यजमानांच्या आजारपणाच्या वेळी रुग्णालयात आलेले कटू अनुभव !

१. कर्मचार्‍यांनी शस्त्रकर्मासाठी ‘स्किन स्टेप्लर’ मागवण्यास सांगणे, त्याचा वापर न करणे आणि तो परतही न करणे

‘माझ्या यजमानांना रुग्णालयातील अतीदक्षता विभागात भरती केल्यावर प्रतिदिन औषधांचा व्यय ५ सहस्र किंवा त्यापेक्षाही अधिक असायचा. हाच व्यय अतीदक्षता विभागातून बाहेर आणल्यावर २ सहस्र झाला. अतीदक्षता विभागात मला सहजतेने प्रवेश मिळत नव्हता. ‘एवढी औषधे लागत नाहीत’, हे एका प्रसंगावरून माझ्या नंतर लक्षात आले. माझ्या यजमानांचे तिसरे शस्त्रकर्म झाले, त्या वेळी शस्त्रकर्मासाठी १२ सहस्र रुपयांची औषधे मागवली होती. त्यामध्ये ‘स्किन स्टेप्लर’ही मागवला होता. (‘स्किन स्टेप्लर’ म्हणजे त्वचेला टाके घालण्यासाठी वापरण्यात येणारे साधन) मी कुतूहल म्हणून त्याचे एक छायाचित्र काढून ठेवले होते. यजमानांच्या डोक्याला जोडलेले ‘ड्रेन’ काढले. तेव्हा माझ्या लक्षात आले की, तेथे साधेच टाके घातले असून एकही ‘स्टेप्लर’ वापरले नव्हते, तरीही तो मागवला आणि नंतर तो परतही केला नव्हता.

२. रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने देयकावर सवलत देण्यास नकार देऊन पूर्ण देयक भरण्यासाठी पुष्कळ दबाव आणणे

यजमानांना रुग्णालयातून सोडण्याच्या वेळी रुग्णालयाच्या देयकावर सवलत देण्यासाठी आधुनिक वैद्यांना पुष्कळ जणांनी भ्रमणभाष केले. एका विमा कंपनीने आम्हाला ‘रुग्णालयाकडून ४२ सहस्र रुपये सवलत मिळेल’, असे सांगितले; पण रुग्णालयाचे व्यवस्थापन आमच्यावर ‘४२ सहस्र रुपये भरायलाच हवेत’, यासाठी दबाव आणत होते.

३. देयकात सवलत देण्यास रुग्णालयाचे आधुनिक वैद्य सिद्ध नसणे, ते पुष्कळ रागावणे आणि काही न बोलता देवाला प्रार्थना करत त्यांचे सर्व ऐकून घेतल्यावर त्यांनी थोडी सवलत देणे

ते ऐकत नसल्याने मी एक पत्र लिहिले. त्यामध्ये सर्व हिशोब स्पष्ट करून ‘तुम्हाला सवलतीविषयी काही अडचण असल्यास तुम्ही विमा कंपनीच्या आस्थापनाशी बोलून घ्या’, असे स्पष्ट केले. ते पत्र वाचून आधुनिक वैद्यांनी आम्हाला बोलावले आणि ते आमच्यावर पुष्कळ रागावले. त्यांचे एक वाक्य मला फार खटकले. ते म्हणाले, ‘‘मला पैसा कमवायचा असता, तर मी रुग्णालयापेक्षा ‘बार’ उघडला असता.’’ ते बोलत असतांना आम्ही देवाला प्रार्थना करत होतो. आम्ही त्यांचे सर्व बोलणे शांतपणे ऐकून घेतले. त्याचा परिणाम असा झाला की, त्यांनी ‘बेटा’ या शब्दांनी बोलण्याचा शेवट केला आणि शेवटी २९ सहस्र रुपयांची सवलत दिली.’

– एक साधिका

वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी ‘आरोग्य साहाय्य समिती’ची मोहीम !

वैद्यकीय क्षेत्रात घुसलेल्या अनेक अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील चांगले आणि कटू अनुभव, तसेच आपल्या परिसरात काही अनुचित घटना घडत असल्यास त्याविषयी आम्हाला त्वरित कळवा.

चांगले आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना नम्र विनंती !

पैसे लुबाडणार्‍या आणि रुग्णांची फसवणूक करणार्‍या आधुनिक वैद्यांची नावे उघड करण्यासाठी कृपया साहाय्य करा. ही तुमची साधना असेल. तुमची इच्छा असल्यास तुमचे नाव गोपनीय ठेवता येईल. हिंदु राष्ट्रात केवळ सात्त्विक आधुनिक वैद्य आणि परिचारिका असतील.

आपले अनुभव कळवण्यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्ता

सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. पिन – ४०३ ४०१

संपर्क क्रमांक : ७७३८२ ३३३३३

ई-मेल पत्ता : [email protected]