन्ही शब्द वापरात आहेत. या शब्दांच्या संदर्भातही वरीलप्रमाणे प्रयोग करू शकतो. असा प्रयोग केल्यावर ‘कोठे’ हा शब्द उच्चारल्यानंतर अहंभाव जाणवतो, तर ‘कुठे’ या शब्दाच्या उच्चारात सौम्यता जाणवते. त्यामुळे ‘कोठे’ हा शब्द न वापरता ‘कुठे’ हा शब्द वापरणे अधिक योग्य आहे. याच धर्तीवर ‘कोठेही’, ‘कोठेतरी’, ‘कोठेच’ इत्यादी शब्दांच्या ऐवजी ‘कुठेही’, ‘कुठेतरी’, ‘कुठेच’ इत्यादी शब्द वापरावेत.

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

२. काही विशिष्ट शब्द लिहिण्याची पद्धत

२ अ. ‘तांदूळ’ या शब्दाचे सामान्यरूप ‘तांदळाचे’, ‘तांदळाला’ या प्रकारे न लिहिता ‘तांदुळाचे’, ‘तांदुळाला’ या प्रकारे लिहिणे : हे सूत्र पहाण्यापूर्वी आपण दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पूर्वी प्रसिद्ध केलेल्या ‘सामान्यरूप म्हणजे काय ?’ या सूत्राची थोडक्यात उजळणी करू. कोणत्याही शब्दास ‘स’, ‘ला’, ‘ना’, ‘ने’ इत्यादी विभक्तीचे प्रत्यय लागल्यास किंवा ‘वर’, ‘बाहेर’, ‘ही’, ‘कडे’ इत्यादी ‘शब्दयोगी अव्यये’ लागल्यास मूळ शब्दाचे जे नवे रूप सिद्ध होते, त्याला ‘सामान्यरूप’ असे म्हणतात. ‘अण्णा शहाळ्याचे पाणी पीत होते’, या वाक्यातील ‘शहाळ्याचे’ या शब्दामधील मूळ शब्द ‘शहाळे’ असा आहे. त्याला ‘चे’ हा विभक्तीचा प्रत्यय लागल्यावर त्याचे रूप ‘शहाळ्या’ असे झाले. या रूपाला ‘सामान्यरूप’ म्हणतात.

प्रचलित मराठीमध्ये ‘तांदूळ’ या शब्दाचे सामान्यरूप ‘तांदळाचे’, ‘तांदळाला’, ‘तांदळात’ असे केले जाते. यात मूळ ‘तांदूळ’ या शब्दातील ‘दू’ या अक्षराचा ‘द’ होतो; मात्र ‘तांदळा’ या नावाचा एक विशिष्ट प्रकारचा दगडही असतो. या दगडाला शेंदूर लेपून त्याची देव किंवा देवी म्हणून पूजा केली जाते. त्याला ‘देवाचा तांदळा’ किंवा ‘देवीचा तांदळा’ असे म्हणतात. त्यामुळे ‘तांदूळ’ या शब्दाचे सामान्यरूप ‘तांदळा’ असे न करता ‘तांदुळा’ असे करावे आणि त्याला विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यये लावावीत, उदा. तांदुळाचे, तांदुळाला, तांदुळात इत्यादी.

२ आ. ‘दुप्पट’, ‘तिप्पट’, ‘दोन पट’, ‘तीन पट’ इत्यादी शब्दांची सामान्यरूपे लिहिण्याची पद्धत : ही पहाण्यापूर्वी एक सूत्र लक्षात घेणे आवश्यक आहे. ते म्हणजे, ‘तीन अक्षरी शब्दांमधील मधले अक्षर ‘क’चे किंवा ‘प’चे द्वित्व (तेच अक्षर दोनदा उच्चारणे) असेल, म्हणजे ‘क्क’ किंवा ‘प्प’ असे असेल, तर सामान्यरूप होतांना ते द्वित्व नाहीसे होते, उदा. टक्कर – टकरीत.’

आता ‘दुप्पट’, ‘तिप्पट’, ‘चौपट’, ‘दोन पट’, ‘तीन पट’ इत्यादी ‘पटीं’शी संबंधित शब्दांची सामान्यरूपे कशी लिहावीत ?’, हे पाहू. ‘दुप्पट’ या शब्दाला ‘ने’ हा विभक्तीचा प्रत्यय लागल्यास ‘दुपटीने’ असा शब्द सिद्ध होतो. ‘दुपटींनी’ असा होत नाही. अशाच प्रकारे ‘तिप्पट’ या शब्दाचे ‘तिपटीने’ असे, तर ‘चौपट’ या शब्दाचे ‘चौपटीने’ असे रूप सिद्ध होते. ‘तिपटींनी’ किंवा ‘चौपटींनी’ अशी रूपे सिद्ध होत नाहीत; मात्र ‘दोन पट’, ‘तीन पट’, ‘चार पट’ असे दोन सुटे शब्द असतील आणि त्यांना विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यये लागली, तर ‘दोन पटींनी’, ‘तीन पटींनी’, ‘चार पटींनी’ अशी रूपे सिद्ध होतात. या ठिकाणी ‘दोन पटीने’, ‘तीन पटीने’, ‘चार पटीने’ अशी रूपे सिद्ध होत नाहीत.

२ इ. ‘बदाम, पिस्ते इत्यादी’ या अर्थाने वापरला जाणारा ‘सुकामेवा’ हा शब्द जोडशब्द असणे : ‘सुका खाऊ’ हे शब्द सुटे लिहिले जातात. ‘ओला खाऊ’ हे शब्दही सुटे शब्द आहेत; पण ‘सुकामेवा’ या शब्दातील ‘सुका’ आणि ‘मेवा’ हे शब्द एकत्र लिहिल्यास ‘बदाम, पिस्ते, काजू, अक्रोड इत्यादी अगदी विशिष्ट प्रकारचे पदार्थ’, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ‘सुकामेवा’ हा शब्द जोडशब्द लिहावा.’

(क्रमशः पुढील शुक्रवारी)

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.११.२०२२)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/630579.html