कोल्हापूर येथे आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने ‘सी.पी.आर्.’ प्रशिक्षण’ !
(‘सी.पी.आर्.’ – ‘कार्डिओ पल्मोनरी रेसुसीटेशन’ म्हणजेच हृदय आणि फुफ्फुस यांचे कार्य चालू करणे)
कोल्हापूर – जीवन संजीवनी प्रशिक्षण हे हृदय आणि श्वास बंद पडल्यावर केले जाणारे प्रथमोपचार होय ! आपण सतर्कता बाळगत योग्य ती कृती केल्यास हृदयविकाराचा झटका आलेल्यांचा जीव वाचवणे शक्य आहे, असे मार्गदर्शन कोल्हापूर येथील भूलतज्ञ डॉ. किरण भिंगार्डे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या आरोग्य साहाय्य समितीने अचानक येणार्या हृदयविकार झटक्यावर प्राथमिक उपचार देण्यासाठी ‘सी.पी.आर्.’ प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. ‘खोल खंडोबा’ येथील सभागृहात झालेल्या मार्गदर्शनाचा लाभ अनेक प्रशिक्षणार्थींनी घेतला.
या प्रसंगी डॉ. किरण भिंगार्डे यांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. भिंगार्डे यांनी प्रत्यक्ष करायची कृती ‘डमी’वर (बाहुल्याच्या स्वरूपातील निर्जिव मनुष्यावर) करून दाखवली, तसेच त्या वेळी कोणती काळजी घ्यावी ? याविषयीही माहिती सांगितली. यानंतर प्रशिक्षणार्थींकडून ‘सी.पी.आर्.’ प्रात्यक्षिके करून घेण्यात आली.
डॉ. किरण भिंगार्डे म्हणाले,
‘‘मी ज्यांना ज्यांना प्रशिक्षण दिले, अशा प्रशिक्षण घेतलेल्यांनी २६ जणांचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे या ज्ञानाचा उपयोग प्रत्येकाने योग्य वेळी करणे आवश्यक आहे.’’ |