‘वन्दे मातरम्’ महामंत्राचा अबू आझमी यांच्याकडून अवमान ! – शिवराय कुलकर्णी, भाजप

अमरावती – ‘वन्दे मातरम्’ हा मंत्र म्हणत म्हणत देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीकारकांनी बलीदान दिले. अनेक महिलांना वैधव्य प्राप्त झाले. अनेक भगिनींचे भाऊ आणि मातांचे पुत्र गेले. आपल्या एक नाही, तर अनेक पुत्रांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत बलीदान दिले, त्यांच्या ‘वन्दे मातरम्’ या महामंत्राचा आज समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी अवमान केलेला आहे. अबू आझमी हे मोहम्मद अली जिना यांची भाषा बोलत असून त्यांना देशाचे विभाजन करायचे आहे, असा आरोप येथील भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केला आहे. शासकीय कार्यालयातून भ्रमणभाषवर ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याचे आदेश देण्यात आल्यावर अबू आझमी यांनी त्याला विरोध केला होता. आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध केला जात आहे.

त्या वेळी अबू आझमी म्हणाले होते की, मी ‘सारे जहां से अच्छा हिन्दोस्तां हमारा’ नक्कीच म्हणेन; पण ‘वन्दे मातरम्’ कधीच म्हणणार नाही. आम्ही फक्त अल्लाची उपासना करतो आणि त्याचीच उपासना करू. बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडून प्रत्येक वेळी ‘जय महाराष्ट्र’ शब्द ऐकले आहेत. महाराष्ट्र सरकारनेही तसा आदेश काढला होता. आता शिंदे सरकार ‘जय महाराष्ट्र’ऐवजी ‘वन्दे मातरम्’ का म्हणायला का लावत आहे ? एकनाथ शिंदे आता भाजप आणि संघ यांची भाषा बोलू लागले आहेत कि त्यांच्या दबावाखाली काम करत आहेत ?

संपादकीय भूमिका

‘वन्दे मातरम्’ला विरोध करणार्‍या मुसलमान नेत्यांच्या निष्ठा या देशाशी नाहीत, असेच कुणाला वाटले, तर चूक ते काय ?