भारतात रहाणारी प्रत्येक व्यक्ती हिंदु आहे ! – सरसंघचालक प.पू. डॉ. मोहनजी भागवत

सरसंघचालक प.पू. डॉ. मोहनजी भागवत

सुरगुजा (छत्तीसगड) – आम्ही वर्ष १९२५ पासून सांगत आहोत की, भारतात रहाणारी प्रत्येक व्यक्ती हिंदु आहे. जे भारताला मातृभूमी मानतात आणि येथील संस्कृती आणि विविधता यांचा सन्मान करतात, तसेच कोणत्याही धर्माचे, संस्कृती, भाषेचे किंवा भोजन पद्धतीचा अवलंब करणारे, विचारसरणी असलेले लोक यांसाठी काम करतात ते सर्व हिंदु आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे संघाच्या कार्यक्रमात केले.

सरसंघचालक पुढे म्हणाले की, आज विज्ञानामध्ये डी.एन्.ए. (जनुकीय घटक (जेनेटिक मटेरियल) ज्यापासून बनतात, ते रेणू म्हणजे डी.एन्.ए.) विषयी बोलले जाते. आज आपल्याला आपण सर्वजण वेगवेगळे असल्याचे वाटू शकते; मात्र आपण सर्वजण एकच आहोत. विज्ञानानेही असे सांगितले आहे की, पश्‍चिमेला काबूलपासून ते पूर्वेला चीनविंड नदीपर्यंत, उत्तरेला तिबेट ते दक्षिणेला श्रीलंकेपर्यंत हा संपूर्ण भूभागातील लोकांचा डी.एन्.ए. ४० सहस्र वर्षांपूर्वीचा आहे. आपले पूर्वजही समान आहेत. त्या पूर्वजांनीच आपल्याला सध्याच्या सर्व प्रार्थना पद्धती, भाषा, भोजन करण्याच्या पद्धती शिकवल्या आहेत. त्यामुळे आपण आपल्या या जुन्या धाग्याशी जोडून राहिले पाहिजे.