महाराष्ट्रवासियांसाठी ३० जून हा दिवस अत्यंत अविस्मरणीय ठरला. जे घडले, ते सर्वांसाठीच अनपेक्षित होते. हिंदुत्वाचे सूत्र मनी बाळगून आतापर्यंत राजकीय वाटचाल करणाऱ्या आणि मध्यंतरीच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सरकारमधील सहभागाच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळाला. वयाच्या १८ व्या वर्षी शिवसेनेतून राजकारणाचा ‘श्री गणेशा’ करणारे एकनाथ शिंदे हे मितभाषी आणि संयमी आहेत; पण हिंदुत्वाच्या सूत्रासाठी तितकेच जहाल आहेत. त्यामुळेच राजकारणात त्यांना मातब्बर आणि धडाडीचे म्हणून ओळखले जाते. ‘सामान्य रिक्शाचालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री’ अशी त्यांची आतापर्यंतची राजकीय वाटचाल आहे. नगरसेवक, आमदार, जिल्हाप्रमुख, सार्वजनिक बांधकाममंत्री, पालकमंत्री, कॅबिनेटमंत्री अशी अनेक पदे त्यांनी सांभाळली. त्यांनी जनतेच्या विकासासाठी अनेक कामे केली. अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झाल्याने, ते जनतेचे नेते झाले. वर्ष १९८६ मध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्या वेळी शिंदे यांना ४० दिवस कारावासही भोगावा लागला होता. पोलिसांचा लाठीमारही त्यांनी सहन केला. या आणि अशा अनेक घटनांमुळे एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास वैशिष्ट्यपूर्ण म्हणून ओळखला जातो. त्यांचे राजकीय कौशल्य आणि त्यांनी राजकारणात दिलेले आतापर्यंतचे योगदान कायमच स्मरणात राहील ! राजकारणाचा पुरेपूर अनुभव असलेले एकनाथ शिंदे यांचे व्यक्तीमत्त्व अंतर्मुख असून त्यांची विचारधारा पूर्वीपासून हिंदुत्वावर आधारित आहे. हिंदुत्वाची कास धरलेले व्यक्तीमत्त्व मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणे हे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राच्या राज्यकारभारासाठी पूरक आहे. ‘भाजपसमवेत त्यांची अप्रत्यक्ष युती झाल्याने राज्यासाठीही ती लाभदायी आहे’, असे म्हणता येईल. ‘भाजपकडे असलेली विकासाची दूरदृष्टी आणि नेतृत्व अन् एकनाथ शिंदे यांच्याकडील धर्माधिष्ठान यांच्या बळावर महाराष्ट्र राज्य चालवले जावे’, असे हिंदूंना अभिप्रेत आहे. प्रत्येक हिंदूच्या मनात आजही शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती नितांत आदरभाव आहे. त्याच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून ‘महाराष्ट्रावर पुन्हा एकदा हिंदुत्वाची मुहुर्तमेढ रोवली जाईल’, हा दृढ विश्वास हिंदूंमध्ये निर्माण झाला आहे. ‘तो लवकरच सार्थ ठरेल’, याची हिंदूंना निश्चिती आहे.
नव्या शासनाची कर्तव्ये !
महाराष्ट्र हिंदूबहुल आहे; पण हाच महाराष्ट्र आज हिंदूंसाठी तितकाच असुरक्षित झाला आहे. प्रतिदिन हिंदूंवर केली जाणारी आक्रमणे, त्यांच्या घरांची होणारी जाळपोळ, घरांवर केली जाणारी दगडफेक, त्यांना मिळणाऱ्या धमक्या, हिंदु महिलांवर केले जाणारे अत्याचार, तसेच बलात्कार यांमुळे हिंदु पिचलेला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छोटी पाकिस्ताने निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मुंबईत दंगल घडवलेल्या रझा अकादमीने अजूनही हानीभरपाई दिलेली नाही. अनेक ठिकाणचे हिंदू भीतीपोटी पलायन करत आहेत. याची परिणती म्हणजे हिंदूबहुल महाराष्ट्रात हिंदू अल्पसंख्य व्हायला नकोत. अशा स्थितीतच ‘एकनाथ शिंदे’ यांच्या रूपाने हिंदूंसाठी पुन्हा एकदा आशादायी किरण दिसला आहे. ‘तेच आता आपल्याला सर्वथा सुरक्षित वातावरण देतील’, असे हिंदूंना वाटते. सत्तास्थापनेनंतर अन्य विकासकामांच्या समवेतच हिंदूंच्या दुःस्थितीकडेही मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष देऊन ती सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. हिंदूंसमवेत त्यांच्या मंदिरांची सुरक्षा राखणे आणि गडदुर्गांना पुनर्वैभव प्राप्त करून देणे, हेही सरकारसमोरील एक कर्तव्यच आहे. ही सर्व दायित्वे आणि आवाहने पेलण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आणि समर्थ आहेत. याआधी नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांनी एकत्र येऊन २० वर्षे देशाचा कारभार समर्थपणे सांभाळला होता. ‘या इतिहासकालीन घटनेची आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या पदांवरील शिंदे-फडणवीस यांच्या रूपात पुनरावृत्ती झालेली आहे’, असे म्हणता येईल. दोघेही कर्तृत्ववान होते. त्यांचा आदर्श घेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनीही कर्तृत्वाची परंपरा चालू ठेवावी.
महाविकास आघाडी सरकारने सत्तेतून बाहेर पडण्याआधी ४ दिवसांमध्ये विकासकामांच्या आदेशांची जंत्रीच काढली होती. अनेक प्रलंबित निर्णय त्यांनी मार्गी लावले, अनेक धारिकांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. ४ दिवसांत इतक्या गतीने राज्यकारभार होऊ शकतो; पण तो केला गेला नाही, हे वास्तव सूज्ञ जनतेच्या चांगलेच लक्षात आले आहे. त्यामुळे आता टाळाटाळ करून चालणार नाही. कामे, निधी, आदेश प्रलंबित ठेवणे हे आदर्श राज्यकारभाराचे लक्षण नव्हे ! शिंदे शासनाने यातून योग्य तो धडा घेऊन सर्व कामे गतीने होण्याकडे लक्ष द्यावे. आताच्या शासनाला कुणाचाच विरोध नाही, उलट जनतेचा सर्वतोपरी पाठिंबाच आहे. त्यामुळे याचा यथोचित लाभ घेऊन राज्याची घोडदौड चालू ठेवावी. तिला कोणतीही सीमा नसावी. तसे झाल्यासच नव्या शासनाला लवकरात लवकर अपेक्षित फलनिष्पत्ती साधता येईल !
हिंदुत्वरक्षक मुख्यमंत्री !
अनेक संत-महात्मे ‘लवकरच हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे’, असे सांगत आहेत. ‘एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हिंदुत्वरक्षक मुख्यमंत्री लाभला आहे’, असे हिंदूंना वाटते. त्यांच्याकडून परिवर्तनवादी पावले उचलली गेल्यास संत-महात्म्यांची भविष्यवाणी एक ना एक दिवस खरी ठरेल आणि हिंदूंच्या मनातील हिंदु राष्ट्र साकारले जाईल ! त्यांच्या पुढील वाटचालीसाठी समस्त हिंदु बांधवांकडून मनःपूर्वक शुभेच्छा ! एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जाणारा राज्यकारभार हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पूरक ठरू दे, ही सर्व हिंदूंची ईश्वरचरणी प्रार्थना !