देशात प्रथमच मध्यप्रदेशात हिंदीतून वैद्यकीय शिक्षण मिळणार !

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

भोपाळ (मध्यप्रदेश) – देशाच्या इतिहासात प्रथमच एम्.बी.बी.एस्.चा अभ्यास हिंदीतून शिकवला जाणार आहे. मध्यप्रदेश राज्यात याचा प्रारंभ करण्यात आला. यासाठी हिंदीतील पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. या संदर्भातील ३ पुस्तकांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

इटली, चीन त्यांच्या भाषेत अभ्यास करू शकतात, तर भारत का करू शकत नाही ? – मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

या वेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. गरीब कुटुंबातील मुले, हिंदी माध्यमात शिकून वैद्यकीय महाविद्यालयात पोचतात; पण इंग्रजीच्या जाळ्यात अडकतात. अनेकांनी वैद्यकीय शिक्षण सोडले किंवा आत्महत्येपर्यंत पोचले. अशा मुलांसाठी हिंदीतून अभ्यास करणे उपयुक्त ठरेल. हे काम स्वातंत्र्यानंतरच व्हायला हवे होते; पण ते आता होत आहे. इंग्रज निघून गेले; मात्र आपण इंग्रजांचे गुलाम झालो. ‘इंग्रजी बोलल्याने छाप पडते’, असे अनेकांना वाटते. इटली, चीन त्यांच्या भाषेत अभ्यास करू शकतात, तर भारत का करू शकत नाही ? यंदा ६ अभियांत्रिकी आणि ६ पॉलिटेक्निकल महाविद्यालयांमध्ये हिंदी शिकवली जाणार आहे. नंतर ‘आयआयटी’मध्येही हिंदी शिकवली जाईल. ‘आय.आय.एम्.’चा अभ्यासही हिंदीतून केला जाईल.

संपादकीय भूमिका

जे स्वातंत्र्यानंतर व्हायला हवे होते, ते आता कुठेतरी चालू होत आहे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !